अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन मराठीच्या वाङ्‌मयीन संस्कृतीचा मानबिंदू

0
345
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन… १८७८ ते २०१८ या दीर्घकालाची अथक परिक्रमा… बडोद्याला होणारे ९१ वे मराठी साहित्यसंमेलन म्हणजे शतकपूर्तीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल… म्हणून या अधिवेशनाचे महत्त्व आगळे-वेगळे… शिवाय ते महाराष्ट्राबाहेरच्या भूमीत भरत आहे… या भूमीने मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचे निष्ठेने व ममत्वाने लालन-पालन केलेले आहे…

 

अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन… १८७८ ते २०१८ या दीर्घकालाची अथक परिक्रमा… बडोद्याला होणारे ९१ वे मराठी साहित्यसंमेलन म्हणजे शतकपूर्तीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल… म्हणून या अधिवेशनाचे महत्त्व आगळे-वेगळे… शिवाय ते महाराष्ट्राबाहेरच्या भूमीत भरत आहे… या भूमीने मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचे निष्ठेने व ममत्वाने लालन-पालन केलेले आहे… सयाजीराव गायकवाड या कृतिशील राजकर्त्याने मराठी भाषेला सर्वतोपरी प्रोत्साहन दिले… वाङ्‌मयनिर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण केले. विद्वानांबद्दल आणि प्रज्ञावंतांविषयी आदरभाव बाळगला. एवढेच नव्हे तर १९३२ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
आजपर्यंत भरलेल्या ९० अधिवेशनांपैकी दोन अधिवेशने यापूर्वी बडोद्याला भरविली गेली. १९२१ साली साहित्यसम्राट नरसिंह चिंतामणी केळकर यांनी येथे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांनी मांडलेली ‘सविकल्प समाधी’ची संकल्पना आजही साहित्यविचारात स्वीकारार्ह वाटते. दुसरे अधिवेशन १९३४ साली नारायण गोविंद चापेकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले. त्यांच्यासारख्या भाषाव्यवहाराचे सूक्ष्म परिशीलन केलेल्या आणि संशोधकाचा मनःपिंड असलेल्या प्रज्ञावंतामुळे या व्यासपीठाला विशेष उंची प्राप्त झाली होती… आताचे हे अध्यक्षपद लक्ष्मीकांत देशमुखांसारखे निर्मितिशील साहित्यिक भूषवीत आहेत. कादंबरी आणि कथा या वाङ्‌मयप्रकारात त्यांनी पृथगात्म ठसा उमटविला आहे. नाट्यक्षेत्रातही त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आय.ए.एस. अधिकारी आणि माजी जिल्हाधिकारी असलेल्या या सृजनशील साहित्यिकाने प्रशासकीय अनुभवांवर आधारलेले ग्रंथलेखनही केले आहे. समाजमनस्क आणि संवेदनशील असलेल्या लक्ष्मीकांत देशमुखांनी समाजोपयोगी प्रकल्प राबविले आहेत. वाङ्‌मयीन क्षेत्रात आपल्याकडून अभिनव स्वरूपाचे विधायक कार्य घडावे याचा त्यांना निरंतर ध्यास लागून राहिलेला असतो. १८७८ साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या प्रेरणेने पुण्यात पहिले साहित्यसंमेलन भरले. त्यांच्यासमवेत लोकहितवादी (गोपाळराव हरी देशमुख) हेही होते. संमेलनाची ही गंगोत्री. तिचा आता गंगाप्रवाह झालेला आहे. तो आता साहित्याचा विराट स्वरूपाचा महोत्सव झालेला आहे. महाराष्ट्राच्या गेल्या दीडशे वर्षांच्या इतिहासात अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे झाली. याचा परिणाम येथील मराठी भाषा आणि वाङ्‌मय या महत्त्वपूर्ण घटकांवर झाला. अनेक बाबी कालौघामध्ये विस्मृतीत गेल्या. पण १८७८ मध्ये सुरू झालेले ‘मराठी साहित्य संमेलन’ आणि १९०९ मध्ये सुरू झालेली दिवाळी विशेषांकांची परंपरा अक्षय स्वरूपात टिकून राहिली.

