अखेर टी-२० विश्वचषक पुढे ढकलला

0
130

>> आयसीसीने केली अधिकृत घोषणा; तीन मुख्य स्पर्धांचा कालावधीही निश्‍चित

कोरोना महामारीचा फटका संपूर्ण क्रीडा जगताला बसलेला आहे. या महामारीमुळे बर्‍याच मोठ्या स्पर्धा रद्द झाल्यात वा पुढे ढकलल्या गेल्या आहे. त्यात आता आणखी एका मोठ्या स्पर्धेची भर पडली आहे. आयसीसीने अखेर टी-२० विश्वचषकाचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तशी अधिकृत घोषणा आयसीसीने काल केली आहे. आता ही स्पर्धा पुढील वर्षी होणार आहे.
सर्वांचे आरोग्य व सुरक्षा लक्षात केंद्रस्थानी ठेवून हा निर्णय घेतला असल्याचे आयसीसीने सांगितले.

वास्तविक ही स्पर्धा यंदा १८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरोना महामारीच्या संकटामुळे ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थता दर्शविल्याने आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीही कोरोनामुळे देशात उद्भवलेली सद्यस्थिती पाहता टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणे अशक्य असल्याचे जाहीर केले होतेे. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलणे ही केवळ औपोचारिकताच बाकी होती. ही स्पर्धा पुढे ढकलण्याबरोबरच आयसीसीने तीन मुख्य स्पर्धांसाठीचे कालावधीही निश्‍चित केले आहेत. यात २ टी-२० विश्वचषक आणि १ वनडे विश्वचषकाचा समावेश आहे. यंदाचा टी-२० विश्वचषक आता पुढील वर्षी २०२१मध्ये होईल. पुढील वर्षी तो विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित केला जाईल. अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळविण्यात येणार आहे. तर २०२१ चा विश्वचषक २०२२मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित केला जाईल. अंतिम लढत १३ नोव्हेंबरला होईल. तर २०२३ चा वनडे विश्वचषक भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळविण्यात येणार असून त्याचा अंतिम सामना २६ नोव्हेंबरला होईल. त्याचबरोबर पुढीलवर्षी फेब्रुवारीला न्यूझीलंडमध्ये होणार्‍या महिला वनडे विश्वचषकाबद्दही पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयसीसीकडून सांगण्यात आले आहे.

आयपीएलचा मार्ग मोकळा
दरम्यान, टी-२० विश्वचषक पुढे ढकलला गेल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी इंडियन प्रीमियर लीग २०२० (आयपीएल) स्पर्धा खेळविण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आयपीएल २०२० स्पर्धा एप्रिल-मे महिन्यात खेळविली जाणार होती. परंतु कोरोना महामारीच्या वाढत्या संकटामुळे ती अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. आशिया चषकानंतर आता टी-२०विश्वचषकही यंदा होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या वर्षीच आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असेल. त्यासाठी सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये ४-५ आठवड्यांच्या कालावधीत छोटेखानी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचे बीसीसीआयचे लक्ष्य असेल. भारतात या स्पर्धेचे आयोजन शक्य नसल्यास बीसीसीआयकडे परदेशात त्याचे आयोजन करण्याचाही पर्याय खुला आहे. साधनसुविधांचा विचार केल्यास शक्यतो दुबईत या स्पर्धेेचे आयोजन होऊ शकते.