-ः वळणवाट ः- डिचोलीचे प्रतिनिधित्व करणारे म्हापसावासी पांडुरंग राऊत

0
265

 

  • प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

 

– उत्तरार्ध –

 

पांडुरंग राऊत यांना दोन वेळा मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यामुळे डिचोली मतदारसंघ व गोव्याच्या विकासासाठी बरेच कार्य करण्यास त्यांना संधी मिळाली. तसेच मतदारसंघातील तरुणांना सरकारी नोकरी देण्याची संधी मिळाली. डिचोलीच्या विकासाबरोबर मंत्री म्हणून गोव्याच्या विकासाला हातभार लागला. ते सांगतात ः

गोव्याचा वाहतूकमंत्री असताना कोकणरेल्वे प्रकल्पाला जो गोव्यात निराधार विरोध होत होता, तो वाहतूकमंत्री म्हणून आपण नवी दिल्लीला जाऊन केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याबरोबर कोकणरेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक व गोव्याचे तिन्ही खासदार यांची बैठकीत समजूत काढून शेवटी कोकणरेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळविली, जे गोव्याच्या जनतेला वाहतुकीसाठी लाभदायक ठरले आहे.

पर्यटनमंत्री म्हणून गोव्याची पारंपरिक संस्कृती व लोककला तसेच लोककलाकारांना प्रोत्साहन देऊन शिगमोत्सव सर्वत्र गोव्यात साजरा करण्यात येत आहे. नाहीतर याअगोदर फक्त कार्निव्हालच गोव्यात साजरा करण्यात येत होता. पण आज दोन्ही उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असल्याने विविध कलाकार धर्मबंध-जातीभेद विसरून सामील होतात.

पर्यटन खात्यामार्फत दरवर्षी गोव्यात आंतरराष्ट्रीय सागरी अन्न महोत्सव साजरा व्हायचा. त्याला पहिल्यांदाच भारतीय संस्कृतीचा साज देण्याचा प्रयत्न केला व त्यातून नावाजलेले गोव्याचे कलाकार मंगेशकर कुटुंबीयांचे नि गोव्याचे नाते दृढ केले. याअगोदर मंगेशकर कुटुंबातील एखादा सदस्य गोव्यात आला आणि त्याने आपली कला सादर केली असे झाले नव्हते. पण त्यावेळी मी मंगेशकर कुटुंबीयांची गोव्याबद्दलची जी दुरी होती ती मिटविण्यात यशस्वी झालो. सन्मानपूर्वक आमंत्रण देण्यास पाऊल पुढे टाकले. योग्य आचार-विचारांची देवाण-घेवाण केल्यानंतर ते तयार झाले नि मिरामारच्या खुल्या समुद्रकिनार्‍यावरील बैठकीत हृदयनाथ मंगेशकर यांनी आपली गायकी व संगीत कला सादर करून गोवेकरांची मने जिंकली. गोवेकर श्रोत्यांनी त्यांना भरभरून दाद दिली. त्यांना सन्मानितही केले. तेव्हापासून आता ते गोव्यात आमंत्रित संगीत कार्यक्रमांना हजेरी लावतात. पूर्वी ते गोव्यात येत नव्हते.

नवी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणार्‍या 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला फक्त गोव्याकडून पाश्चिमात्त्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम दाखविण्यात येत असत. मी पर्यटनमंत्री असताना गोव्याच्या भारतीय संस्कृतीवर कार्यक्रमाची आखणी केली.

नंतर मी माननीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करून त्यांना याच धर्तीवर 26 जोवारीला दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी राजपथावर सादरीकरणाला हा कार्यक्रम न्यायला लावले. तेव्हापासून आजपर्यंत गोव्याचा जो-जो चित्ररथ जातो तो गोव्याच्या संस्कृतीवर नि गोव्याच्या इतिहासावर आधारित असतो नि चित्ररथाबरोबर जे नृत्य सादर होते तेसुद्धा गोव्याच्या लोककलेवर आधारित असते नि गोमंतकीय कलाकारच ते सादर करतात.

