अटलबिहारी वाजपेयी ः एक असामान्य नेतृत्व

0
186
  • शेषाद्री च्यारी

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत आणि बाहेर, गद्यात आणि पद्यात, देशांतर्गत आणि पररष्ट्र व्यवहारात प्रत्येक ठिकाणी न पुसता येणारा ठसा उमटवला. संसदेत प्रवेश झाल्यापासून, वाजपेयींच्या विचार करायला लावणार्‍या आणि विनोदप्रचुर भाषणांनी संसदेतील वरीष्ठ सदस्यांची मने जिंकली. वाजपेयींसारखे नेते कोणत्याही नेहमीच्या व्याख्यांमध्ये बसत नाहीत. तेच नेतृत्वाची व्याख्या असतात…

भारतीय जनता पक्षाचा सत्तेपर्यत पोहोचण्याचा इतिहास अटलबिहारी वाजपेयी या नावाच्या उल्लेखाशिवाय आणि त्यांच्या कामगिरीच्या विश्‍लेषणाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. वाजपेयी हे स्वत:च एक संस्था होते. संसदेत आणि बाहेर, गद्यात आणि पद्यात, देशांतर्गत आणि परराष्ट्र व्यवहारात प्रत्येक ठिकाणी त्यांचा न पुसता येणारा ठसा उमटला आहे आणि तोच पक्षाला सध्याची आव्हाने पेलण्याचे आणि देशाला उज्ज्वल भवितव्याकडे नेण्याचे सामर्थ्य मिळवून देण्यामागचा प्रेरणादायी स्रोत आहे.
संसदेतील अटलजींचे पहिलेच भाषण जबरदस्त गाजले. शुद्ध हिंदीत केलेले त्यांचे हे भाषण इतके प्रभावी होते की, त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरु यांनी सभापतींची परवानगी घेतली आणि स्वतःही हिंदीत भाषण केले, आपल्या परराष्ट्र धोरणाला पाठींवा दिल्याबद्दल त्यांनी वाजपेयींचे आभार मानले आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांचे कौतुक केले.

संसदेत प्रवेश झाल्यापासून, वाजपेयींच्या विचारप्रवण आणि विनोदप्रचुर भाषणांनी संसदेतील वरीष्ठ सदस्यांची मने जिंकली. ज्येष्ठ संसद सदस्य श्री. अनंतशयनम अय्यंगार तर म्हणत असत की, वाजपेयींना हिंदीत ऐकणे आणि प्रा. हिरेन मुखर्जी यांना इंग्रजीत ऐकणे ही एक पर्वणी असते.
बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि संस्थानिकांचे तनखे रद्द करण्यासारख्या कॉंग्रेसच्या धोरणांना त्यावेळच्या जनसंघाने विरोध केला होता. तेव्हा श्रीमती इंदिरा गांधींनी जनसंघावर ‘‘बनिये’’ पक्ष (व्यापार्‍यांचा पक्ष) म्हणून शिक्का मारला. वाजपेयींनी त्याची दखल घेतली, पण त्यांना वाद वाढवायचा नव्हता, म्हणून त्यांनी श्रीमती गांधींच्या हिंदीचा दोष आहे असे म्हणून त्यांना टोमणा मारला, ‘हम भी कहते है की जनसंघ के सदस्य ‘बनिये’’ अशी शाब्दिक कोटी करीत म्हणत त्यांनी तो वादच संपुष्टात आणला.

आपला मुद्दा ठसवताना आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडताना किंवा अडचणीत टाकणार्‍या प्रश्‍नांना उत्तर देताना आपल्या बोलण्याचा आणि मौनाचा प्रभावीपणे वापर करण्याचे कौशल्य वाजपेयींइतके इतर कोणत्याही राजकीय नेत्याने दाखवले नसेल. १९९२ मध्ये पक्षाच्या अधिवेशनात त्यांचे पक्षातील स्थान काय, हा प्रश्‍न त्यांना वारंवार विचारला जात होता. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने हा प्रश्‍न उपस्थित केला आणि विचारले की पक्षात त्यांना बाजूला सारले (मार्जिनलाइज्ड) जात आहे का? हा प्रश्‍न त्यांनी दीर्घकाळ टाळला होता, आता उत्तर देणे भागच होते. आपल्याला पक्षात ‘मार्जिनलाईज्ड’ केले जात नसल्याचे त्यांनी सांगितले आणि एका मिश्कील वाक्यात ती पत्रकार परिषद संपवली, ‘…नो, आय ऍम नॉट बीईंग मार्जनलाईज्ड, बट युज्युअली करेक्शन्स आर डन इन द मार्जिन!’

बर्‍याचदा अटलजींनी मिळवलेल्या राजकीय यशाची, त्यांच्या मोकळ्या आणि स्पष्ट मतांची ‘चुकीच्या पक्षातील योग्य माणूस’ या शब्दात प्रशंसा केली जात असे. त्यांनी ही शेेरेबाजी म्हणजे ‘डाव्या हाताची शाबासकी’ समजली. पंतप्रधान झाल्यावरही त्यांचा कार्यकर्त्यांवरील अतूट विश्‍वास आणि पक्षावरील निष्ठा तसूभरही कमी झाली नव्हती, त्याचे प्रत्यंतर त्यांच्या एका भाषणात दिसून येते. २००० मध्ये केलेल्या एका भाषणात ते म्हणाले होते, ‘भाजपला आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आजचे बळ मिळाले आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी आपले अश्रू, घाम आणि प्रसंगी रक्त सांडून हे यश मिळवून दिले आहे. आपल्या प्रवासात आपण आता एका महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आपली स्वाकारार्हता वाढली आहे, ती आणखी वाढेल, कारण आपण वेगळे आहोत आणि आपण जी भाषा बोलतो ती लोकांच्या हृदयाला भिडते. पक्ष म्हणून आपले वेगळेपण टिकवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यातूनच आपले राजकीय वर्तन सिद्ध होईल.’

