(अग्रलेख) कोरोनाला हरवूया

0
289

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण काल दहा दिवसांपर्यंत वाढले. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी देखील २०.५७ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. कोरोनाशी लढत असलेल्या भारताची वाटचाल योग्य मार्गाने चालली असल्याचे संकेत हे आकडे देत आहेत. दिवसागणिक नवनव्या रुग्णांची भर पडणे अजून थांबलेेले नाही, त्यामुळे कोरोना रुग्णांचा आलेख खाली येऊ शकलेला नाही, हे जरी खरे असले, तरी त्याच्या फैलावाची गती सध्या तरी धीमी आहे असे वरील आकडे दर्शवत आहेत. याचे संपूर्ण श्रेय अर्थातच देशभरात लागू असलेल्या संपूर्ण संचारबंदीला आहे यात शंका नाही.

या संपूर्ण संचारबंदीला आता एक महिना पूर्ण झाला. एकशे तीस कोटी लोकसंख्येचा हा विशाल देश एवढा प्रदीर्घ काळ संपूर्ण संचारबंदीखाली यापूर्वी कधीच नव्हता. परंतु सुशिक्षितांपासून अल्पशिक्षित, अशिक्षितांपर्यंत कोरोनाच्या संकटाच्या गांभीर्याचा संदेश या संपूर्ण संचारबंदीने आतापावेतो पोहोचवला आहे. जनतेच्या सार्वजनिक वर्तणुकीमध्ये बदल दिसू लागला आहे. काही भागांचे अपवाद सोडले तर सर्वसाधारणतः सामाजिक अंतर स्वतःहून पाळले जात आहे. लोक गरजेनुरूप बाहेर पडताना मुखावरण घालूनच बाहेर पडत आहेत. हा जनमानसातील सकारात्मक बदलच देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला निश्‍चित यशापर्यंत घेऊन जाणार आहे.

कोरोनाविरुद्धचा हा लढा त्यावरील लस उपलब्ध होईपर्यंत पुढील किमान चार – पाच महिने तरी सर्वशक्तीनिशी लढावा लागणार आहे. सरकारद्वारे सक्ती करून नव्हे, तर स्वेच्छा जनसहभागाद्वारे तो लढला गेला तरच तो यशस्वी ठरेल. आजवरच्या विविध उपाययोजनांमुळे देशातील सध्याची एकूण रुग्णसंख्या तेवीस हजारांच्या घरात आहे. संपूर्ण संचारबंदी नसती तर इतर देशांप्रमाणे एव्हाना ती किमान एक लाखांवर गेली असती आणि आपल्या सार्‍या आरोग्य यंत्रणा कोसळून पडल्या असत्या.

देशात पाच लाखांवर कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या आहेत आणि हे प्रमाणही येत्या दिवसांत वाढत जाणार आहे. केंद्र सरकारने काल दिलेल्या माहितीनुसार आणखी नऊ लाख लोक देशभरात निगराणीखाली आहेत. विदेशांतून आलेले लोक, त्यातही विमानतळांवर ज्यांची तपासणी झाली नाही असे किंवा तेव्हा कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले लोक, त्यांच्या संपर्कात आलेले लोक अशा सर्वांपर्यंत पोहोचून विविध राज्य सरकारांनी त्यांना विलगीकरणाखाली ठेवलेले आहे. कोरोना फैलावाच्या काळात देशांतर्गत प्रवास केलेल्यांचाही त्यात समावेश आहे. शिवाय केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांनुसार राज्याराज्यांत जे आरोग्य सर्वेक्षण केले गेले आहे, त्यातून ताप व सर्दीसदृश्य लक्षणे असलेल्या लोकांच्याही यापुढील काळात चाचण्या होणार आहेत. या सगळ्या खटाटोपानंतरच रुग्णांची नेमकी संख्या, कोरोनाच्या फैलावाचे प्रत्यक्ष स्वरूप कळू शकेल.

