-ः पाथेय ः- क्रांतदर्शी आणि प्रज्ञावंत डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्य

0
289
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्य यांचे स्मरण करताना त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू डोळ्यांसमोर येतात. ते जन्मास येऊन एकशे एकोणतीस वर्षांचा कालावधी उलटला तरी इतिहासाच्या पटलावर त्यांनी उमटविलेली मुद्रा काही पुसली गेलेली नाही.

 

डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्य यांचे स्मरण करताना त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू डोळ्यांसमोर येतात. ते जन्मास येऊन एकशे एकोणतीस वर्षांचा कालावधी उलटला तरी इतिहासाच्या पटलावर त्यांनी उमटविलेली मुद्रा काही पुसली गेलेली नाही. गोवा मुक्तिसंग्रामातील त्यांचे कार्य अतुलनीय स्वरूपाचे आहे. राष्ट्रीय जीवनातील अंतःप्रवाहांशी ते समरस झाले होतेच; शिवाय आंतरराष्ट्रीय क्षेत्रात घडलेल्या अनेक घटनांचे आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रवाहांचे त्यांनी आत्मसातीकरण केले. चांदर येथे 2 एप्रिल 1891 रोजी जन्मलेल्या टी. बी. कुन्य यांना आयुष्यात सतत भ्रमंती करावी लागली. त्यांचे बालपण कासावली येथे गेले. पणजी येथील पोर्तुगीज सेकंडरी स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. पण तेथील शिक्षणपद्धती न मानवल्यामुळे ते पाँडेचरीला गेले. तेथील फ्रेंच कॉलेजमध्ये त्यांनी वाकोलोरेआपर्यंत (बी.ए.) शिक्षण घेतले. नंतर पॅरिसला जाऊन सॉर्बोन विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी प्राप्त केली.

रशियामधील राजकीय घडामोडी आणि महात्मा गांधींनी सुरू केलेली राष्ट्रीय चळवळ यामुळे त्यांचे संवेदनशील मन स्वस्थ राहू शकले नाही. मानवी हक्कांसाठी लढण्याची अंतःप्रेरणा त्यांच्या मनात निर्माण झाली. ‘युमानिते’ या फ्रेंच वृत्तपत्रातून नियमितपणे लेख लिहून ‘जालियनवाला बाग’ प्रकरणातील तपशील आणि ब्रिटिश राजसत्तेची अन्य क्रूरकर्मे त्यांनी वेशीवर टांगली. फ्रेंच जनतेला या राजकीय अन्यायाविषयीची इत्यंभूत माहिती या लेखांद्वारे कळली. या लेखनातून टी. बी. कुन्य यांच्या राष्ट्रीय संवेदनशीलतेची, निर्भीड वृत्तीची आणि अन्यायाच्या प्रतिकारार्थ सत्यदर्शन घडविणार्‍या झुंजार वृत्तीची प्रचिती येते.

त्या प्रतिकूल काळातही डॉ. कुन्य वसाहतवादाच्या विरुद्ध लढणार्‍या ‘अ‍ॅन्टी इंपिरियलिस्ट लीग’ या संस्थेचे सभासद झाले. आपल्या विचारांशी समानधर्मी असलेल्या चतुरस्त्र प्रतिभेच्या रोमा रोलां यांच्याशी त्यांचे जुळून आलेले मैत्र येथे अधोरेखित करावेसे वाटते. रोमा रोलां यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याविषयी आस्था व प्रेम वाटत असे.

फ्रान्समध्ये चौदा वर्षे वास्तव्य केल्यानंतर डॉ. कुन्य भारतात परतले. 1928 साली पीटर अल्वारिस आणि आत्माराम मयेकर यांच्या सहाय्याने भारतीय काँग्रेसची शाखा म्हणून ‘गोवा काँग्रेस कमिटी’ या संस्थेची त्यांनी स्थापना केली. आसाममधील चहाच्या मळ्यात गोव्यातील गरीब मजुरांना नेऊन गुलामांसारखी त्यांना वाईट वागणूक देण्यात येत असे. या अन्यायाच्या परिमार्जनार्थ त्यांनी पं. जवाहरलाल नेहरू यांच्यामार्फत प्रयत्न केल्यानंतर त्यांना यश आले. 1941 साली सासष्टी आणि मुरगाव तालुक्यांतील पुरात सापडलेल्या आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी निधी उभा केला. 1939 ते 1946 च्या दरम्यान गोव्याच्या राजकीय घडामोडींविषयी त्यांनी लेखन केले. ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोअन्स’ हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक. यातून त्यांनी पोर्तुगीज साम्राज्यवादी सत्ताधीशांच्या धर्मांधतेचे आणि मानवताविरोधी कृत्यांचे विदारक दर्शन घडविले आहे.

आजच्या संदर्भात या पुस्तकाचे महत्त्व काय आहे हे आपण नीट समजून घ्यायला हवे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सौ. प्रफुल्ल गायतोंडे यांनी ‘गोमंतकीयांच्या राष्ट्रीयत्वाचा र्‍हास’ या नावाने केला आहे. या पुस्तकात गोमंतकीयांच्या मनोवृत्तीतील कश्मल घालवून तेजस्वी विचारांचे स्फुल्लिंग जागविण्याचे सामर्थ्य आहे. ‘गोमंतकीयांच्या मानसिक, सामाजिक आणि राजकीय विकासावर देशविरोधी शक्तीचा पडलेला प्रभाव दर्शवणे हाच या पुस्तिकेचा उद्देश आहे’ असे डॉ. कुन्य यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे.

