अति सर्वत्र वर्ज्ययेत्

0
233

‘खरं सांगू? जगायचं कशासाठी हेच कळेनासं झालंय.’ हे उद्विग्न स्वरातील शब्द ऐकून मी हळूच वळून पाहिलं. दोन चाळिशीचे गृहस्थ काहीतरी चर्चा करत होते. त्यातला एकजण वरील वाक्य बोलला होता. मला खूप वाईट वाटलं. अजून अर्धं आयुष्यही संपलं नाही अन् एवढं वैफल्य!
का कोण जाणे, परंतु हल्ली असेच भाव जाणवतात सर्वत्र… कुणाच्या शब्दात, कुणाच्या चेहर्‍यावर, कुणाच्या डोळ्यांत… आणि हे केवळ वयस्कर माणसांच्याच नव्हे तर तरुण मंडळीच्या, कधीकधी तर कुमारवयातील मुलांमध्येसुद्धा…
खरंच, जगणं निरुद्देश वाटावं यासारखा पराभव नाही. ना जगण्याची इच्छा, ना मरणाचं धाडस… अशा विचित्र अधांतरात तळमळताना दिसतायत काही माणसं.
एकूणच समाजात वाढत चाललेल्या तंत्रशरणतेचा तर परिणाम नव्हे हा? सतत निर्जीव यंत्रे आणि शुष्क तंत्राच्या प्रदेशात भिरभिरू लागलोय आपण हल्ली… आपली स्वाभाविकता हरवत चाललोय. कितीतरी सुंदर भावना, जाणिवा लोप पावत चालल्यात आपल्यातून…
भावस्पर्शी, मन हेलावून टाकणारे काही पाहिले, वाचले की डोळ्यांत अश्रू उभे राहायचे पूर्वी… ते दुःखाचेच असायचे असं नाही… आत आत जिवंत असणार्‍या जाणिवांचे… सहसंवेदनांचे… एका वेगळ्याच पातळीवरून गोष्टी समजून घेतानाच्या भावनिक कल्लोळाचा परिपाक असायचा तो.
आताशा असं मन हेलावतच नाही… कित्येकांचं. कोडगं झालंय… निर्लेप झालंय.
झाडं-पानं-फुलांशी बोलणारं, मांजर-कुत्रा-गायीगुरांना हाकारणारं, कावळा-चिमणीला बोलावणारं, वृद्ध, अपंग, व्याधिग्रस्त, गरिबांना पाहून व्याकूळ होणारं… निसर्गाचे रंग-गंध-रूप याची नोंद घेणारं… त्यात रमणारं… कुठं हरवलंय ते वेडं, हळवं, कोमल मन? या मनात भरून असणारी करुणा, माया, श्रद्धा, विनय, त्यागाची भावना दुर्मीळ का वाटू लागलीय?
आताशा अनेक मुलं, माणसं, बाया तर जगण्याचे सोहळे अनुभवाच्या नव्हे तर दिखाव्याच्या पातळीवर साजरे करतायत.
मी अमुक बनवलं… मी तमुक खाल्लं… माझा पेहराव आज असा आहे… मी आज अमुक ठिकाणी फिरायला आलोय… मी दुःखी आहे… मी एनजॉय करतोय… हे सगळं सोशल मीडियावर स्वतःच्या फोटोसहीत शेअर करतात. ही सगळी मंडळी स्वतःचं जीवन दुसर्‍याच्या दखल अन् पावतीद्वारा का जगू पाहतात? सतत कुणीतरी दखल घेण्याची, कुणीतरी कौतुक करण्याची ही कायमस्वरूपी भूक तृप्तीत कधी रूपांतरित होणार? आपल्या वागण्या-बोलण्याची, प्रत्येक कृतीची बढाई का मिरवायची आपण? आपल्या अस्तित्वाला कायम शेकडो, हजारो लोकांनी महत्त्व दिलं पाहिजे अशी अपेक्षा, अट्टाहास का? बरं, या सर्व गोष्टींना प्रतिसाद देणारी, कौतुक करणारी माणसं… त्यातला प्रत्येकजण मनापासून थोडंच करतो? आपण खूप दिलदार असल्याचं भासवत असतात अनेकजण. आणि तशीच खोटी दाद देत असतात. अशा नाटकांना का भुलायचं आपण?