मराठी साहित्यसंमेलनाच्या संदर्भात विचार करताना स्वातंत्र्यपूर्व साहित्यजगत आणि स्वातंत्र्योत्तर साहित्यजगत यांत जमीन-अस्मानाचा फरक आढळतो. स्वातंत्र्याची धुनी प्रज्ज्वलित करण्यासाठी ज्वलंत विचारांचे व्यासपीठ म्हणून त्या काळात मराठी साहित्यसंमेलनाकडे पूर्वसूरींनी पाहिले. आत्मावलोकनाच्या दृष्टिकोनातून पाहिले. तर अनेक प्रज्ञावंतांनी आणि प्रतिभावंतांनी आपल्या जीवनातील जे जे उदात्त, उत्कट, मंगल, भव्य आणि दिव्य असेल ते ते या संमेलनाच्या व्यासपीठावरून समर्पणवृत्तीने दिले. ते नवनीत ‘महाराष्ट्र साहित्यपरिषदे’सारख्या शिखरसंस्थेने जनमानसाकरिता उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या तीन खंडांनंतर ते कार्य खंडित झालेले असले तरी अन्य माध्यमांतून अध्यक्षपदावरील भाषणांची संहिता आज उपलब्ध आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद लाभणे हा आपल्या वाङ्‌मयीन कर्तृत्वाचा सर्वोच्च सन्मान आहे अशी त्या कालखंडातील साहित्यिकांची भावना होती. त्या काळात वाङ्‌मयाच्या उपासकाला मान होता. विशेष चुरशीविना ही निवड सहजतेने घडून येत असे. देशाला स्वातंत्र्य मिळाले. पुढे प्रजासत्ताक आले. लोकशाही युगात व्यक्तिस्वातंत्र्याचा नवा मनू सुरू झाला. ‘पिंडे पिंडे मतिर्भिन्ना’ या न्यायाने विविध समाजघटकांच्या धारणा बदलल्या. युगमानसानुसार आलेल्या विचारप्रवाहांबरोबर भूमिका घेऊन जगण्याची नवी ईर्षा निर्माण झाली. याचा परिणाम सृजनात्मकतेबरोबर वाङ्‌मयीन अभिरूचीवर झाल्यावाचून राहिला नाही. साहित्यनिर्मिती ही सदैव आनंद देणारी बाब. ते आपल्या स्वप्नातील नंदनवन. वाङ्‌मयीन वातावरण चैतन्यमय ठेवणारे साहित्यसंमेलन हे अग्निहोत्र; परंतु त्याच्यासंबंधी निर्माण झालेली मतमतांतरे… मनातील स्वप्नभूमी जेवढी खरी तेवढेच तिच्यातील हे नवे दाहक वास्तवही खरे… त्यामुळे स्वप्नभूमीवरची निष्ठा ढळता कामा नये.

पहिली सहा साहित्यसंमेलने पुण्यात भरविली गेली. या मूलारंभी मराठी भाषा व वाङ्‌मय यांच्या अभिवृद्धीसाठी ‘महाराष्ट्र-साहित्य-परिषद’ ही संस्था निर्माण व्हावी ही कल्पना अनेकांच्या मनात रुजली. ती प्रत्यक्षात साकार झाली १९०६ साली… ही संमेलने ‘ग्रंथकार संमेलन’ या नावाने भरविण्यात आली. १९०७ ते १९६४ या कालावधीतील संमेलने ‘महाराष्ट्र-साहित्य-परिषदे’तर्फे भरवण्यात आली. महाबळेश्‍वर येथे २००९ मध्ये निर्वाचित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी राजीनामा दिल्यामुळे अध्यक्षाशिवाय साहित्यसंमेलन पार पडले. ही काही इष्ट घटना घडली नाही. विचारांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मानणार्‍यांनी अंतर्मुख व्हावे अशी ती बाब होय.

