अँडरसनने ओलांडला ९०० गुणांचा टप्पा

0
104

इंग्लंडचा स्विंग गोलंदाज जेम्स अँडरसन याने भारताविरुद्धच्या लॉडर्‌‌स कसोटीतील ९ बळींच्या जोरावर आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत ९०० गुणांचा टप्पा ओलांडला आहे. इयान बोथम (१९८०) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा अँडरसन हा इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
अँडरसनने लॉडर्‌‌स कसोटीत एकूण १९ गुणांची कमाई करताना आपले पहिले स्थान अधिक भक्कम केले. पहिल्या स्थानावरील अँडरसनचे ९०३ तर दुसर्‍या स्थानावरील कगिसो रबाडाचे ८८२ गुण आहेत.

लॉडर्‌‌स कसोटीचा सर्वाधिक फायदा अष्टपैलू ख्रिस वोक्स याला झाला आहे. अष्टपैलूंच्या यादीत त्याने पाच स्थानांची उडी घेताना सातवे स्थान मिळविले आहे. फलंदाजांमध्ये ३४ स्थानांची मोठी प्रगती साधताना त्याने कारकिर्दीतील सर्वाधिक ४९६ गुणांसह ५०व्या स्थानावर हक्क सांगितला आहे. गोलंदाजीतही तीन स्थानांनी वर सरकताना तो ३२व्या स्थानी पोहोचला आहे. क्रिकेटच्या पंढरीवर शतक थोडक्यात हुकलेल्या जॉनी बॅअरस्टोव याने ‘टॉप १०’मध्ये प्रवेश केला आहे. तीन स्थानांची सकारात्मक वाटचाल करत त्याने नववे स्थान मिळविले आहे. लॉडर्‌‌स कसोटीत केवळ २३ व १७ अशा धावांची नोंद केलेल्या विराट कोहलीला आपले पहिले स्थान गमवावे लागले आहे. स्टीव स्मिथ ९२९ गुणांसह पहिल्या तर कोहली ९१९ गुण घेत दुसर्‍या स्थानी आहे. भारताकडून रविचंद्रन अश्‍विनने आपल्या २९ व नाबाद ३३ धावांच्या बळावर दहा स्थाने वर सरकताना ५७वा क्रमांक मिळविला आहे. अष्टपैलूंमध्ये एका स्थानांची सुधारणा करत तो तिसर्‍या स्थानी आला आहे. मुरली विजय (-८, ३३वे स्थान), दिनेश कार्तिक (-१८, १९५वे स्थान) यांची अपेक्षेप्रमाणे घसरण झाली आहे.