अजातशत्रू अटलजी

0
230
  • अशोक टंडन

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी भारताच्या इतिहासातील एक महान नेते होते. अत्यंत हुशार, संवेदनशील, मृदुस्वभावी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची ओळख देशाला आहे. संघ परिवारापलीकडे अनेक विचारांच्या, अनेक पक्षांच्या नेत्यांशी वाजपेयी यांची घट्ट मैत्री होती. अटलजींनी आपल्या वर्तनातून मैत्री कशी असावी याचा आदर्श अनेक रूपांत ठेवला आहे.

भारतीय राजकारणातील अटलजींचे स्थान खूप वेगळ्या स्वरुपाचे आहे. सध्या नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्ता मिळून दिली असली तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत केंद्रातील सत्ता ही ङ्गक्त आघाडी करूनच मिळवता येते असा समज रूढ झाला होता. याचे कारण १९८९ नंतर कोणत्याच पक्षाला केंद्रात स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नव्हते. आघाडीच्या राजकारणाची चर्चा होत असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने १९९८ ते २००४ अशी सलग सहा वर्षे चालविलेल्या आघाडी सरकारचे स्मरण सगळ्यांनाच होते. या काळात वाजपेयी यांनी ज्या पद्धतीने घटक पक्षांना भारतीय जनता पक्षाबरोबर जोडून घेतले, त्यावरून त्यांनी आघाडी सरकार चालविण्याचा आदर्श निर्माण केला असे म्हटले जाऊ लागले. १९९६ मध्ये वाजपेयी हे १३ दिवसांसाठी पंतप्रधान होते. पहिले बिगरकॉंग्रेसी पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयींची ओळख आहे. त्या काळी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यास प्रादेशिक पक्ष तयार नव्हते. म्हणून वाजपेयींचे सरकार १३ दिवसांत कोसळले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपले मित्र पक्ष वाढविण्यास सुरूवात केली. १९९८ ते २००४ या काळात वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये संपूर्ण देशभरातील जवळपास ३० छोटे-मोठे पक्ष सहभागी झाले होते. सध्या यातील अनेक पक्ष भारतीय जनता पक्षाचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात. हे लक्षात घेता अटलबिहारी वाजपेयी यांनी या पक्षांना बरोबर घेत सरकार कसे चलविले असेल याची कल्पना करता येईल.

वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जम्मू-काश्मीरमधील डॉ. ङ्गारूक अब्दुल्लांचा नॅशनल कॉन्ङ्गरन्स, ओमप्रकाश चौटाला यांचा भारतीय लोकदल, बन्सिलाल यांचा हरियाणा विकास पक्ष, अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोकदल, नितिशकुमार यांचा जनता दल, रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष, नविन पटनाईक यांचा बिजू जनता दल, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस, गोरखा मुक्ती मोर्चा, नागालँड पिपल्स पार्टी, मेघालय मधील नॅशनल पिपल्स पार्टी, मणिपूर स्टेट कॉंग्रेस पार्टी, सिक्कीम डेमॉक्रॅटिक ङ्ग्रंट, मिझो नॅशनल ङ्ग्रंट, झारखंड मुक्ती मोर्चा, ऑल झारखंड स्टुडंट युनियन, आसाम गण परिषद, तेलगु देसम, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, द्रविड मुन्नेत्रकळघम म्हणजेच करुणानिधींचा द्रमुक, पीएमके, एमडीएमके, केरळमधील इंडियन ङ्गेड्रल डेमॉक्रॅटीक पार्टी असे अनेक पक्ष सहभागी झाले होते. जयललिता यांचा अण्णाद्रमुक हा पक्षही वाजपेयींच्या सरकारमध्ये काही काळ होता. या पक्षांशिवाय भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षांपासून मित्र असलेले शिवसेना आणि पंजबमधील अकाली दल हे पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी होतेच. या सर्व प्रादेशिक पक्षांचे भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी मतभेद झाले. तसेच भाजपच्या काही नेत्यांशीही या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचे मतभेद झाले. मात्र यापैकी एकाही पक्षाने अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल टीकेचा एकही शब्द कधी उच्चारला नाही. वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची नेतृत्वशैली ही या पक्षांच्या दृष्टीने कधीच वादग्रस्त अथवा टीकेचा विषय नव्हती.

अटलजींनी अनेक पक्षांच्या सहकार्याने केंद्रातील सरकार चालवताना आघाडी धर्म कसा असतो हे आपल्या वर्तनातून सप्रमाण दाखवून दिले. आपला पक्ष आणि अन्य सहकारी पक्ष यामध्ये वाजपेयी यांनी कधीच भेदभाव केला नाही. त्यामुळेच हे सर्व प्रादेशिक पक्ष भारतीय जनता पक्षाऐवजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाशी जोडले गेले होते, असे म्हणावे लागते. अनेक प्रादेशिक पक्ष सांभाळताना, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पुरवताना वाजपेयी यांना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागत असे. ही कसरत करत असताना वाजपेयी यांनी या पक्षांच्या नेत्यांबरोबर असलेल्या संबंधात कधीच कटुता येऊ दिली नाही. त्यांचे या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध राहिले. वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्त्वाचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागते. उत्तर प्रदेशातील त्यावेळचा लोक तांत्रिक कॉंग्रेस हा पक्षही वाजपेयींच्या सरकारमध्ये सहभागी होता. या पक्षाचे नेते नरेश अग्रवाल आणि राजीव शुक्ला या दोघांनी कालांतराने भारतीय जनता पक्षाबरोबची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या दोघाही नेत्यांनी वाजपेयी यांची क्षमा मागितली होती. याचे कारण नरेश अग्रवाल, राजीव शुक्ला यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या मनात अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी नितांत आदर आहे. राजकारणापलिकडचे अत्यंत मोठे व्यक्तिमत्त्व असे वाजपेयी यांचे वर्णन करावे लागते.

