अंगलट येणार्‍या गोष्टी

0
117
  •  दत्ताराम प्रभू साळगावकर

‘‘होय. मी सांगितलं की चारशे वीस असा सर्व्हे नंबर दे म्हणून. मी त्या कर्मचार्‍यांसमोरही हेच सांगेन. विटनेस किंवा साक्षीदार आणायचा प्रश्‍न येतोच कुठे जेव्हा मी मान्य करतो तेव्हा! त्यांना सांगा, मी सांगितलं म्हणून. पुढे काय होईल ते मी पाहून घेईन.’’

 

काही वेळा काही गोष्टी किंवा घटना अशा घडतात की आपण कळत किंवा नकळत त्यात भागीदार होतो. जर शेवट बरा झाला तर ठीक, नपेक्षा चांगुलपणा राहतो बाजूला व विनाकारण दोष अंगाशी येतो. आपला एखादी गोष्ट करताना हेतू कितीही चांगला असला तरी दुसर्‍यांच्या मते तो वाईट असतो व निष्कारण आफत ओढवते.
विद्यार्थिदशेतील एक घटना. आमचे एक शिक्षक होते. आम्हाला मराठी शिकवायचे. शिकवण्यात वाकबगार. शिकवायला लागले की जिभेवर जणू सरस्वती अवतरायची! आम्हा विद्यार्थ्यांचे अतिशय आवडते सर. कारण त्यांचा स्वभावच तसा होता. शाळेत सोडाच पण बाहेर गावातही त्यांचं वागणं अतिशय सद्शील! कोणालाही कधीही व कसलीही मदत करण्यास सदैव तत्पर. काही वेळा पदरमोड करूनही! गावात नाव कमावलं होतं. सर्वजण त्यांच्याशी आदराने वागायचे. जणू देवमाणूस! पण एके दिवशी त्यांच्यावर आफत ओढवली.

ते एस.टी.ने प्रवास करत होते. बाजूच्या सीटवर एक तीस-पस्तीस वर्षांची लग्न झालेली बाई आपल्या दोन-तीन वर्षांच्या मुलाला घेऊन बसली होती. मुलगा थोडा चळवळ्या होता. खाली उतर, मांडीवर बस, उड्या मार अशा त्याच्या बाललीला चालल्या होत्या. ती बाई निमूटपणे सर्वकाही बघत बसली होती. कदाचित हा नेहमीचाच व सवयीचा प्रकार असावा. एवढ्यात अचानक त्या मुलानं बसच्या सीटवर उभं राहून खिडकीतून डोकं बाहेर काढलं. आमच्या सरांनी त्या मुलाच्या आईला त्या मुलाला सांभाळण्यास सांगितले. तिने ते फारसे मनावर घेतले नाही. कानाडोळाच केला. तेवढ्यातच उलट बाजूने दुसरी बस भरधाव येते असं सराना वाटलं व आता ती बस मुलाच्या डोक्याला लागणारच. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या मुलाला पकडलं व मागे ओढलं. मुलाला मागे ओढताना साहजिकच त्या बाईच्या अंगाला आमच्या सरांच्या हातांचा स्पर्श झाला. बाई एकदम खवळली व जोराने किंचाळली. बसमधल्या सर्व प्रवाशांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. काय प्रकार तोच त्यांच्या लक्षात येईना. असं झालं तरी काय? बाईनं कोलाहल माजवला की सरांनी तिच्या अंगावर हात टाकला! ती अद्वातद्वा बोलली, शिव्या दिल्या. सरांचं तोंड कधी नाही ते रडवेलं झालं.

उलट दिशेने येणार्‍या त्या बसचा धक्का त्या मुलाच्या डोक्याला लागणार होता की नाही कोण जाणे; किंबहुना ते काळच ठरवणार होता व तेही जेमतेम क्षणांत! पण आमच्या सरांना तसं वाटलं म्हणून त्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी त्यानी त्या मुलाला मागे ओढण्याचं कृत्य केलं. ते करताना त्यांचा हात त्या बाईला लागलाही असेल; पण त्यांचा हेतू शुद्ध होता. प्रवाशांमध्ये सरांना ओळखणारे बरेच होते. ते धावून आले व बाईला परिस्थितीची जाणीव करून देऊन गप्प बसवले. सर शांत होते. कसल्या फंदात पडलो याची त्यांना बिलकूल तमा नव्हती; कारण त्यांनी एक कोवळा जीव वाचवण्याचे सत्कार्य केले होते. त्यांचा लौकिक लोकांना माहीत होता म्हणून तर लोक धावून आले व सरांच्या पाठीशी राहिले; नपेक्षा गोष्ट अंगलट येणारच होती!!
अशीच एक गोष्ट फारशी महत्त्वाची किंवा विलक्षण अशी नव्हे. मी आर्थिक आस्थापनात होतो. आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कर्जे गरजूंना देत होतो. त्यातलं एक म्हणजे दागिन्यांवरील कर्ज. दागिन्यांवर कर्ज आम्ही फक्त शेतीविषयक कारणांसाठी देत होतो. कर्जाचा उपयोग शेतीविषयक कारणासाठी करणार असं डिक्लरेशन कर्जदाराकडून आम्ही घेत होतो. त्याच्याकडे शेतजमीन वगैरे आहे की नाही याची सहानिशा करत नव्हतो. कारण हेड ऑफिसच्या गाईड लाईन्सप्रमाणे तशी गरजही नव्हती. डिक्लरेशन घेतलं की झालं! पण आमच्या शाखेत कोणी अतिशहाण्याने कर्जदाराकडून जमिनीचा सर्व्हे नंबर घेऊन अर्जाच्या फॉर्मवर लिहून ठेवण्याची पद्धत सुरू केली व ती चालूच राहिली.

