अंजदीव बेटावरची नौदलाची कारवाई

0
245
  • कृष्णा शेटकर
    (माजी नौसैनिक)

गोव्याचा मुक्तिदिन नुकताच साजरा झाला. गोवा मुक्त करण्यात भारतीय लष्कराबरोबरच नौदलाचेही महत्त्वाचे योगदान होते. अंजदीव बेटावरच्या मोहिमेत भाग घेतलेले गोमंतकीय नौसैनिक कृष्णा शेटकर सांगत आहेत त्या थरारक मोहिमेची कहाणी..

१९५५ साली भारताच्या विविध भागांतून हजारो जण गोवा पोर्तुगिजांपासून मुक्त करण्याकरिता सत्याग्रही म्हणून गोव्यात आले. पूज्य ना. ग. गोरे, सुधाताई जोशी, मधु दंडवते, मोहन रानडे यांच्यासारखे भारतीय सत्याग्रहींना मार्गदर्शन करीत होते. ते आग्वादच्या तुरुंगात गेले. अनेकजण पोर्तुगिजांच्या गोळीला बळी पडले. हिरवे गुरुजींना तेरेखोलच्या किल्ल्यावर भारतीय तिरंगा झेंडा चढवीत असताना गोळ्या घालून मारले, चांदेल गावचा बापू गवसही पोर्तुगिजांच्या गोळीला बळी पडला. या सर्व बातम्या मी ‘आयएनएस तीर’ या भारतीय लढाऊ जहाजावर असताना रेडिओवर ऐकत होतो. त्या जहाजाची अरबी समुद्रात कोकण किनार्‍यावर टेहाळणी करण्याकरिता नेमणूक झाली होती.

दिवसभर रत्नागिरी ते रेडीपर्यंत आम्ही गस्त घालत होतो. समुद्रावरील गोव्याच्या भागात पोर्तुगिजांच्या जहाजांच्या हालचालींवर लक्ष देण्याकरिता संध्याकाळच्यावेळी रेडीजवळ नांगर टाकून आम्ही उभे राहत असू. रेडीपासून माझे हरमल गाव अगदीच जवळ होते. हरमलच्या किनार्‍यावर मामा-भाच्याची जी दोन खडके आहेत, ती मला जहाजावरून स्पष्ट दिसत होती. मी सूर्यास्ताच्यावेळी जहाजाच्या पुढील डेकवर बसून हरमलच्या किनार्‍याकडे बघत बसे. हरमल येथे माझे वडील व आई होती. त्यांच्यापासून मी अगदीच जवळ म्हणजे २०-२५ मैलांवर होतो. १९५३ साली दीड वर्षांपूर्वी प्रशिक्षणाच्या काळात जी एक महिन्याची सुटी मिळाली होती, तेव्हा गोव्यात येऊन आई-वडलांना भेटलो होतो. १९५५ सालानंतर गोव्याची सरहद्द पोर्तुगिजांनी बंद केली होती. कोणीही गोव्याबाहेर जाऊ शकत नव्हते व गोव्यात भारतातून येऊ शकत नव्हते.

सूर्य पूर्ण पाण्यात जाईपर्यंत मी हरमलच्या किनार्‍याकडे पाहत राही. डोळ्यांतून एकसारखे अश्रू वाहत. मी रडत असताना माझे काही मित्र म्हणत, तू का रडतोस? मी रडतच त्यांना सांगे की, माझे आई-वडील इथून अगदीच जवळ आहेत, पण मी त्यांना पाहू शकत नाही किंवा भेटू शकत नाही.

भारतीय नौदलाचे ‘तीर’ जहाज जवळजवळ १५ दिवसांकरिता गस्त घालण्यास रत्नागिरी ते रेडीपर्यंतच्या किनार्‍यावर होते. रोज संध्याकाळी रेडीजवळ जेव्हा आम्ही नांगर घालून उभे राहत असू, तेव्हा मी हरमलकडे टक लावून पाहत असे. कधी कधी वाटे की आपणही त्या सत्याग्रहामध्ये सामील व्हावे. मी एक सैनिक असल्यामुळे मला सर्व प्रकारची हत्यारे हाळगण्याची चांगली सवय होती. मी नक्कीच पोर्तुगीजांच्या ठाण्यावर हल्ला करू शकेन. सत्याग्रहींना माझी थोडीफार मदत होईल, असे विचार डोक्यात येत. मी माझे परमपूज्य गुरू अण्णासाहेब प्रधानांना पत्र पाठवून मी कळविले होते की, मी जहाजावरून गुप्त रीतीने निसटून गोव्यात जाऊन सत्याग्रह्यांच्या टोळीत सामील होण्याचा विचार करीत आहे. रात्रंदिवस एकच विचार डोक्यात येत आहे की, मी गोव्यात जावे. परमपूज्य गुरू अण्णासाहेब प्रधान भारतीय सेवेचे ऑडिटर जनरल होते. त्यांचा सहवास व मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळत असे.
माझे पत्र मिळताच त्यांच्याकडून मला पत्र आले. त्यांनी लिहिले होते की, असा अविचार करू नकोस. सैन्यात राहून तू देशाची सेवा करीत आहेस, ती कर. त्यांच्या या उपदेशाने अस्थिर झालेले मन शांत झाले होते. तरीपण गोव्याकडून सत्याग्रहींचे जे आगमन गोवा मुक्त करण्याकरिता होत होते, त्या बातम्या रेडिओवरून व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून समजत होत्या. त्या ऐकून मन परत परत गोव्याकडेच धाव घेत होते.

