अंजुणे धरण भरले; आज दरवाजे उघडणार

0
243

अंजुणे धरणाच्या पातळीत ९० मीटरपर्यंत वाढ झालेली असून धरणाची क्षमता ९३.२ मीटर असल्याने आज बुधवारी धरणाचे दोन किंवा चार दरवाजे उघडून सुकतीच्यावेळी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ज्ञानेश्‍वर सालेलकर यांनी दिली. धरण परिसरात मंगळवारी २ इंचाहून अधिक पावसाची नोंद झालेली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण उशिरा भरल्याचे सांगण्यात आले.
आमठाणे धरण भरले
आमठाणे धरणाची पातळी ५०.५६ मीटरपर्यंत वाढून धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचे जलसंसाधन खात्याचे सहाय्यक अभियंता पी. व्ही. श्रीकुमार यांनी सांगितले. अंजुणे धरणातून पाणी सोडण्याची शक्यता असल्याने अधिकार्‍यांनी कष्टी व वाळवंटी नदीच्या पात्रात किंचीत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून केरी, पर्ये, मोर्ले व कारापूर भागातील लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अंजुणे धरण परिसरात आतापर्यंत २४५१ मी. मी. पावसाची नोंद झालेली असून मंगळवारी ५६ मी. मी. पावसाची नोंद झाल्याचे सालेलकर यांनी सांगितले. अंजुणे धरणातील पाण्याची क्षमता ३६३२.४ हेक्टर मिटरपर्यंत वाढल्याने बुधवारी दरवाजे खुले करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पावसाचा जोर वाढला तसेच वरच्या पट्ट्यात पाऊस पडल्यास भरतीच्या वेळी वाळवंटीची पातळी वाढण्याची शक्यता असली तरी आपत्‌कालीन नियंत्रण कक्षाला सजक करण्यात आलेले असून कोणताही धोका नसल्याचे मामलेदार गुरुदास देसाई यांनी सांगितले. दरम्यान, काल पावसामुळे चोडण येथे हनुमंत कुंडईकर यांच्या घरावर वृक्ष पडल्याने सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले. डिचोली अग्निशामक दलाने मदत कार्य करून झाड कापले.