अँजेला मार्कल यांचे पुनरागमन

0
275

दत्ता भि. नाईक

जर्मनी हा कणखर लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. म्हणूनच तो आतापर्यंत युरोपमधील अन्य देशांपेक्षा अधिक पुरुषप्रधान मानला जात असे. नेमकी हीच जर्मनीची प्रतिमा बदलून मार्कल या चान्सलर झाल्या. त्यामुळे त्या जर्मनीच्या प्रथम महिला चान्सलर ठरल्या.

सप्टेंबरच्या अखेरीस जर्मनीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ख्रिश्‍चन डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता संपादित केली व अँजेला मार्कल या जर्मनीच्या चान्सलर बनल्या. समाजाचे नेतृत्व करायचे असेल तर आकर्षक व्यक्तिमत्त्व किंवा वक्तृत्व आवश्यक असते असा आतापर्यंत निरीक्षकांचा अंदाज होता. परंतु हे सर्व अंदाज मार्कल यांनी खोटे ठरवले. त्यांच्याजवळ ना आकर्षक व्यक्तिमत्त्व आहे, ना लोकांवर छाप पाडणारी भाषणबाजी करण्याची कला आहे. निवडणुका घोषित झाल्या तेव्हा परिस्थितीचे विश्‍लेषण करणार्‍यांचे मत वेगळेच होते. एका बाजूला जर्मनी प्रथम अशी घोषणा करणारा नवा नाझी पक्ष व दुसर्‍या बाजूला सोशल डेमोक्रॅट हा डावीकडे झुकणारा पक्ष. या दोन्ही पक्षांच्या रस्सीखेचीत मार्कल यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रॅटिक पक्षाला स्थान असणारच नाही असे निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली तेव्हा वाटत होते.

साधीसुधी वाटणारी महिला
ख्रिश्‍चन डेमोक्रॅटिक हा सुप्रसिद्ध माजी चान्सलर हेलमट कोहल यांचा पक्ष. त्यांनीच मार्कल यांना राजकारणात आणले. त्यांचे साधे व्यक्तिमत्त्व, छाप न पडणारे वागणे, अबोल व शांत स्वभाव यामुळे ही निरुपद्रवी व्यक्ती आपल्यासमोर कोणतीही अडचण उभी करू शकणार नाही असे वाटल्यामुळेच कोहल यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला असावा. घरगुती व कौटुंबिक जीवनात अयशस्वी ठरलेली ही बाई एक प्यादे म्हणून वापरता येईल असा त्यांचा होरा होता. १९९० साली त्यांनी पक्षप्रवेश केला व त्यानंतर त्या संसदेतही निवडून गेल्या. त्यांनी अल्पावधीत मिळालेल्या या यशाने हुरळून जायचे नाही असे ठरवले. त्यांनी साध्या पद्धतीनेसुद्धा आपला विजय साजरा केला नाही. मार्कल ही हेलमट कोहल यांची मानसकन्या आहे असे म्हटले जात असे. परंतु त्यात सत्य कमी व उपहास जास्त असे. कोहल यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना नगण्य असे खाते दिले होते. खात्याचा ताबा घेताच स्वतःमुळे त्यांचे मंत्रिपद टिकेल अशा अविर्भावात वागणार्‍या सचिवाची त्यांनी बदली केली व स्वतःला हवी असलेली माणसे आपल्या कार्यालयात योग्य त्या ठिकाणी नियुक्त करून घेतली.

अँजेला मार्कल ही वरून साधीसुधी वाटणारी महिला कल्पनेपेक्षा भारी ठरली. त्यांनीच कोहल यांना निवृत्तीच्या मार्गाला लावले व स्वतःच पक्षाची सूत्रे हातात घेतली. जर्मनीत वर्तमानपत्रांतून व्यक्त केल्या जाणार्‍या मतांना फारच मोठे स्थान असते. मार्कल यांनी नेमके तेच केले. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या एका लेखात त्यांनी कोहल हे आता संदर्भहीन व कालबाह्य झालेले असून त्यांनी राजकारणातून संन्यास घेणेच आताच्या घडीला योग्य ठरेल असे जाहीर वक्तव्य केले. मार्कल यांच्या कृतीबद्दल प्रतिक्रिया देताना कोहल म्हणाले की, मी या मुलीला राजकारणात बोलावून घेतले व माझ्या हत्यार्‍यालाच पक्षात स्थान दिले.

निष्णात शिकारी
अगदी अलीकडे जर्मनीत देशाच्या विविध प्रांतांच्या संसदांच्या निवडणुका झाल्या त्यात मार्कल यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रॅटिक पक्षाला जनतेने बरेच पिछाडीवर नेऊन बसवले होते. पण जागतिकीकरणाला विरोध करणार्‍या अर्ल्टर्नेट जर्मन्स या पक्षाला चांगलीच आघाडी मिळाल्यामुळे देशात कट्टर राष्ट्रवादी पक्षांची सरशी होत राहील असे वाटत होते. इराक व सिरियामध्ये उद्भवलेल्या इस्लामिक स्टेटच्या अत्याचाराला कंटाळून अनेक मुसलमान युरोपीय देशात घुसलेले आहेत. तसेच ते जर्मनीतही आलेले आहेत. या निराश्रितांचा बंदोबस्त करताना त्यांची होणारी फरपट सर्वांना दिसत होती. त्या हा प्रश्‍न नीटपणे हाताळतील की नाही याबद्दल देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा चालू होती. त्यामुळे २००५ साली सत्तासूत्रे हाती घेतलेल्या व प्रधानमंत्रिपदाचे दोन कार्यकाल पूर्ण केलेल्या या महिलेला सत्तास्थानावरून स्वतःचा गाशा गुंडाळावा लागेल असे वाटत होते.