मूल बीजाचा महावृक्ष झाला त्या साहित्यसंमेलनाकडे आज मागे वळून पाहताना काय आढळते. विचारांच्या या मंथनप्रक्रियेतून वाङ्‌मयीन संस्कृतीच्या अभिसरणप्रक्रियेला गती आली. स्थितिगतीचा वस्तुनिष्ठ वृत्तीने मागोवा घेतला गेला. वाङ्‌मयाच्या निर्मितीबरोबरच तिची समीक्षा होणे व संशोधन होणे आवश्यक आहे याविषयी प्रतिपादन केले गेले. भोवताली घडणार्‍या राजकीय, सामाजिक स्थित्यंतराचे पडसाद या संमेलनात उमटले गेले. सांस्कृतिक तापमानाचा ‘बॅरोमीटर’ म्हणूनच संमेलनाकडे पाहिले गेले. नव्या वाङ्‌मयमंदिरातील अधिष्ठात्री देवता स्वदेशभक्ती होय, हा विचार दृढमूल झाला.

सृजनशीलतेच्या क्षेत्रातील फार मोठ्या दिग्गजांनी या वाग्देवीच्या व्यासपीठावरून आपले मौलिक विचार मांडले. त्यांत विविध प्रकृतिधर्माच्या व्यक्ती होत्या. हरी नारायण आपटे, नरसिंह चिंतामण केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, शि. म. परांजपे, प्रा. वा. म. जोशी, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, श्री. म. माटे, भा. वि. वरेरकर, ग. त्र्यं. माडखोलकर, यशवंत, वि. द. घाटे, अनंत काणेकर, अनिल, कुसुमाग्रज, पु. शि. रेगे, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत, वामनराव चोरघडे, गो. नी. दांडेकर, प्रा. गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, शंकर पाटील, विश्राम बेडेकर, वसंत कानेटकर, के. ज. पुरोहित (शांताराम), मधु मंगेश कर्णिक, रमेश मंत्री, विद्याधर गोखले, राम शेवाळकर, द. मा. मिरासदार, नारायण सुर्वे, शांताबाई शेळके, ना. सं. इनामदार, वसंत बापट, विजया राजाध्यक्ष, राजेंद्र बनहट्टी, सुभाष भेंडे, केशव मेश्राम, मारुती चितमपल्ली, अरुण साधू, डॉ. आनंद यादव, प्रा. वसंत आबाजी डहाके, उत्तम कांबळे, प्रा. फ. मुं. शिंदे या प्रथितयश लेखक-कवींनी हे पद मंडित केले.

चिं. वि. वैद्य, माधव श्रीहरी अणे, नारायण गोविंद चापेकर, दत्तो वामन पोतदार, प्रा. न. र. फाटक, आचार्य शं. द. जावडेकर, प्रा. अ. का. प्रियोळकर, प्रा. कृ. पां. कुलकर्णी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. शं. दा. पेंडसे, प्रा. श्री. के. क्षीरसागर, प्रा. रा. श्री. जोग, प्रा. कुसुमावती देशपांडे, काकासाहेब गाडगीळ, प्रा. वा. ल. कुलकर्णी, डॉ. वि. भि. कोलते, प्रा. गं. बा. सरदार, डॉ. यु. म. पठाण, डॉ. य. दि. फडके, डॉ. रा. ग. जाधव, प्राचार्य म. द. हातकणंगले, डॉ. नागनाथ कोत्तापले, डॉ. सदानंद मोरे, डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. श्रीपाल सबनीस या प्रज्ञावंतांनी आणि सव्यसाची समीक्षकांनी हे पद भूषविले आहे. यांतील अनेकांनी सृजनात्मक साहित्यातही आपली लखलखीत मुद्रा उमटविली आहे. या सगळ्यांचाच निर्देश केला, कारण या सगळ्यांचेच वाङ्‌मयीन कर्तृत्व मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी आणि साहित्याच्या समृद्धीसाठी लक्षणीय स्वरूपाचे आहे. मराठीच्या वैभवासाठी विविध लेणी वेळोवेळी चढविण्याचे महान कार्य त्यांनी केलेले आहे. पारतंत्र्याच्या प्रतिकूल कालखंडात तसेच स्वातंत्र्याच्या अनंत आव्हानांच्या काळातही.
मराठी भाषेला शतकानुशतकांची परंपरा आहे. मौखिक स्वरूपाची समृद्ध परंपरा तिला लाभली आहे. या लोकगंगेने तिला उत्कट जीवनरस पाजलेला आहे. महानुभाव, संत, पंडित, शाहीर-कवी-लेखकांनी अथक तपश्‍चर्या केल्यामुळे शब्दकळा, प्रतिमासृष्टी, विचारसामर्थ्य आणि अभिव्यक्तिसौंदर्य याने मराठी भाषा समृद्ध झाली. ज्ञानदेव-तुकाराम हा इतरेतर द्वंद्वसमास म्हणजे मराठी संस्कृतीचे दोन मानदंड. मराठी साहित्यसंमेलनाने कालप्रवाहात अनेक कालवे आणि पाट काढून महाराष्ट्रभूमीचे सिंचन करण्याचे ऐतिहासिक उत्तरदायित्व उत्तम रीतीने पार पाडले. पूर्वपरंपरेपासून आजतागायत ही धारा अखंडित चालू राहिली म्हणूनच मराठी भाषा आज अभिजात भाषेच्या वैभवशाली उंबरठ्यापर्यंत येऊन पोचली आहे.
या छोटेखानी लेखात साहित्यसंमेलनातील महामंथनातून आलेल्या विचारांचा मागोवा घेणे ही अतिशय कठीण बाब आहे. मराठीतील नामवंत अभ्यासकांनी यापूर्वी तो सविस्तरपणे घेतलेला आहे.

साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या भाषणाचा उल्लेख यापूर्वी येऊन गेलेला आहे. हरी नारायण आपटे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मा. श्री. अणे, शि. म. परांजपे, प्रा. वा. म. जोशी, डॉ. श्रीधर व्यंकटेश केळकर, कृ. प्र. खाडिलकर, ना. गो. चापेकर, माधवराव पटवर्धन, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, दत्तो वामन पोतदार, प्रा. ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, प्रा. श्री. म. माटे, भा. वि. वरेरकर, ग. त्र्यं. माडखोलकर, प्रा. न. र. फाटक, आचार्य शं. द. जावडेकर, यशवंत, प्रा. अ. का. प्रियोळकर, प्रा. कृ. पां. कुलकर्णी, वि. द. घाटे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. शं. दा. पेंडसे, अनंत काणेकर, अनिल, प्रा. श्री. के. क्षीरसागर, प्रा. रा. श्री. जोग, कुसुमावती देशपांडे, काकासाहेब गाडगीळ, कुुसुमाग्रज, प्रा. वा. ल. कुलकर्णी, डॉ. वि. भि. कोलते, प्रा. पु. शि. रेगे, दुर्गा भागवत, प्रा. गंगाधर गाडगीळ, प्रा. गं. बा. सरदार, प्रा. वसंत कानेटकर, प्रा. के. ज. पुरोहित (शांताराम), प्राचार्य राम शेवाळकर, मधु मंगेश कर्णिक, प्रा. रा. ग. जाधव, प्राचार्य म. द. हातकणंगलेकर, डॉ. विजया राजाध्यक्ष, प्रा. वसंत आबाजी डहाके, डॉ. य. दि. फडके इत्यादिकांची वृत्तिगांभीर्याने ठासून भरलेली विचारपरिप्लुत भाषणे वाचावीत. एका प्रातिनिधिक ज्ञानयुगातील प्रातिभ दर्शन त्यात घडेल. प्रसन्नचित्त आणि समांतरपणे अंतर्मुख करणारा हा अनोखा अनुभव आहे. पु. ल. देशपांडे, गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, मारुती चितमपल्ली, वसंत बापट, विद्याधर गोखले, वामनराव चोरघडे, शंकरराव खरात, शंकर पाटील, केशव मेश्राम, डॉ. सुभाष भेण्डे आणि फ. मुं. शिंदे यांसारख्या सृजनशील साहित्यिकांची आनंदयात्रा या संमेलनातील भाषणांच्या रूपाने अनुभवायला मिळते.