मध्यंतरी राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मृत भावासमोर सजवलेलं आरतीचं तबक, राखी वगैरे ठेवून त्याची खूप आठवण येत असल्याची भावना व्यक्त करणारे शब्द आणि स्वतःचा फोटो एका ओळखीतल्या मुलीने फेसबुकवर पोस्ट केला होता. मग तिच्याविषयी कळवळा दाखवणारे, तिच्या बंधुप्रेमाचं कौतुक करणारे कितीतरी कमेंट्‌स आले. तिचं तिच्या भावावर प्रेम नक्कीच असेल; परंतु ती मुलगी परिचयाची असल्यामुळे तिच्या जवळच्या नातेवाईकांशी असलेले तिचे शुष्क, तुसट, दुराव्याचे संबंध मला माहीत आहेत. मग जवळच्या माणसांशी आपलं नातं दृढ व्हावं, स्नेहपूर्ण व्हावं यासाठी तिनं प्रयत्नशील असायला हवं होतं असं मला तरी वाटून गेलं. कारण शेकडो मैल दूर असणार्‍या त्या आभासी जगातील सुहृदांचा कळवळा मन रिझवणारा वाटला तरी त्याची सत्यता आणि उपयुक्तता किती हा प्रश्‍न राहतोच.
किंवा इतर आनंददायी प्रसंगांप्रमाणेच स्मशानात धडधडत्या चितेचे फोटो सोशल मीडियावर टाकून ‘वी मिस यू’ पोस्ट करणार्‍यांना अतीव दुःखाच्या क्षणी मोबाईल उघडून फोटो घेण्याचं सुचतं तरी कसं? -याचंही नवल वाटतंच.
जगण्याचा प्रत्येक क्षण असा कॅमेर्‍यात बंदिस्त करण्याचं हे खूळ दिवसेंदिवस उग्र रूप धारण करतंय एवढं खरं. आताशा माणसं फोटो घेत असतात, ते कुणाला तरी पाठवीत असतात. सवड, निवांतपणा हरवून बसलेल्या या जगात ते बघतो तरी कोण हे देवालाच माहीत. परंतु त्यांची बेसुमार संख्या त्यातलं कुतूहल, आनंद, अपूर्वाई संपवून टाकत आहे एवढं खरं.
या अशा निरर्थक प्रलोभनांच्या आहारी जाऊन, आपल्या जगण्याचा क्षण-क्षण चव्हाट्यावर आणून, नक्की काय मिळवतायत ही माणसं? एखादी गोष्ट तो करतोय म्हणून मी करणार, ही वृत्तीही हास्यास्पदच. एकप्रकारच्या गुंगीत असतात ही माणसं. सुप्त चढाओढीच्या आहारी गेलेली. स्वतःविषयी इतरांच्या मनात वेगळी प्रतिमा निर्माण करण्याची, मीही तुझ्यासारखाच परंतु थोडा वरचढ आहे हे सिद्ध करण्याची स्पर्धा. नकळत एका सापळ्यात अडकतो तो माणूस… चाकोरीबद्ध… आभासी जगाच्या! हळूहळू अगतिक, परिस्थिती शरण… प्रवाहपतित बनून वाहात चाललेल्या अनेकांमधला एक!
मग यातल्याच काहीना कधीतरी जाग येते. या सार्‍यात तथ्य नाही किंवा कशातच तथ्य नाही. पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, नाती, माणसं, कशातच रस वाटेनासा होतो. ‘मग जगायचे कशासाठी?’ हा प्रश्‍न पडतो. अर्थात असा प्रश्‍न पडण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. परंतु आता-आताशा मोहजाल हेही एक प्रमुख कारण असू शकतं.
अतिरेकानंतरच्या कोरड्या विरक्तीत अडकण्यापेक्षा, तहान लागलीय म्हणून जलाशयातच उडी न मारता काटावरून जसं ओंजळीनं पाणी भरून घेऊन पितो ना तसंच सोशल मीडिया आणि त्यातल्या दिखाऊपणाच्या आहारी न जाता त्याचा मोजका, चवीपुरता वापर केला तर… ते योग्य ठरेल ना! निरर्थकतेच्या दाराकडे नेणारी एक वाट तरी बंद करू शकतो आपण… थोडी सजगता, थोडा संयम पाळला तर!!