अक्रमने दिला आठवणींना उजाळा

0
275

भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील सामन्यांदरम्यान दिसून येणारी खेळाडूंमधील खुन्नस सर्वांनाच माहीत आहे. या दोन्ही संघातील सामने बरेच चुरशीचे आणि रोमहर्षक झालेले दिसून येतात. दोन्ही संघादरम्यानच्या अनेक मालिका बर्‍याच अविस्मरणीय ठरलेल्या आहेत. पाकिस्तानचा माजी डावखुरा दिग्गज गोलंदाज वसिम अक्रमने भारत-पाक यांच्यात १९९९ साली रंगलेल्या कसोटी मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अक्रमने १९९९साली केलेला भारत दौरा हा त्याचा आवडता दौरा असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन याच्याबरोबर ‘लेसन लर्न विथ द ग्रेट’ पोडकास्टमध्ये बोलताना सांगितले.

१९९९च्या दौर्‍यात पाकिस्तान आणि भारत यांच्यातील कसोटी मालिका मालिका १-१ अशी बरोबरी संपली होती. नव्वदच्या दशकात आम्ही भारताविरुद्ध बर्‍याचदा जिंकलो. सध्या पाकिस्तान भारताविरुद्ध बर्‍याच वेळा पराभूत होताना दिसत आहे. परंतु नव्वदच्या दशकात ही गोष्ट पूर्णपणे वेगळी होती, असे अक्रमकी सांगितले.

भारताविरुद्धच्या आवडत्या दौर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास आपण १९९९ चा भारत दौरा निवडेल. विशेष म्हणजे आम्ही त्यावेळी १० वर्षांनी भारताचा दौरा करत होतो, असे अक्रम म्हणाला.
त्या दौर्‍यात अक्रम पाकिस्तानचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईत झालेला पहिला कसोटी सामना पाकिस्तानने १२ धावांनी जिंकला होता. त्यावेळी भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शेवटच्या दिवशी शतकही केले होते. परंतु तरीही भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.

या दौर्‍यात मी कर्णधाराची भूमिका निभावत होतो. पहिली कसोटी चेन्नईला होणार होती. मी संघातील खेळाडूंना सांगितले, जर स्टेडियम शांत असेल तर आपण चांगले खेळत आहोत. आपल्याला भारतात पाठिंबा मिळणार नाही आणि भारताला पाकिस्तानमध्ये पाठिंबा मिळणार नाही, असे अक्रमने स्पष्ट केले.

या सामन्यात सकलेन मुश्ताकने शानदार षटक टाकले होते. ‘दुसरा’ चा शोध त्याने लावला होता. चेन्नईतील प्रेक्षक आमच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवत होते. माझ्यासाठी तो माझा आवडता दौरा होता, असे अक्रमने सांगितले.

त्यानंतर दिल्लीत झालेल्या दुसर्‍या कसोटीत अनिल कुंबळेने एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना भारताने २१२ धावांनी जिंकला होता. परिणामी ही मालिका १-१ अशी बरोबरीत संपली होती. त्यामुळेही तो दौरा अविस्मरणीयच होता, असेही अक्रमने सांगितले.