‘तीर’ जहाजाची टेहाळणी करण्याची जबाबदारी संपताच आम्ही मुंबईला गेलो व त्यानंतर पूर्वेकडीलच्या अनेक देशांना ‘तीर’ या जहाजावरून भेटी दिल्या. १९५५ ते १९६० या पाच वर्षांच्या काळात आयएनएस इंडिया (न्यू दिल्ली), सतलज, गोमती, विक्रांत या जहाजांवर सेवा केल्यानंतर माझी बदली १९६१ साली कोचीनला झाली.
१५ डिसेंबर १९६१ रोजी कोचीनहून एक तुकडी गोव्याला गोवा मुक्त करण्याकरिता पाठवणार अशी गुप्त बातमी होती. त्या तुकडीत मला जाण्यास मिळावे म्हणून माझ्या एका अधिकार्‍याला मी विनंती केली. जेव्हा माझे नाव त्या गोवा मुक्तीच्या तुकडीत घालण्यात आले, तेव्हा मला अत्यंत आनंद झाला. १६ डिसेंबरला आम्ही ‘आयएनएस त्रिशूल’ या जहाजावरून गोव्याच्या बाजूला जाण्यास निघालो, निघण्यापूर्वी कमांडर बिन्द्राने आपल्या भाषणात आम्हाला सविस्तर गोवा ऑपरेशनबद्दल माहिती दिली व शेवटी आम्ही सर्वांना शुभेच्छा दिल्या. निरोपानंतर त्याच दिवशी म्हैसूर जहाजाने गोव्याकडे कूच केले. दोन दिवसांच्या प्रवासानंतर आम्ही कारवारच्या जवळपास पोहोचलो. त्या दोन दिवसांच्या प्रवासात असताना माझे मन गोव्यातच होते. १९५५ च्या सत्याग्रहाच्या वेळी माझ्या मनात विचार येत की, आपण गोवा मुक्ती संग्रामात सामील व्हावे. त्यावेळी अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनामुळे ते शक्य झाले नव्हते. आता मला प्रत्यक्ष गोवा मुक्त करण्याकरिता पाठवण्यात येत आहे. मला जीवाची पर्वा नाही. लढता लढता मरण आले तरी चालेल, अशी मी मनाची तयारी केली होती. माझ्या आईला व भावांना पत्र पाठवून लिहिले होते की, मला एक सुवर्णसंधी मिळाली आहे गोवा मुक्त करण्याची.

१८ डिसेंबर सकाळीच आम्ही कारवारच्या किनार्‍याजवळ पोहोचलो. आमचे कार्य काय असेल त्याबद्दल आम्हाला एकत्र बोलावून कमांडिंग ऑफिसरने माहिती दिली. आमचे कार्य होते, आम्हाला लहान मोटारबोटींनी अंजदीव बेटावर पाठविले जाईल. त्या बेटावर असलेल्या पोर्तुगीज सैनिकांना ताब्यात घ्यावयाचे, ताब्यात घेताना थोड्या प्रमाणात शस्त्रांचाही उपयोग करावा लागेल, असे आम्हाला सांगण्यात आले होते. सकाळी त्रिशूल जहाजावरून दोन पॉवर बोटी सोडण्यात आल्या. पहिल्या बोटीत मी, शिवाले, हरबनसिंग, दासगुप्ता, सेन, शिंदे वगैरे होतो. एक बोट पुढे व त्या पाठीमागे दुसरी या पद्धतीने आम्ही पुढे पुढे किनार्‍याकडे जात होतो. आम्हा सर्वांकडे बंदुका, स्टेनगन, ब्रेनगन व ग्रेनेडही होते. आमचे प्रमुख चीफ पेटी ऑफिसर केलमेन हे होते. जवळ जाताच लाउडस्पीकरवरून तिथल्या सैनिकांना सांगण्यात येत होते की, गोवा भारतीय सैन्याने ताब्यात घेतला आहे व आता तुम्ही हत्यारे खाली ठेवून आमच्या स्वाधीन व्हा. ही उद्घोषणा ले. डिमेलो लाउडस्पीकरवरून पोर्तुगीज भाषेत करीत होते. ले. डिमेलो हे गोव्यातील हळदोणे गावचे. त्यांना पोर्तुगीज भाषा येत होती. आम्हाला किनार्‍यावर कोणीच दिसत नव्हते. किनार्‍यावर एक चर्च दिसत होती. आम्ही अगदी कमी पाण्यापर्यंत पोहोचलो, तेव्हा चीफ पेटी ऑफिसर केलमेनने आम्हाला पाण्यात उड्या टाकण्याचा हुकूम दिला.

