अग्नीशामक दल नागरिकांना देणार अग्नीसुरक्षेचे धडे गावोगावी जाऊन

0
186

राज्यातील लोकांना अग्नी सुरक्षाविषयी शिक्षण देण्याचे काम आता गोवा अग्नीशामक दल करणार आहे. या कामासाठी या दलाच्या दिमतीला ३८ लाख रुपये किमतीची खास व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली असून अग्नी सुरक्षेसंबंधी लोकांना धडे देण्यासाठी ही व्हॅन राज्यभरात फिरणार आहे. या दलाचे संचालक अशोक मेनन यांनी ही माहिती या व्हॅनचे उद्घाटन केल्यानंतर दिली.

अग्नी सुरक्षेसंबंधी लोकांमध्ये जागृती घडवून आणणे गरजेचे आहे, असे दिसून आल्याने दलाने ही व्हॅन खरेदी केली आहे. आग लागू नये यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी. तसेच आग लागल्यास ती कशी नियंत्रणात आणावी यासंबंधीची माहिती गावा-गावात ही व्हॅन फिरवून देण्यात येणार असल्याचे मेनन यानी यावेळी सांगितले. व्हॅनमध्ये एक स्क्रीन असून ह्या स्क्रिनचा वापर करून लोकांना अग्नी सुरक्षेसंबंधीची माहिती पुरवण्यात येणार आहे. तसेच व्हॅनमध्ये ऑक्सिजनचीही सोय आहे.

गर्दीच्या ठिकाणी, बाजार परिसर, पंचायत क्षेत्र व अन्य ठिकाणी ही व्हॅन नेऊन लोकांना अग्नी सुरक्षेसंबंधीची माहिती देण्याचे काम सोमवारपासून (काल) सुरू करण्यात आल्याचे मेनन यानी यावेळी सांगितले.