अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

0
256

एका युगाची समाप्ती

>> देशात ७ दिवसांचा दुखवटा
>> आज गोव्यात सार्वजनिक सुटी
>> आज संध्याकाळी अंत्यसंस्कार

कविमनाचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले अजातशत्रू, धुरंधर, मुत्सद्दी राजकारणी तथा देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रदीर्घ आजाराने येथील अ. भा. आयुर्विज्ञान महाविद्यालय इस्पितळात काल निधन झाले. प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे ९३ वर्षीय वाजपेयी गेल्या ९ आठवड्यांपासून या इस्पितळात दाखल होते. अखेर आजाराशी प्रदीर्घ झुंजीनंतर काल संध्याकाळी ५.०५ वाजता त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वाजपेयी यांचे पार्थिव अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या नवी दिल्लीतील कृष्णमेनन मार्ग येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पश्‍चात दत्तक कन्या नमिता कौल भट्टाचार्य या आहेत.

प्रकृती बिघडल्यामुळे वाजपेयी यांना गेल्या ११ जून रोजी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. श्‍वसनाशी संबंधित तसेच मूत्रपिंड विकारामुळे ते त्रस्त होते. गेल्या २४ तासांपासून त्याची प्रकृती अतिशय खालावली होती. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री तसेच विरोधी पक्षांच्या नेतेमंडळीची १५ रोजी रात्रीपासून त्यांची विचारपूस करण्यासाठी इस्पितळात रीघ लागली होती. काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत ‘एम्स’चा परिसर गजबजून गेला.
जनता पक्षाचा प्रयोग व त्या पक्षाची शकले झाल्यानंतर जनसंघ व नंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना केल्यापासून त्या पक्षाच्या सरकारचे पंतप्रधान असा त्यांचा विलक्षण राजकीय प्रवास झाला. तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद त्यांनी भूषविले.

ग्वाल्हेरमध्ये जन्म
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरात १९२४ साली वाजपेयी यांचा जन्म झाला. कृष्णबिहारी वाजपेयी व कृष्णादेवी वाजपेयी यांचे ते सुपूत्र होते.

किशोरावस्थेत स्वातंत्र्यलढ्यात
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वाजपेयी यांनी किशोरवयातच उडी घेतली होती. त्यांनी त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कम्युनिस्ट विचारसरणीच्या प्रभावाखालीही काही काळ ते होते. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्यानंतर अखेरपर्यंत ते संघ परिवाराशी कायमचे जोडलेले राहिले. संघाच्या प्रचारासाठी १९५० साली त्यांनी शाळा सोडली.

तीन वेळा पंतप्रधान
अटलबिहारींनी देशाचे पंतप्रधानपद तीनवेळा भूषविले. त्यापैकी १९९८ मध्ये या पदावर ते १३ दिवसच राहिले होते. दुसर्‍या वेळी पंतप्रधान बनल्यानंतर त्यांचे सरकार १३ महिन्यांत कोसळले होते.
मात्र तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची मुदत पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरले. पोखरण अणुचाचणी हा या कालावधीत त्यांच्या या कारकिर्दीचा कळसाध्याय ठरला. त्यासाठी अमेरिकेबरोबरच अन्य देशांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले.

कारगील युद्धावेळी पंतप्रधान
कारगील युद्धावेळचा काळ हा त्यांची कसोटी पाहणारा ठरला. अग्नीपरीक्षा म्हणावे अशा या काळात वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानला अद्दल घडविली. त्यानंतर गेल्या १९ वर्षांत तशा प्रकारची लढाई करण्याचे धाडस पाकिस्तानला झाले नाही.

अजातशत्रू राजकारणी
काश्मीर प्रश्‍न प्रेमाने सोडवण्याची घातलेली साद, पाकिस्तानशी मैत्रीपूर्व संबंधाच्या हेतूने केलेली लाहोर बसयात्रा किंवा समझोता एकस्प्रेस, सर्व धर्मांना समान वागणूक देणारा राजधर्म पाळण्याचा व पर्यायाने सर्वधर्मसमभावाचा विचार अशा आगळ्या विचार वैशिष्ट्‌यांमुळे राजकीय क्षेत्रात हयातभर अजातशत्रू व्यक्तिमत्त्व बनून राहिले.