एके दिवशी आमचा एक चांगला कस्टमर दागिन्यांवर कर्ज घेण्यासाठी आला. साहजिकच संबंधित कर्मचार्‍याने त्याच्याकडे सर्व्हे नंबरची मागणी केली. तो काही सर्व्हे नंबर देऊ शकला नाही त्यामुळे गाडी अडली व तो माझ्याकडे आला. मला त्यानं वस्तुस्थिती सांगितली ती अशी- त्याच्याकडे त्याच्या बायकोचा कोणी जवळचा नातेवाईक पैसे मागायला आला होता. त्यानं स्वतःकडचे पैसे दिले तर कदाचित परतफेड होणार नव्हती, म्हणून त्यानं दागिन्यांवर कर्ज काढून त्याला देण्याचं नाटक केलं. हेतू एवढाच की कर्जाची परतफेड तरी होईल. बायकोचा नातेवाईक; त्यामुळे पैसे न देणं त्याला योग्य वाटलं नाही म्हणून ही चाल!
बायकोला फुलं माळून (?) चार बांगड्या घेऊन आला होता. हे सगळं सांगून मला विचारलं, ‘‘सर्व्हे नंबर कशाला? तो आणखी कुठून आणू?’’
मला त्याचं सांगणं पटलं. मी म्हटलं, ‘‘दे रे एक चारशे वीस म्हणून! कोण शोधायला येतो?’’
माझं हे बोलणं एका कर्मचार्‍यानं ऐकलं व आपल्या लिडरांपर्यंत पोचवलं.
झालं. कर्ज दिलं. मामला संपला. पण…?
आस्थापनातील काही कर्मचारी व व्यवस्थापक यांच्यात कसला तरी इश्यू निर्माण झाला व व्यवस्थापकांना सांगितलं की त्यांचं मागणं नियमात बसत नाही. चारशे वीस असा सर्व्हे नंबर घेऊन दागिन्यावर कर्ज देणं नियमात बसतं का? असा त्यांनी व्यवस्थापकांना प्रश्‍न केला. व्यवस्थापकाना याविषयी काहीच माहिती नव्हती. ते बुचकळ्यात पडले. त्या कर्मचार्‍यांकडून त्यांनी सविस्तरपणे जाणून घेतलं. त्यांच्या इश्यूवर नंतर निर्णय घेतो असं सांगून त्यांची तात्पुरती बोळवण केली व ते गेल्यावर मला केबिनमध्ये बोलावलं.
‘‘बसा.’’
‘‘काय काम होतं? महत्त्वाचं का?’’ माझा सहज प्रश्‍न.
‘‘म्हटलं तर महत्त्वाचं, म्हटलं तर नाही. आणखी एक नवीन इश्यू तुमच्याविषयी झाला,’’ व्यवस्थापक म्हणाले. मला त्यानी विचारलं की त्या कस्टमरला चारशे वीस असा सर्व्हे नंबर दे असं तू सांगितलंस का? तू नाही म्हटलंस तर ते विटनेस म्हणजे साक्षीदार आणायला तयार आहेत!

मला सणक भरली. एक म्हणजे सर्व्हे नंबर मागायची गरज नाही. कोणीतरी पद्धत सुरू केली व चालू आहे. पण एवढा गहजब करायची गरज ती काय?
मी म्हणालो, ‘‘होय. मी सांगितलं की चारशे वीस असा सर्व्हे नंबर दे म्हणून. मी त्या कर्मचार्‍यांसमोरही हेच सांगेन. विटनेस किंवा साक्षीदार आणायचा प्रश्‍न येतोच कुठे जेव्हा मी मान्य करतो तेव्हा! त्यांना सांगा, मी सांगितलं म्हणून. पुढे काय होईल ते मी पाहून घेईन, तुम्हाला त्याची काळजी नको.’’

पुढे आणखी काही न बोलता व ऐकता मी केबिनमधून बाहेर पडलो.
मी या प्रकारातली हवाच काढून घेतली. अशा गोष्टी घडतात. नखानं तुटतं तेथे कुर्‍हाड आणण्याचे प्रकार घडतात! मी काही आस्थापनाला नुकसान किंवा तोटा होईल असा प्रकार केला नव्हता. कारण कर्ज दागिन्यांवर म्हणजे संपूर्णपणे सुरक्षित होतं. मी यामध्ये स्वतःचा कसलाही फायदा करून घेतला नव्हता. ज्या कस्टमरला कर्ज दिलं तो एक चांगला कस्टमर होता. मी त्याला एक प्रकारे मदत केली, तोडलं नाही! म्हणून मी माझ्या बोलण्यावर ठाम होतो. कारण गोष्ट माझ्या अंगलट येण्यासारखी नव्हतीच!!