अटकेतून सुटलेल्या पदाधिकार्‍यांचे कॉंग्रेसकडून जोरदार स्वागत

0
253

>> पोलिसांकडून सतावणूक झाल्याचा दावा

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या भाषणाच्या वेळी म्हादई प्रश्‍नावरून आवाज उठविल्यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कलमाखाली अटक केलेल्या कॉंग्रेसच्या तिघा पदाधिकार्‍यांची चोवीस तासांनंतर गुरुवारी संध्याकाळी सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
या तिघांना हमीदार म्हणून सरकारी कर्मचारी देण्याची सूचना करण्यात आली. तसेच तिघांना आगशी पोलीस स्टेशनवर २५ नोव्हेंबरपर्यंत हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच त्यानंतर २९ नोव्हेंबरपर्यंत स्थानिक पोलीस स्टेशनवर हजेरी लावण्याची अट घालण्यात आलेली आहे. न्यायदंडाधिकार्‍यांकडून प्रतिबंधात्मक कायद्याखाली अटक केलेल्या व्यक्तीची यापुढे चांगल्या वर्तनाच्या हमीवर सुटका केली जाते. तथापि, कॉंग्रेस पक्षाच्या तिघा कार्यकर्त्यांची सतावणूक करण्यासाठी न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांच्यावर अनेक अटी लादल्या आहेत, असा आरोप कॉग्रेसचे प्रवक्ते ऍड. रोहित ब्रास डिसा यांनी पत्रकार परिषदेत केला.

जामिनावर सुटका करण्यात आलेल्या डिचोली कॉंग्रेस गटाध्यक्ष मेघश्याम राऊत, डिचोली युवा अध्यक्ष मनोज नाईक आणि कुंभारजुवा युवा अध्यक्ष ग्रेन काब्राल या तिघाही पदाधिकार्‍यांचे कॉग्रेस भवनात जोरदार स्वागत केले आहे. पोलीस यंत्रणेने तिघांची सतावणूक केली. डिचोली, पेडणे, बांबोळी, आगशी पोलीस स्टेशनवर रात्रभर फिरवत ठेवले. म्हादईच्या सर्ंवंधनासाठी यापुढे तुरुंगात जाण्यची तयारी आहे, असेही डिचोली कॉंग्रेसचे गटाध्यक्ष मेघश्याम राऊत यांनी सांगितले.

म्हादईवर होणारा अन्याय सहन न झाल्याने कॉंग्रेसच्या तिघा पदाधिकार्‍यांनी केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या भाषणाच्या वेळी म्हादईचा मुद्दा उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. म्हादईसाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांना सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले.