अकबरनामा

0
145

गेल्या महिन्यात नवी दिल्लीतील औरंगजेब रोडचे नामांतर ए. पी. जे. अब्दुल कलाम रोड असे करण्यात आले, त्याच धर्तीवर अकबर रोडचे नामांतर राणा प्रताप मार्ग करावे अशी मागणी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केली आहे. लष्करप्रमुख पदावर राहिलेल्या सिंग यांच्यासारख्या व्यक्तीने ही मागणी करावी हे आश्‍चर्यकारक तर आहेच, परंतु औरंगजेब आणि अकबर यांना केवळ ‘मुसलमान’ या एकाच मापात तोलण्याचा जो प्रयत्न सिंग यांनी केला आहे तो त्यांच्या अकबराविषयीच्या अज्ञानाचे निदर्शक म्हणावे लागेल. दुसरे म्हणजे असे नामांतर करणे हे नगरविकास खात्याच्या अखत्यारित येत नाही, तर दिल्ली सरकारच्या आणि दिल्ली नगरपालिकेच्या हद्दीत येते. औरंगजेबाचे नाव हटवण्याची मागणी जेव्हा भाजपचे खासदार महेश गिरी यांनी केली तेव्हा दिल्ली पालिकेतील ‘आप’च्या सदस्यांनीही त्याला पाठिंबा दर्शवला होता, परंतु त्याचे कारण औरंगजेबाची नोंद भारताच्या इतिहासात एक धर्मांध, क्रूर शासक अशीच आहे. परंतु त्याच्या चार पिढ्यांआधी होऊन गेलेल्या अकबराला मात्र देश एक उदारमतवादी सम्राट म्हणूनच ओळखतो. इस्लामी कट्टरतावादाला विरोध करून ‘दीन ए इलाही’ हा नवा धर्म स्थापन करण्याचा प्रयत्न करणार्‍या आणि सर्व धर्मांचे सार समजून घेण्याची आयुष्यभर मनीषा बाळगणार्‍या अकबराकडे आपण केवळ तो मुघल सम्राट होता म्हणून पूर्वग्रहदूषित आणि कलुषित वृत्तीने पाहणे सयुक्तिक नाही. महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाला तर तोड नाहीच. या देशाच्या इतिहासात राणा प्रताप हे नाव अमर झाले आहे. आपल्या देशात आपल्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास शिकवला गेला नाही ही आजवरची शोकांतिका आहे. मुघलांचा इतिहास पाच पानांत आणि शिवाजी महाराजांचा आणि राणा प्रतापांचा पाच ओळींत ही आपल्या बुद्धिवाद्यांची आजवरची नीती राहिली. राणा प्रतापांचा गौरव व्हावा असे वाटत असेल तर त्यांचे नाव नवी दिल्लीतील एखाद्या महत्त्वाच्या रस्त्याला देणे निश्‍चितच योग्य ठरेल, परंतु अकबराचे नाव पुसून टाकून तेथेच राणा प्रतापाचे नाव द्या असे म्हणणे म्हणजे केवळ समाजामध्ये धार्मिक मूलतत्त्ववादाला संधी मिळवून देणारा धूर्त आटापिटा वाटतो. अकबराने चार महिने झुंज देऊन चितोडगडावर विजय मिळवताना एका दिवसात तेथील तीस हजार लोकांची कत्तल केली आणि त्या काळ्या दिवशी चितोडगडावरील स्त्रियांनी जौेहार करून स्वतःची अब्रू वाचवली हा जसा इतिहास आहे, तसाच अकबराने आपल्या हयातीत कडव्या मुसलमान मुल्ला मौलवींना विरोध केला, फतेहपूर सिक्रीतील आपल्या इबादतखान्यामध्ये विविध धर्मांच्या पंडितांना निमंत्रित करून तात्त्विक चर्चा घडवून धर्मतत्त्वे समजून घेतली, इस्लामची मूलतत्त्वे, शरियत झिडकारणारी फर्माने काढली, हिंदूंच्या यात्रांवरील कर रद्द केले हेही तितकेच खरे आहे. आग्र्यातील सिकंदर्‍यातील स्वतःच्या कबरीवर सर्व धर्मांची प्रतीके आवर्जून प्रस्थापित करणार्‍या अकबराचा उल्लेख नरहर कुरंदकरांसारखे विचारवंत ‘पुण्यश्लोक, पवित्र राजा’ असा करतात. अकबर निरक्षर होता परंतु ग्रंथप्रेमी होता. त्याने इस्लामच्या कुराणमधील आज्ञांची फिकीर केली नाही. स्वतःचा नवा धर्म स्थापला, नवे कायदे केले, बिरबल, तोडरमल, तानसेनसारख्या प्रतिभावंतांना सन्मानाने आश्रय दिला, संशोधकांस प्रोत्साहन दिले, वल्लाभाचार्यांचा पुत्र विठ्ठलेश्वर यांना गोकुळ इनाम देणारे फर्मान काढले. पडिक जमिनी लागवडीखाली आणल्या, मुले व स्त्रिया यांना गुलाम करता येणार नाही अशी आज्ञा काढली, सर्वांशी शांती प्रस्थापित करण्यासाठी ‘सुलाह इ कुल’ जारी केले, विवाहविषयक नवे कायदे आणले. हे सगळे करताना शरीयतची फिकीर केली नाही. रामायण – महाभारताच्या अनुवादाचे काम अकबराने हाती घ्यायला लावले होते. आपल्या हिंदू पत्नीला तिच्या महालात कृष्णपूजा करायलाही त्याने संमती दिली होती. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर अकबराची प्रतिमा इतर मुघल शासकांच्या तुलनेत उजळून निघते. अकबराची महानता त्याच्या उत्तराधिकार्‍यांनाही पेलवली नाही. त्याचा मुलगा सलीम ऊर्फ जहांगीर तर व्यसनी निघाला. शहाजहानला पुत्र औरंगजेबानेच कैदेत टाकले. इतिहास हा शेवटी बर्‍या वाईट घटनांच्या धाग्यांनी गुंफलेला असतो. तो आपल्याला बदलता येत नाही. परंतु अकारण काहीतरी उकरून काढायचे आणि तापल्या तव्यावर केवळ आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा जो प्रकार सर्रास चालला आहे, त्यातूनच नामांतराची ही मागणी पुढे झाली आहे एवढेच. यामागे प्रेम राणा प्रतापाचे नाही, मतांचे आहे!