गोवा स्वतंत्र होऊन आता सहा दशके होत आलेली आहेत. राष्ट्रीय प्रवाहाशी तो एकरूप झालेला आहे. पण एखादी भूमी अथवा भूभाग राजकीयदृष्ट्या पारतंत्र्यात असतो तेव्हा तिची किंवा त्याची मानसिकता कोणत्या प्रकारची होते याचा अंतर्मुख वृत्तीने विचार करावा लागतो. गतेतिहासातील अधोरेखिते आपणास आत्मजाणीव प्राप्त करून देतात. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य या संज्ञांमधील फरक स्पष्ट करून सांगतात. प्रमादांची पुनरावृत्ती होऊ नये याचा इशारा देतात. डॉ. कुन्य सुरुवातीला म्हणतात, “…पोर्तुगिजांनी मानसिक गुलामगिरीसाठी अशी काही साधने वापरली की त्यामुळे आपल्या लोकांचे राष्ट्रीयत्व तर नष्ट झालेच; पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्यांच्या नागरिकत्वाचा हक्कसुद्धा हिरावून घेतला, जो इतर देशांनी कधीच घेतला नसेल.”

आल्बुकर्कच्या तथाकथित सहिष्णुतेवर कठोर प्रहार करताना डॉ. कुन्य म्हणतात, “आपल्या पाच वर्षांच्या अल्पावधी राजवटीत त्याने प्रथम मशिदी तर पाडल्याच; पण सुरुवातीला सोडलेली काही हिंदू देवळेही त्याने उद्ध्वस्त केली. आन्द्रे कोर्सालो हा फ्लोरेन्सचा प्रवासी 6 जानेवारी 1515 रोजी गोव्याहून लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हणतो की, दिवाडीच्या हिंदू मंदिराचे अत्यंत सुंदर स्मारक उद्ध्वस्त करून विध्वंसाचा कलंक लावला. त्या स्मारकाचे काही अवशेष अजूनही सापडतात.” आल्बुकर्कच्या वर्णद्वेषाचे त्यांनी काही तपशील दिले आहेत ते वाचताना अंगाचा तिळपापड होतो.

‘सेंट फ्रान्सिस झेव्हिअर- त्याच्या पत्राद्वारे उघड झालेले दर्शन’ या प्रकरणात डॉ. कुन्य यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हिअर याने सक्तीने जी सर्रास धर्मांतरे घडवून आणली त्याचे वर्णन केले आहे. एके ठिकाणी त्याचे शब्द या पुस्तकात उद्धृत करण्यात आले आहेत ः

“माझ्या अनुभवावरून, भारतात धर्माचा प्रसार करण्याचा एकच मार्ग आहे. राजाने भारतातील आपल्या सर्व अधिकार्‍यांना हुकूम द्यावा की जो आपल्या अखत्यारीतील सर्व अधिकार वापरून धार्मिक राज्य पसरवील तोच राजाच्या विश्वासास पात्र ठरेल. राजाने हुकूम दिलाच पाहिजे. त्यामुळे सिलोनलासुद्धा धर्मांतरासाठी आकर्षित केले पाहिजे. तसेच सर्व धार्मिक लोकांना आणि जे जे धर्माचा प्रसार करू शकतील अशा सर्वांना, मग जे आपल्या जेजुईट संघटनेचे सभासद असोत वा नसोत… राजाने हुकूमनामा काढून या आज्ञेचे उल्लंघन करणार्‍यांना जबर शिक्षा दिली तर बरेच स्थानिक लोक येशू ख्रिस्ताचा पंथ कवटाळतील. नाहीतर यशाची अपेक्षा करता येणार नाही.”

पुढे तो म्हणतो ः

“मला याबद्दल काय वाटतं ते तुम्हाला कळलं असणार. मी सांगेन तसं केल्यास मी एवढंच म्हणेन, आमच्या गरीब बिचार्‍या धर्मांतरित लोकांना अन्याय, चोर्‍यामार्‍या यांपासून संरक्षण मिळाल्यास इतर स्थानिक लोकसुद्धा खिश्चन समाजात विनासायास प्रवेश करतील. पण धर्माचा प्रसार करण्यापासून राजेसरकार आणि व्हाईसरॉय अलिप्त राहिले तर काहीसुद्धा होणार नाही.”

धार्मिक छळवाद करून पोर्तुगीज राज्यकर्ते गप्प राहिले नाहीत. मातृभाषेचा विकास होऊ नये म्हणून बाधा आणली गेली. सर्वार्थाने विदेशी असणारी भाषा आत्मसात करावी म्हणून सक्ती करण्यात आली. 1548 मध्ये बिशप फादर जुआंव द् आल्बुकर्कने स्थानिक भाषेतील पुस्तके नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली.

अन्य काही जाचक निर्बंध त्यांनी येथील हिंदू जनतेवर लादले. तीन शतके गोव्यातील शिक्षण हा चर्चचा धार्मिक एकाधिकार होता. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाद्वारे ज्या संस्कृतीचे पोषण होत गेले त्यातून परकीय राजवटीची हांजी हांजी करणारा वर्ग भविष्यकाळात निर्माण व्हावा अशी योजना होती. अभ्यासक्रम विदेशी होता. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक पर्यावरणाशी त्याचा सुतराम संबंध नव्हता.

या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर गोमंतकीयांना डॉ. कुन्य यांच्या रूपाने प्रज्ञावंत सामाजिक भाष्यकार लाभला. हे घडले नसते तर गोमंतकाचे काय झाले असते?