अंडर-१९ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ घोषित

0
281
>> नेतृत्व प्रियम गर्गकडे
पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत रंगणार्‍या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी युवा टीम इंडियाची घोषणा काल बीसीसीआयने केली. संघाचे नेतृत्व प्रियम गर्ग याच्याकडे सोपविण्यात आले असून उपकर्णधारपदी धूरा ध्रुव चंद जुरेल याची निवड करण्यात आली आहे.
अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा नवीन वर्षाच्या प्रारंभी १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या दरम्यान रंगणार आहे. स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. भारताचा ‘अ’ गटात समावेश असून प्रथमच पात्रता मिळविलेला जपान तसेच न्यूझीलंड आणि श्रीलंकन संघाचाही समावेश आहे. गटात अव्वल दोन स्थाने मिळविणारे सुपर लीग फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
भारतीय संघाने आतापर्यंत २०००, २००८, २०१२ आणि २०१८ अशी चार वेळा युवा जगज्जेतेपद मिळविलेले आहे. २०१८साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे अजिंक्यपद प्राप्त केले होते.
जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जाणारा युवा भारतीय संघ १९ जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्धच्या लढतीने आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे. त्यानंतर २१ जानेवारी रोजी जपानविरुद्ध तर २४ जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करेल. सर्व सामने ब्लोएमफोंटेनमध्ये खेळविले जातील.
घोषित भारतीय संघ पुढील प्रमाणे ः प्रियम गर्ग (कर्णधार), धु्रव चंद जुरेल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्‍वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्‍नोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटील.