अधिवेशन कामकाजाला विरोध हा बालिशपणा ः भाजपची टीका

0
197

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सोमवारी झालेल्या गोवा विधानसभेच्या एक दिवशीय अधिवेशात २०२०-२१ या वर्षासाठीचे अंदाजपत्रक व अकरा महत्त्वाची सरकारी विधेयके संमत केली. मात्र अधिवेशनाच्या कामकाला विरोध करत विरोधकांनी बालिशपणाच दाखवल्याची टीका भाजपने केली तर अर्थसंकल्प मंजुरीबद्दल भाजपने सरकारचे अभिनंदन केले.

यासंबंधी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना पक्षाचे पणजी मतदारसंघातील माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर म्हणाले की, जर या अधिवेशनात अर्थसंकल्प मंजूर झाला नसता तर सरकारला आर्थिक अचडणीला सामोरे जावे लागले असते. सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनासह सरकारचे अन्य सर्व आर्थिक व्यवहारही ठप्प झाले असते. कोविड महामारीवर येणारा खर्चही करता आला नसता.

जी अकरा विधेयके संमत करण्यात आली ती सर्व महत्त्वाची असून त्यांचा फायदा राज्यातील जनतेला मिळणार असल्याचे ते म्हणाले.
सरकारने खरे म्हणणे दोन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला होता. आमदार डायस यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर तसेच राज्यात संसर्गाचा प्रकोप वाढल्यानंतर एकाच दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय एकमताने सर्वपक्षीय बैठकीत झला होता. मात्र, असे असताना विरोधकांनी नंतर या प्रश्‍नावरून राजकारण केल्याचे कुंकळ्येकर म्हणाले.

सिद्धार्थ कुंकळ्येकर, कुंदा चोडणकर व दत्तप्रसाद नाईक यांनी संयुक्तरित्या ही पत्रकार परिषद घेतली. कुंदा चोडणकर यांनी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्यावर टीका केली.