सध्या सरकारपाशी असलेली आकडेवारी प्रत्यक्ष कोरोना निदान झालेल्या रुग्णांची आहे आणि तिची खातरजमा करण्यासाठी केंद्र सरकारने इतर निकषांचाही वापर केलेला आहे. राज्यांच्या आरोग्य खात्यांनी केलेले सर्वेक्षण, पंतप्रधान आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रमाण, औषधांच्या वापराचे सध्याचे प्रमाण असे इतर निकष पडताळून पाहून केंद्र सरकार या निष्कर्षाप्रत आलेले आहे की जी कोरोना रुग्णांची अधिकृत आकडेवारी आहे, तीच बव्हंशी बरोबर आहे. तिच्या व्यतिरिक्त छुपी रुग्णसंख्या वगैरे कुठे दिसून आलेली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत तरी या अधिकृत आकडेवारीलाच ग्राह्य धरणे योग्य ठरेल. चाचण्यांची संख्या जशी वाढेल, तसे कोरोना फैलावाचे स्वरूप आणि कलही कळून चुकेल. परंतु आतापावेतोची आकडेवारी बारकाईने तपासली तर भारत सरकारने कोरोनाला बर्‍याच प्रमाणात वेसण घालण्यात यश मिळवले आहे हे मान्य केले गेले पाहिजे. काल आणखी तीन राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली गेली. दिल्लीतून उंटावरून शेळ्या न हाकता देशातील कोरोना हॉटस्पॉट मानल्या गेलेल्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून ही उच्चस्तरीय पथके उपाययोजनांसंबंधी सूचना करीत आहेत ही अतिशय प्रशंसनीय बाब आहे. त्याचा फायदा कोरोनाविरुद्धच्या लढ्याला निश्‍चित होईल. काल पंतप्रधानांनी देशाच्या विविध भागांतील सरपंचांशी व्हिडिओ परिषदेद्वारे संवाद साधला. गावागावांतून स्वयंस्फूर्तीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कशा केल्या गेल्या आहेत, त्याचे दर्शन या परिषदेतून घडले. जे या परिषदेत सांगितले गेले, तशा प्रभावी प्रकारे खरोखरच गावोगावी उपाययोजना होऊ शकल्या, तर कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागात होणे निश्‍चितपणे टळेल. देशातील कोरोनाने कहर मांडलेल्या शहरांतून आपल्या गावाकडे जाऊ इच्छिणारे लोक आणि स्थानिक गावकरी यांच्यात येणार्‍या काळात संघर्ष उफाळण्याची भीती आहे आणि त्यासंदर्भातही योग्य नियोजन गरजेचे आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांची सीमाबंदी उठवली गेली आणि कोरोना हॉटस्पॉटस्‌मधून मोठ्या संख्येने माणसे गावोगावी परतू लागली तर अनवस्था प्रसंग उद्भवू शकतो. तोवर उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकले तर गावाकडे परतण्याचे हे प्रमाण घटेल. त्यासाठी नवी कार्यसंस्कृती उद्योग व्यवसायांना अर्थातच अंगिकारावी लागणार आहे. कामाचे तास बदलावे लागतील, घरून काम करण्यास प्रोत्साहन द्यावे लागेल, पाळ्यांमध्ये बदल करावे लागतील. कमीत कमी सार्वजनिक वर्दळ वाढेल याची काळजी घेऊनच ही चहलपहल सुरू करावी लागेल. गोव्यात बहुतेक उद्योगधंदे सुरू झाले आहेत. सध्याची कोरोनामुक्त स्थिती कायम राहू शकली तर लॉकडाऊन संपेल तेव्हा सर्व उद्योगव्यवसाय सुरू होऊ शकतील. परंतु तरी देखील सामाजिक दूरी, मुखावरणे, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे आदी खबरदारीच्या उपाययोजना प्रत्येकाला पुढील तीन चार महिने तरी कराव्याच लागणार आहेत. पूर्वीसारखे मुक्त जीवन सुरू व्हायला अद्याप अवकाश आहे याचे भान जनतेला ठेवावेच लागेल. राज्य सरकारने यापुढे राज्यात मास्कस्‌ची सक्ती केलेली आहे आणि तो न वापरणार्‍यास दंड आकारला जाणार आहे. परंतु या दंडापेक्षाही तो न वापरल्यामुळे कोरोनाचा असलेला धोका कितीतरी पटींनी मोठा आहे याची जाणीव जनतेनेही ठेवली पाहिजे. आधी म्हटल्याप्रमाणे कोरोनाला केवळ सरकार हरवू शकत नाही. जनतेची साथ असेल तरच कोरोना हरेल आणि आपल्या मार्गातून हटेल!