काही वेळेला या पक्षांच्या नेत्यांशी वाजपेयी यांचे काही तात्वीक मुद्यांवर जरूर मतभेद झाले. मात्र हे मतभेद एका मर्यादेतच राहिले. वाजपेयींबरोबरच्या या पक्षांच्या नेत्यांबरोबरच्या संबंधात कधीच कटूता आली नाही. वाजपेयी आणि अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल यांचे अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत. हे दोघे जेव्हा एकमेकांना भेटतात त्यावेळी त्या दोघांच्याही चेहर्‍यावर अत्यंत जिव्हाळ्याचा माणूस भेटल्याचा भाव असतो. अत्यंत आत्मियतेने बादल आणि वाजपेयी एकमेकांशी बोलत असत. संघ परिवारापलीकडे अनेक विचारांच्या, अनेक पक्षांच्या नेत्यांशी वाजपेयी यांची घट्ट मैत्री होती. वाजपेयींनी आपल्या वर्तनातून मैत्री कशी असावी याचा आदर्श अनेक रूपात ठेवला. माजी पंतप्रधान नरसिंह राव, चंद्रशेखर, शरद पवार, सोमनाथ चटर्जी, माजी राष्ट्रपती आर.व्यंकटरमण, डॉ. ङ्गारूख अब्दुल्ला यासारख्या विविध विचारांच्या नेत्यांशी वाजपेयी यांचे मित्रत्वाचे संबंध होते. या अर्थाने अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व समजले जाते. भारतीय राजकारणात वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व अजातशत्रू म्हणून का समजले जाते हा एखाद्या पी.एच.डी विद्यार्थ्याच्या प्रबंधाचा विषय होण्यास हरकत नाही.

वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू सांगता येतील. १९९६ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीमुळे कोणताही प्रादेशिक पक्ष वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यास तयार नव्हता. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अनेक प्रयत्न करन पाहिले. मात्र, भारतीय जनता पक्षाला शिवसेना आणि समता पक्ष, अकाली दल वगळता कोणीही मित्र पक्ष मिळत नव्हता. अशा काळात वाजपेयी यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी कोणत्याही पक्षाला वारेमाप आश्‍वासने दिली नाहीत किंवा आपली विचारसरणी बदलू असेही सांगितले नाही. आपले सरकार पडले तरी चालेल पण आम्ही आमच्या विचारसरणीशी तडजोड करणार नाही, असेच बजावत त्यांनी काम केले. १९९९ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार अवघ्या एक मताने लोकसभेत पराभूत झाले. त्यावेळी काही नेत्यांनी वाजपेयी यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेते पदावरून हटवून दुसर्‍या नेत्याच्या हातात आघाडीचे प्रमुखपद सोपविण्याचा विचार सुरू केला होता. या नेत्यांनी आपल्या हालचालींची कुणालाच कल्पना लागू दिली नव्हती. वाजपेयींच्या जागी अन्य नेत्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रमुखपदी आणायचे आणि केंद्र सरकारमध्ये सरकार स्थापनेचा दावा नव्याने करायचा अशी ही चाल होती. मात्र, ममता बॅनर्जी, वायको यांच्यासारख्या नेत्यांनी वाजपेयींच्या जागी अन्य नेता आणण्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे वाजपेयी हेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून राहिले.

ममता बॅनर्जी आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असल्या तरी अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचे वेगळेच नाते होते. त्या अटलबिहारी वाजपेयींना पितृस्थानी मानत. वाजपेयींच्याबद्दल एकही वावगा शब्द ऐकून घेण्याची ममता बॅनर्जींची तयारी नसे, वाजपेयींना त्या जाहीररित्या अत्यंत सन्मानपूर्वक वागणूक देत असत. शरद यादव हे संयुक्त जनता दलाचे नेते केंद्रीय मंत्रीमंडळात होते. मात्र त्यांच्या अनुभवानुसार त्यांना मंत्रिपद मिळत नाही हे लक्षात आल्यावर वाजपेयींनी त्यांना जॉर्ज ङ्गर्नांडिस यांच्याबरोबरच्या संबंधांचा वापर करून चांगले खाते द्यायला लावले होते. शरद यादव आणि वाजपेयी यांनी अनेक वर्षे संसदेत एकत्र काढलेली होती. त्यामुळे शरद यादव यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वाजपेयींना चांगला परिचय होता.

बिजू जनता दलाचे नेते नविन पटनाईक हेही वाजपेयींना वडिलांप्रमाणे मानत. आपल्या पक्षातील अंतर्गत कुरबूरी सोडवण्यासाठी ते वाजपेयींची मदत घेत असत. अशा अनेक नेत्यांशी वाजपेयींचे जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध होते. तेव्हा पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री असलेले ज्योती बसू यांच्याशी वाजपेयी हे तासंतास ङ्गोनवर बोलतांना आढळून यायचे. वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा कडवा विरोधक होता. तरीही वाजपेयी आणि बसू यांनी राजकारणापलीकडची आपली मैत्री जपली होती. कॉंग्रेसचे प्रवक्ते दिग्विजय सिंग हे वाजपेयींना ‘गुरूजी’ म्हणून हाक मारत असत. अशा अनेक नेत्यांशी वाजपेयींनी स्नेह जोडला होता. हा स्नेह त्यांच्या निर्मळ वागणुकीनेच जोडला गेला होता. वाजपेयींसारखी अजातशत्रू राजकारणी सध्याच्या राजकारणात दुर्मिळ झाले आहेत. अशा वेळी त्यांच्या जाण्याने निर्माण केलेली पोकळी खूप मोठी आहे.