अजून किती बळी?

0
168

दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी काश्मीरमधील पाम्पौर पुन्हा एकदा हादरले. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आठ जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याचा जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात बसच्या समोर उभा राहून दणादण गोळ्या चालवणारा दहशतवादी दिसतो. त्याला पाहताना आपल्या लष्करी आणि निमलष्करी जवानांचे प्राण एवढे स्वस्त आहेत का, हा प्रश्न कोणत्याही देशभक्त नागरिकाच्या मनात आला असेल यात शंका नाही. सातत्याने सुरू असलेले अशा प्रकारचे हल्ले आणि या दहशतवाद्यांची पाकिस्तानकडून सुरू असलेली अप्रत्यक्ष पाठराखण याचे हे रडगाणे आणखी किती काळ आळवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर तरी पाकिस्तानबाबत कडक नीती अवलंबिली जाईल अशी अपेक्षा होती. परंतु भारताकडून मैत्रीच्या गळाभेटी सुरू राहिल्या आणि पाकिस्तानकडून पाठीत खंजीर खुपसणेही सुरू राहिले. एकीकडे पाम्पौरमध्ये दहशतवादी आपल्या सीआरपीएफ जवानांच्या रक्ताचा सडा पाडत होते, तेव्हा पाकिस्तानचे भारतातील दूत अब्दुल बसित काश्मिरी फुटिरतावाद्यांसह इफ्तार पार्टीत रंगले होते. हे म्हणजे ओल्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे. सीआरपीएफच्या वाहनावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही साधी बाब नाही. वास्तविक लष्कर किंवा निमलष्करी दलाचे जवान काश्मीरसारख्या संवेदनशील प्रदेशामध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात, तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय खबरदारी घ्यावी त्यासंबंधी स्पष्ट सूचना आहेत. हा हल्ला एवढ्या सहजतेने होऊ शकला त्यामागे या सूचनांचे पालन झाले नसावे असा संशय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने चौकशी होणे आवश्यक आहे, कारण काश्मीरसारख्या संवेदनशील प्रदेशामध्ये थोडीशी बेफिकिरीही जिवावर बेतू शकते. असे जवान एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जातात तेव्हा त्यांना सुरक्षा पुरवणारी वाहने मागे पुढे असणे अपेक्षित असते. अशा हालचालीपूर्वी रस्ता खुला करणारे पथक तैनात असते. मग पाम्पौरमध्ये हा हल्ला झाला तेव्हा कारमध्ये दडून बसलेले दहशतवादी या पथकाच्या नजरेस कसे आले नाहीत हा प्रश्न आहे. शिवाय जवानांच्या बसच्या मागेपुढे सुरक्षा पुरविणारी वाहने असती, तर अशा प्रकारे बसला घेरण्याची संधी या दहशतवाद्यांना मिळाली नसती. आजही लष्कर आणि निमलष्करी दलासाठी अत्यंत सामान्य दर्जाच्या बसगाड्या वापरल्या जातात. या बसला बहुधा एकच दरवाजा असतो. खरे तर अशा प्रकारच्या हल्ल्यांचा धोका असलेल्या जवानांसाठी खास प्रकारच्या किमान अनेक दरवाजे असलेल्या व भल्या मोठ्या खिडक्यांऐवजी योग्य सुरक्षा पुरविणार्‍या बसगाड्या उपलब्ध करणे गरजेचे आहे. आपल्याकडे नेत्यांना बुलेटप्रूफ वाहने पुरवली जातात, परंतु लढवय्या जवानांचे प्राण मात्र रामभरोसे असतात ही शोकांतिका आहे. गेल्या काही दिवसांत सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाल्याच्या बातम्या आहेत. केवळ काश्मीरच्या सीमावर्ती भागातूनच नव्हे, तर पंजाबमधूनही अशा प्रकारची घुसखोरी होत आली आहे. अमली पदार्थांचा जो मोठा व्यवहार पाकिस्तानातून पंजाबमध्ये चालतो, त्याच्या आडूनही या दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू असतात. त्यामुळे आपली वायव्य सीमा असुरक्षित बनलेली आहे. ती सुरक्षा कडेकोट करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. परंतु तरीही घुसखोरी होेते आणि या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये आश्रय घेण्याची संधी मिळते हे आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांचेही मोठे अपयश मानायला हवे. काश्मीरमध्ये पीडीपी – भाजपचे संयुक्त सरकार असले तरी फुटिरतावाद्यांचे मनोबल वाढल्यासारखे दिसते आहे. खुद्द काश्मीर खोर्‍यामध्ये स्थानिक दहशतवादी तयार झालेले आहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे. पीडीपी नेत्यांची फुटिरतावाद्यांबाबतची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. भाजपाने त्यांच्याशी सत्तासोबत केली असली, तरी खोर्‍यातील लष्कर हटवण्यापासून काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरापर्यंत एकेका प्रकरणात पीडीपीने घेतलेली भूमिका पाहिली तर हा संशय बळावतो. त्यामुळे काश्मीरबाबत अधिक सजगता आणि जागरूकता दाखविण्याची आज आवश्यकता आहे. आपल्या जवानांचे प्राण असे हकनाक जाण्यापासून रोखण्यासाठी केवळ पोकळ शाब्दिक इशारे पुरेसे नाहीत. ठाम आणि ठोस कारवाईची गरज आहे. प्रत्येक हल्ल्यावेळी देशवासीयांच्या यासंदर्भातील भावना तीव्र होतात आणि नंतर सारे विसरले जाते. पुन्हा पुन्हा हकनाक मारले जाणारे आपले शूर तरूण, उद्ध्वस्त होणारी त्यांची कुटुंबे, त्यांचा थरकाप उडवणारा आक्रोश हे सारे कुठेतरी थांबायलाच हवे.