वाजपेयींची राजकीय कारकीर्द १९५७ मध्ये सुरू झाली, तेव्हापासून त्यांनी केवळ वैयक्तिक आयुष्यातच नव्हे तर पक्षाच्या आणि देशाच्या आयुष्यातील अनेक चढउतार अनुभवले. १९५२ मध्ये पंजाब प्रदेश जनसंघाच्या पहिल्या वार्षिक अधिवेशनाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि जम्मू काश्मीर प्रजा परिषदेचे अध्यक्ष पं. प्रेमनाथ डोगरा उपस्थित होते. या अधिवेशनात तरूण ‘प्रचारक’ वाजपेयी यांचे भाषण सर्वांत शेवटी होते. त्यांचे भाषण संपले तेव्हा जवळजवळ मध्यरात्र झाली होती. वाजपेयी आणि आणखी दोन कार्यकर्ते रात्री थंडीत जेवणाची सोय कुठे होते का ते पहायला निघाले. पण त्यांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चहाच्या स्टॉलवर चहा तेवढा मिळाला.
जम्मू-काश्मीरवर पक्षाचा दृष्टीकोन त्यांच्याएवढा अन्य कुणी स्पष्ट करू शकत नाही. पण पंतप्रधान झाल्यावर त्यांना या प्रश्‍नी तोडगा काढताना मापदंड काय असेल असे विचारण्यात आले तेव्हा त्यांनी मोकळेपणाने सांगितले की मानवता हाच मापदंड (इन्सानियत का दायरा) असेल.

समान नागरी कायदा या आणखी एका अतिशय महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावरही त्यावेळच्या जनसंघाचा विचार अतिशय स्पष्ट आणि नेमक्या शब्दांत विश्‍लेषण करीत असत.

पंतप्रधानपदी असणारी व्यक्ती एकटी नसते, पण एकाकी असते. वाजपेयीही त्याला अपवाद नव्हते आणि ती भावना त्यांनी त्यांच्या कवितांमधून व्यक्तही केली आहे. पण त्यांनी त्यांचे मित्र आणि सहकारी, अर्थात ते अगदी थोडे आहेत, अतिशय काळजीपूर्वक निवडले. त्यांचे तीन अगदी जवळचे सहकारी होते, अडवाणी, जसवंतसिंग आणि ब्रजेश मिश्रा. मे १९९८ मध्ये पोखरण-२ अणुस्ङ्गोटानंतर अमेरिका अतिशय नाराज झाली होती आणि तिने भारतावर निर्बंध लादले. वाजपेयींना कदाचित अमेरिकेच्या या प्रतिक्रियेचा अंदाज होता. तरीही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, पण त्याचवेळी भारत – अमेरिका भागीदारीचे महत्वही ते जाणून होते. ही परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी त्यांनी अतिशय सभ्य आणि मृदुभाषी जसवंत सिंग यांच्यावर सोपवली, तेव्हा त्यांच्या कुशाग्रतेचे दर्शन झाले, कारण जसवंत सिंग यांची क्लिटंन प्रशासनातील सर्वात महत्वाची व्यक्ती स्ट्रोब टालबोट यांच्याशी मैत्री होती. वाजपेयींना त्याची पूर्ण जाणीव होती. अमेरिकेचे निर्बंध विरून गेले.
१९७० नंतरचा काळ कॉंग्रेसविरोधी राजकारणाचा उदय झाला तशी देशाच्या राजकीय इतिहासात अत्यंत प्रक्षुब्ध असा कालखंड सुरू झाला. रेल्वेचा संप आणि कॉंग्रेस भ्रष्टाचाराविरोधात जेपींची चळवळ यामुळे कॉंग्रेसविरोधी राजकारणाला आणखी बळ आले. वाजपेयींच्या रूपाने विरोधी पक्षांना एक आवाज मिळाला. जेपींच्या सर्व मेळाव्यांमध्ये वाजपेयी प्रमुख आकर्षण असत.

बंगळूर येथे कारावासात असताना तुरूंगात वाजपेयींची तब्येत ढासळली. त्यांच्यावर अपेंडीसायटीसची शस्त्रक्रिया करायची होती, पण त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत प्रोलॅप्स्ड डिस्क (पाठीचा विकार) साठी आणण्यात आले. त्यांना पाठीचे दुखणे असह्य होत असतानाही त्यांनी तुरूंगवासातून सुटका करून घेण्याचे नाकारले. त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत ते म्हणाले, ‘हम टूट सकते हैं, झुक नही सकते’. वाजपेयींसारखे नेते कोणत्याही नेहमीच्या व्याख्यांमध्ये बसत नाहीत. तेच स्वतः नेतृत्वाची व्याख्या असतात!