सन २००४ मध्ये सत्तेची सूत्रे हातात घेण्यापूर्वी त्यांनी वयाची साठी गाठली. त्यावेळी कन्जर्वेटिव्ह पक्षाचे नेते मायकल ग्लॉब यांनी त्यांच्या स्वभावाचे विश्‍लेषण करणारा लेख लिहिला. त्यात त्यांनी म्हटले की, ‘मार्कल ही एक अतिशय निष्णात अशी शिकारी आहे. शिकार कोणत्या अवस्थेत गाठायची हे त्यांना चांगलेच कळते.’

निर्वासितांची समस्या
२००५ ची निवडणूक झाली तेव्हा सोशलिस्ट पार्टीचे श्रोडर हे जर्मनीचे चान्सलर होते. त्यांची मार्कल यांच्या पक्षाशी युती असली तरीही पक्षाच्या ताकदीवर चान्सलर पद मिळते. जर्मनीत दर चार वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होतात. या निवडणुकीच्या रणधुमाळीत श्रोडर हे मार्कल यांचा उपहासाने उल्लेख करायचे. स्वतःला एक बाई दूर सारून चान्सल पद पटकावेल ही कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती व तशा प्रकारचे मतही त्यांनी ठिकठिकाणी व्यक्त केले होते. स्वतःच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा श्रोडर यांना वृथा अभिमान होता हेच निवडणुकांच्या निकालाने सिद्ध केले.

जर्मनी हा कणखर लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. म्हणूनच तो आतापर्यंत युरोपमधील अन्य देशांपेक्षा अधिक पुरुषप्रधान मानला जात असे. नेमकी हीच जर्मनीची प्रतिमा बदलून मार्कल या चान्सलर झाल्या. त्यामुळे त्या जर्मनीच्या प्रथम महिला चान्सलर ठरल्या.

स्वतःची भूमिका बदलणार्‍या चान्सलर म्हणूनही त्यांच्यावर टीका झाली. समलिंगी संबंध हा एक युरोपच्या सामाजिक जीवनात सतत चर्चेत असलेला विषय आहे. अशा संबंधांना समाज सहजासहजी मान्यता देत नसतो. कोणताही धर्म या असल्या थेरांना आपल्या धर्म-संस्कृतीत स्थान देऊ शकत नाही. जर्मनीतही हा प्रश्‍न अधूनमधून उसळी खातो. मार्कल यांनी सर्वप्रथम अशा संबंधांना विरोध केला, परंतु त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली व समलिंगी संबंधांना पाठिंबा जाहीर केला.

पश्‍चिम आशियामधून येणारे निर्वासित ही जर्मनीची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. उद्योगी समाजाच्या या देशात निरुद्योगी निर्वासित म्हणजे भरल्या भांड्याला लागलेली गळती. सर्वप्रथम त्यांनी निर्वासितांना देशात स्वीकारण्यास विरोध केला. त्यानंतर जग आपल्याला हिटलरची अनुयायी म्हणेल या भीतीने त्यांनी हा विरोध मागे घेतला. तरी जर्मन जनतेने या भूमिकेला धरसोड वृत्ती मानून त्यांना नाकारले नाही यातच त्यांच्या नेतृत्वाचे यश आहे.

भारत-जर्मनी संबंध
२००५, २००९, २०१३ व आता २०१७ अशी आपल्या कार्यकालाची आठ वर्षे पूर्ण करून अँजेला मार्कल २०२१ पर्यंत तपःपूर्ती करतील अशी अपेक्षा आहे. युरोपवर तर सध्या आर्थिक संकटाचे सावट आहे. इस्लामिक स्टेटचा पराभव केला पाहिजे असे सर्व देशांना वाटते. परंतु पुढाकार कुणी घ्यायचा हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे. जर्मनीने पुढाकार घेतल्यास नाझींचे पुनरागमन झाल्याचा बोभाटा होईल अशी भीती मार्कल यांना वाटते. युरोपमधून ब्रिटन बाहेर पडणार असल्याने युरोपमधील सर्वच्या सर्व देशांमध्ये नवीन विचार पसरत आहे. स्वतःचा संसार स्वतःच मांडावा ही यामागची कल्पना आहे. बेक्झीटप्रमाणे जर्मनीतही देऊशेक्झीटची कल्पना हळूहळू मूळ धरू शकते. जर्मनी हा उद्यमशील लोकांचा देश आहे. जर्मनीसमोर सध्या बेकारीची समस्या आहे. नवीन उद्योग कसे निर्माण करायचे यावर चिंतन चालू आहे.

भारत व जर्मनी यांमधील संबंध आतापर्यंत मैत्रीपूर्ण राहिलेले आहेत. देशाच्या औद्योगिकीकरणात जर्मनीचा वाटा फार नसला तरी नगण्य म्हणता येईल एवढा नाही. मार्कल या सहकार्‍यांवर विश्‍वास ठेवणार्‍या नेत्या आहेत. त्यामुळे भारत-जर्मनी संबंध अधिकाधिक दृढ होतील अशी आपण आशा बाळगूया.