अनेक साहित्यिकांनी आपापल्या नव्या उपपत्ती या संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठी साहित्यजगताला दिल्या. ना. सी. फडके यांनी कलावादाचा पुरस्कार केला. वि. स. खांडेकरांनी ‘जीवनासाठी कला’ ही वाङ्‌मयीन भूमिका मांडली. मराठी साहित्यजगतात काही काळ कलावाद आणि जीवनवाद याविषयी मंथनप्रक्रिया होत राहिली. अनेक वाङ्‌मयीन नियतकालिकांनी आपापली भूमिका हिरिरीने मांडली. त्यामुळे वाङ्‌मयीन वातावरण चैतन्यमय राहिले. ज्या समाजाच आपण वावरतो, जे भौतिक जीवन आपण जगतो ते तर महत्त्वाचे असतेच. पण समाजात सुसंस्कृत, अभिरूचिसंपन्न आणि उन्नत माथ्याने वावरायचे असेल तर वाङ्‌मयाची साधना आणि उपासना आवश्यक आहे याचे अधोरेखन हरी नारायण आपटे यांनी अकोला येथे १९१२ मध्ये भरलेल्या आठव्या संमेलनात केले होते. ते त्यावेळी म्हणाले होते ः
‘‘वाङ्‌मय हे राष्ट्राच्या उन्नतीचे कारणही आहे आणि कार्यही आहे. राष्ट्राचा जसजसा उत्कर्ष होतो, तसतसा वाङ्‌मयाचा उत्कर्ष होतो आणि वाङ्‌मयाला जितके जितके उज्ज्वल व उन्नत स्वरूप येत जाईल, तितके तितके राष्ट्राच्या उन्नतीला व उज्ज्वलतेला ते कारण होते. वाङ्‌मयाच्या योगाने आमची विचारशक्ती उद्दीप्त होते, आमचे मनोविकार जागृत होतात, आमचे अंतःकरण उल्हसित होते. आमच्या पूर्वजांनी संग्रहित केलेल्या ज्ञानाचा, त्याचप्रमाणे ज्यांच्या ज्यांच्याशी आमचा संबंध येतो, त्यांनी त्यांनी संग्रहित केलेल्या ज्ञानाचा उपयोग करून आम्हास आपल्या ज्ञानात व भावी पिढ्यांच्या ज्ञानात भर घालता येते.’’
यासंदर्भात प्रा. अ. का. प्रियोळकर यांनी कारवारला १९५१ ला भरलेल्या ३५व्या मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून काढलेले उद्गार आपल्याला विचारसन्मुख करतात ः
‘‘देशाचे वाङ्‌मय हे राष्ट्रीय धन आहे. सोन्यामाणकांचे धन एकवार गेले तर ते फिरून मिळेल; परंतु हस्तलिखित स्वरूपात असलेल्या या वाङ्‌मयधनाचा एकदा का नाश झाला, म्हणजे ते पुन्हा मिळणे नाही.’’
दत्तो वामन पोतदार यांनी १९३९ साली अहमदनगर येथे भरलेल्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून ‘मराठी शिक्षण हा आपल्या मराठी वाङ्‌मयाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे’ असे सांगून आमच्या शिक्षणात मराठी शिक्षणाचा पाया उत्कृष्ट व भक्कम होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. तत्कालीन राज्यशासन आणि विद्यापीठे यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे याविषयीची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रा. ना. सी. फडके यांचाही साहित्यविषयक दृष्टिकोन असाच सुजाण आणि प्रगल्भ आहे ः
‘‘कोणत्याही समाजाचं साहित्य हे त्या समाजाची कर्तृत्वशक्ती, विचारसंपत्ती आणि प्रगतिक्षमता दर्शविणारं भूषण होय. इतर समाजांपेक्षा अधिक सन्मानाचं स्थान मिळविण्याची आपली महाराष्ट्रीयांची महत्त्वाकांक्षा असेल- आणि तशी ती आसायला हवी- तर आपल्या साहित्याचं भूषण इतर सर्व प्रांतांच्या साहित्यापेक्षा अधिक तेजस्वी ठरावं अशी आपली इच्छा अन् खटपट असली पाहिजे.’’
प्रा. माधवराव पटवर्धन आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी गतिमान युगाला अनुसरून लिपिशुद्धीचा आणि भाषाशुद्धीचा आग्रह धरला. सावरकरांची तर धारणा अशी होती की नागरी लिपी ही राष्ट्रीय लिपी व्हावी.
स्वातंत्र्य हे जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य मानून सावरकरांनी या शारदेच्या व्यासपीठावरून असे उद्गार काढले ः ‘‘सरस्वतीचा एक उपासक या नात्याने मी तुम्हास सांगतो की, आपल्या तरुण पिढीने आता लेखणी मोडून टाकावी आणि बंदूक उचलावी! साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक!’’
वि. दा. सावरकरांनी ज्या काळात हे सांगितले त्या काळाची ती गरज होती. स्वातंत्र्यकाल समीप आल्याचे प्रा. श्री. म. माटे यांच्यासारख्या द्रष्ट्या, संवेदनशील आणि समाजमनस्क साहित्यिकाला १९४३ मध्येच जाणवले होते. म्हणून प्रतिभावंताचा मोहरा स्वकीयांकडे वळला पाहिजे असे त्यांना वाटले. सांगली येथे भरलेल्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते म्हणाले होते, ‘‘लेखकवर्गाचा मोहरा घसघशीतपणे समाजाकडे वळला पाहिजे म्हणजे त्यांच्या हातून वाटेल तितके जिवंत वाङ्‌मय तयार होईल.’’

