अखिलेश-मुलायम गटांचा सायकल चिन्हावर दावा

0
62

>> उभयतांतील प्रदीर्घ चर्चेनंतर तर्कवितर्क

 

सत्ताधारी समाजवादी पक्ष व पक्षाचे चिन्ह (सायकल) यावर आपलाच अधिकार असल्याचे दावे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव व त्यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी करून झाल्यानंतरही काल या पिता-पुत्रांमध्ये सुमारे दोन तास बोलणी झाली. या बोलण्यांमुळे उभय गटांमध्ये समझोता घडविण्याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आले असले तरी अखिलेश यादव गटातील ज्येष्ठ नेत्यांनी समझोत्याची वेळ टळून गेल्याचा दावा केला आहे.
अखिलेश-मुलायम दरम्यानच्या प्रदीर्घ चर्चेनंतर कोणत्याही गटातर्फे अधिकृत निवेदन जारी न झाल्यामुळे तर्क-वितर्क सुरूच राहिले आहेत. मुलायमसिंह यादव पक्षाच्या सायकल या चिन्हावर आपल्या गटाचाच अधिकार असल्याचा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दावा करून येथे परतल्यानंतर अखिलेश यादव यांनी त्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. नंतर दिल्लीहून राज्यात परतलेले मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव हेही मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र त्यांच्यातील चर्चेत काय झाले त्याचा तपशील उपलब्ध झालेला नव्हता.
या बैठकीनंतर अखिलेश गटाच्या एका नेत्याने पत्रकारांना सांगितले की आता समझोता करण्यास वाव राहिलेला नाही. सायकल चिन्ह कोणत्या गटाला मिळेल त्याचा निर्णय आता निवडणूक आयोगच घेईल असे त्यांनी स्पष्ट केले. अखिलेश-मुलायम भेटीआधी काल अखिलेश यांच्या गटाने त्यांची सपाचे अध्यक्ष म्हणून निवड केली.