आम्ही पाण्यात उड्या टाकताच सूं सूं करीत काही गोळ्या चर्चच्या बाजूने आमच्यावर येऊ लागल्या. माझ्यापुढे ‘सीमॅन वन’ दास होता. त्याला गोळी लागली होती. पाठीमागे दासगुप्ता व सेन होते. त्यांना पण गोळ्या लागल्या होत्या. मी, शिवाले व हरबनसिंगने पाण्यात उड्या टाकल्या होत्या. माझ्याकडे ग्रेनेड व ३.०.३ रायफल होती. चर्चमध्ये पाच-सहा पोर्तुगीज सैनिक होते. त्यांच्याशी जेव्हा आमचा सामना झाला, तेव्हा पोर्तुगीज सैनिकाने आमच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात आमचे दोघेजण जखमी व तिघेजण मृत्युमुखी पडले. त्या चर्चमध्ये लपलेल्या बाकी सैनिकांना आम्ही कैद केले. पाठीमागून दुसरी बोट किनार्‍यावर पोहोचली होती. त्यांच्या ताब्यात त्या सैनिकांना आम्ही दिले व पुढे डोंगरावर धाव घेतली. डोंगरावर त्यांचे काही सैनिक होते. आम्ही पुढे पुढे हातात रायफली घेऊन धावतच होतो. धावता धावता एक गोळी माझ्याच पुढे धावत असलेल्या शिवाल्याला पाठीमागून लागली. गोळी लागल्यानंतर जवळजवळ पन्नास मीटर शिवाले पुढील सैनिकांचा पाठलाग करीत धावतच होता. शिवाल्याला गोळी लागल्यानंतरसुद्धा त्याला कळलेच नाही, पण जेव्हा हरबनसिंगने म्हटले की, ‘अरे शिवाले, तुझे गोली लगी है’ ते ऐकताच शिवाले खाली कोसळला. हरबनसिंगने शिवाल्याला खांद्यावर घेऊन खाली चर्चकडे धाव घेतली. संध्याकाळपर्यंत आम्ही त्या बेटाला पूर्ण वळसा घालून जे जे पोर्तुगीज सैनिक आम्हाला दिसले, त्यांना कैद केले. आमच्यापैकी एकूण सात जण पोर्तुगीज सैनिकांच्या गोळ्यांना बळी पडले होते. काही जखमी झाले होते. शिवाल्याला हृदयाच्या वरच्या बाजूला पाठीमागून आलेली गोळी लागली होती. शिवाले व काही जखमींना ताबडतोब हॅलिकॉप्टरने बेळगाव मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. ही मोहीम चालू असताना मुरगाव बंदरात असलेल्या ‘आफोन्स दि अल्बूकर्क’ या पोर्तुगीज लढाऊ जहाजाला आयएनएस बेतवा व त्रिशूल या जहाजांवरून तोफेचे गोळे फायर करून त्याची नासधूस करण्यात आली. त्या आफोन्स दी अल्बूकर्क या लढाऊ जहाजावर रिअर मार्शल पिन्टोने लढाऊ विमानातून बॉम्बफेक केली होती.

गोवा मुक्तीचे ऑपरेशन विजय त्याचदिवशी म्हणजेच १९ डिसेंबरला पूर्ण झाले होते. माझा गोवा स्वतंत्र झाला होता. माझे कित्येक दिवसांचे स्वप्न साकार झाले होते. माझे काही साथी या मोहिमेत कामी आले याचे दुःख मात्र अजूनही जाणवते…