माझा राजकीय प्रवास महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षातून सुरू झाला व दोन्ही वेळा मगो पक्षाच्या तिकिटावर निवडून आलो नि दोन्ही वेळी मंत्रिपदे मिळाली म्हणून आज नावारूपाला येण्याची संधी मिळाली. प्रामुख्याने रमाकांत खलप यांच्यामुळे ही संधी प्राप्त झाली.

हा राजकीय प्रवास चालू असताना मध्ये मनोहर पर्रीकरांमुळे भाजपामध्ये जाण्याची संधी मिळाली. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपा पक्षाने माझ्या कार्याची दखल घेऊन लगेच पक्षाचा उपाध्यक्ष बनविले व नंतर लोकसभेसाठी उमेदवारी दिली व कार्यक्रमाची आखणी केली. नेटाने काम करून अवघ्या 250 मतांनी माझी जिंकण्याची संधी हुकली.

या राजकीय घडामोडीत, वादळात बर्‍याच पक्षात प्रवेश झाला. ध्येय एकच होते की इथला बहुजन समाज व गोमंतकीयांना स्वाभिमानाने, अभिमानाने, ताट मानेने जीवन जगता यावे व गोव्याची संस्कृती टिकवून गोव्याची प्रगती व्हावी. पर्यावरण रक्षण, संस्कृती संवर्धन तसेच सुंदर, समृद्ध गोव्याच्या पुनर्बांधणीसाठी व गोव्यातील सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी, त्याचा सर्गांगीण विकास करण्यासाठी ‘गोवा प्रजा पार्टी’ची स्थापना केली.

कार्यकर्तृत्वाचा धावता आढावा-

1) महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा दोन वेळा अध्यक्ष.

2) ज्ञानप्रकाश मंडळ, मुळगाव, डिचोली- गोवाचा अध्यक्ष.

3) ज्ञानप्रकाश मंडळ डिचोली उच्च माध्यमिक विद्यालय, मुळगाव- गोवाचा अध्यक्ष.

4) शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, खोलपेवाडी, साळ, डिचोली- गोवाचा अध्यक्ष.

5) श्रीभूमिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, साळ, डिचोली- गोवाचा अध्यक्ष.

6) गोवा काजू उत्पादक सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित, साळ-डिचोलीचा अध्यक्ष.

7) मराठा शिक्षण संस्कृती मंडळ, म्हापसा- गोवाचा अध्यक्ष.

8) अखिल गोवा क्षत्रिय मराठा समाज, मुंबईचा कार्यकारी सदस्य.

9) जेथे गोवा मतदारांचा मराठा समुदाय मोठ्या प्रमाणात आहे त्या अखिल भारतीय मराठा समाज गोवा राज्याचे अध्यक्ष.

10) सर्व स्तरांतील लोकांना उत्कृष्ट राजकीय पाठिंब्यासाठी महाराष्ट्र राज्यातील पत्रकार फाऊंडेशन, पुणेतर्फे भारताचा अभिमान हा भास्कर पुरस्कार प्राप्त.

11) मार्च 2010 मध्ये नॅशनल काँग्रेस पक्षात प्रवेश.

12) गोवा प्रजा पार्टीचा अध्यक्ष.

 

राजकीय कारकीर्द

1) 1985 सालापासून राजकीय जीवनाला प्रारंभ. 1989 व 1999 सालच्या गोवा विधानसभा निवडणुकीत विजयी. बहुजन समाजाचे नेतृत्व केले.

2) याच कालावधीत पर्यटन, वाहतूक, समाजकल्याण, वन खात्याचे मंत्रिपद भूषविले व खात्याला न्याय दिला. (1991 ते 1994 आणि 2000 ते 2002 साली)