कालानुरूप येणारे वारे आपल्या अंगावर झेलले पाहिजेत आणि आपल्या जीवनाची भविष्यकालीन वाटचाल करायला पाहिजे, असे आचार्य शं. द. जावडेकर यांना वाटते. यासाठी ते म्हणतात ः
‘‘भारतीय संस्कृती ही आता भक्तियुगातून क्रांतियुगात जात आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. श्रद्धायुग संपले आणि विवेकयुग प्राप्त झाले अशीही ग्वाही आपण फिरविली पाहिजे. भक्तियुगात ज्याप्रमाणे भक्ती नावाचा एक नवा रस मराठी वाङ्‌मयात निर्माण झाला, त्याचप्रमाणे आज मराठी वाङ्‌मयात क्रांतिरस नावाचा नवा रस निर्माण होत आहे, असे मला केशवसुतांचे काव्य वाचीत असता वाटते.’’
बेळगाव येथे १९४६ मध्ये भरलेल्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून सव्यसाची साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राचे राज्य स्थापन होण्यासाठी आवाहन केले. ‘‘नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राचे जोपर्यंत एकीकरण होत नाही, तोपर्यंत मराठी भाषा आणि साहित्य यांचा सर्वांगीण विकास होणे अशक्य आहे,‘’ असे त्यांना जाणवले होते.

अशा रीतीने कालानुरूप समाजमानसात निर्माण होणारी स्पंदने प्रज्ञावंतांकडून आणि प्रतिभावंतांकडून व्यक्त होत राहिली. ऐन आणीबाणीत अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला. साहित्यिकांना व विचारवंतांना स्वराज्यातदेखील कारावास घडला. अशावेळी जाज्वल्य जीवननिष्ठा स्वीकारून व्रतस्थ वृत्तीने लेखन करणार्‍या दुर्गाबाई भागवतांना कर्‍हाडच्या ५१व्या साहित्यसंमेलनात म्हणावेसे वाटले की, विचार येथे मरू घातलेला आहे. ‘‘साहित्य हे आता राजकारणापासून तोडता यायचं नाही. परस्परसंबंध व सामंजस्य हे दोन गुण अशा साहित्याचं व्यवच्छेदक लक्षण समजले पाहिजे.’’

आजवर अशा प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत स्त्री-पुरुषांनी आपला वाग्विलास या व्यासपीठावरून प्रकट केला. ज्या अक्षरनिष्ठांना हे पद प्राप्त होऊ शकले नाही अशा मान्यवरांची मांदियाळी मोठी आहे. या सगळ्यांच्या कार्याचा आलोक नजरेसमोर ठेवून हे विहंगमावलोकन मनात पूर्ण करायचे आहे.