अचंथाची जेतेपदाला गवसणी

0
127

भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमल याने आपला दशकभराचा आयटीटीएफ जेतेपदाच्या दुष्काळ काल रविवारी संपवताना आयटीटीएफ चॅलेंजर प्लस ओमान ओपन टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत कमल याने पोर्तुगालच्या अव्वल मानांकित मार्कोस फ्रेटस याचा ६-११, ११-८, १२-१०, ११-९, ३-११, १७-१५ असा पराभव केला.

२०१० साली इजिप्त ओपन किताब जिंकल्यानंतर जेतेपद प्राप्त करण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती. २०११ साली मोरक्को ओपन व २०१७ साली इंडिया ओपनचा अपवाद वगळता त्याला आयटीटीएफ स्पर्धांच्या जेतेपदाच्या लढतीत एकदाही स्थान मिळविता आले नव्हते.
तत्पूर्वी, कमल याने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना रशियाच्या किरिल स्काचकोव याला नमवून आयटीटीएफ चॅलेंजर प्लस ओमान ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

चौथ्या मानांकित कमलने पहिले दोन गेम गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत सामना ११-१३, ११-१३, १३-११, ११-९, १३-११, ८-११, ११-७ असा आपल्या नावे केला. हा सामना जवळपास १ तास ८ मिनिटे चालला. ‘अंतिम ८’मध्ये कमल याने फिनलंडच्या ओलाह बेनटेक याचा ११-७, १०-१२,११-३, ११-८, ११-६ असा केवळ एक गेम गमावून पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. या स्पर्धेतील चांगल्या कामगिरीचा लाभ क्रमवारी उंचावण्यासाठी होणार असून आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या दृष्टीने सुधारित क्रमवारी फायदेशीर ठरणार आहे, असे कमलने जेतेपदानंतर बोलताना सांगितले. दुसर्‍या उपांत्य सामन्यात फ्रेटस याने भारताच्या हरमीत देसाई याचा कडवा प्रतिकार ५-११, ११-९, ६-११, ६-११, ११-८, १३-११, ११-३ असा मोडून काढला. देसाईने सुरुवातीला शानदार खेळ केला. परंतु, जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानावर असलेल्या फ्रेटसने १-३ अशा पिछाडीनंतरही संयम न सोडता हरमीतला चुका करण्यास भाग पाडत सामना आपल्या नावे केला. या स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे जागतिक क्रमवारीत ८७व्या स्थानावरील देसाई किमान ‘टॉप ६०’मध्ये येणे अपेक्षित आहे.

जीत चंद्रा चॅम्पियन!
भारताचा युवा टेबल टेनिसपटू जीत चंद्राने ओमान ओपन टेबल टेनिस स्पर्धेच्या २१ वर्षांखालील गटात जेतेपद पटकावले. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात चंद्राने जागतिक क्रमवारीतील दुसर्‍या क्रमांकाचा खेळाडू मानव ठक्कर याला सरळ गेममध्ये पराभूत केले.
पुरूष एकेरीच्या सामन्यात चंद्राने ठक्करला केवळ २४ मिनिटे चाललेल्या सामन्यात ११-६,११-७,१३-११ असे गारद केले. दिया चितळे व अर्चना कामत यांना महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत लीन ये व झेंग जियान यांनी ३-१ असे पराजित केले.