-ः इतिहासाच्या पाऊलखुणा ः- भारतीय जनता पार्टीची चाळिशी आणि राष्ट्रीय राजकारण

0
275
  • दत्ता भि. नाईक

परंतु आज सर्वच भाजपेतर पक्ष हतबल बनलेले आहेत. मुलायमसिंह, लालूप्रसाद यांसारखे घराणेशाहीमध्ये अडकलेले पक्ष, तर शेवटचे आचके खाणारा काँग्रेस पक्ष असे भारतीय राजकारणाचे आजचे चित्र आहे.

नुकताच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा चाळिसावा वर्धापनदिन पार पडला. सध्या देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे वर्धापनदिन साजरा करता आला नाही. 1980 या साली भाजपाची स्थापना करण्यात आली. मा. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी हे यावेळेस पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेते होते. कुणालाही काहीही वाटो, परंतु शहर व गाव पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये त्यावेळी अवर्णनीय उत्साह होता. मोरारजी देसाई यांच्या जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रथमच परराष्ट्र व्यवहार मंत्र्याला स्वतंत्र ओळख असू शकते याचा स्वतःच्या व्यवहारातून दाखला दिला होता. लालकृष्ण अडवाणी यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाला नवी दिशा दिली होती. त्यामुळे पक्षाला अनुभवी नेतृत्वही प्राप्त झाले होते.

भारतीय जनसंघाची स्थापना

भारतीय जनता पार्टी स्थापन होऊन चाळीस वर्षे पूर्ण झाली हे शब्दशः खरे असले तरीही तत्त्वतः पक्षाचा इतिहास याहून वेगळा व जुना आहे. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही स्वतंत्र भारतात पक्षीय पातळीवरील पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली. 1948 च्या जानेवारी महिन्यात महात्मा गांधींची हत्या झाल्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ही चालून आलेली संधी होती. गांधीहत्येचा आळ घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणणे, रा. स्व. संघाचे सरसंघचालक मा. गोळवलकर गुरुजी तसेच स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना 302 कलमाखाली म्हणजे खुनाचा कट रचण्याच्या कायद्याखाली अटक करणे यांसारख्या कृत्यांनी व मिळेल त्या मार्गांनी पक्षाला हानीकारक ठरू शकणार्‍या संघटना व व्यक्तीना संपवणे यासारख्या मार्गांनी देशावर सोव्हिएत रशियासारखी एकपक्षीय हुकूमशाही प्रस्थापित करण्याच्या दिशेने काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू झाली होती. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे हिंदू महासभेचे नेते पं. नेहरूंच्या सर्वपक्षीय सरकारमध्ये अन्नमंत्री होते. पूर्व पाकिस्तानमधील निर्वासितांच्या समस्येबद्दल डॉ. मुखर्जी यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला. त्यांनी हा प्रश्न इंग्रजीतून विचारला तेव्हा पंतप्रधान नेहरूंनी त्यांची खिल्ली उडवली व ‘तुम्ही हिंदी हिंदी म्हणून ओरडता व प्रश्न इंग्रजीतून विचारता’ असे म्हणून त्यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली. या प्रसंगानेच डॉ. मुखर्जींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे युवा प्रचारक व कार्यकर्ते अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक, लालकृष्ण अडवानी यांनी मिळून 1950 मध्ये भारतीय जनसंघ नावाच्या एका अखिल भारतीय राजकीय पक्षाची स्थापना केली.

जनता पार्टीचा प्रयोग

देशात पार पडलेल्या पहिल्या निवडणुकीत देशातील सर्व समाजवादी गट एक होऊन ‘प्रजा सोशालिस्ट पार्टी’ या पक्षाच्या नावाखाली निवडणूक लढले. वास्तविक पाहता बेचाळीसचा लढा जयप्रकाश नारायण, लोहिया प्रभृतींनी समर्थपणे लढवला होता. त्यांनी हजारीबाग कारागृहातून केलेले पलायन गाजले होते. परंतु नेहरूंच्या करिष्म्यामुळे सर्व विरोधी पक्ष पाचोळ्यासारखे उडाले. देशात इंग्लंडसारखी द्विपक्षीय पद्धत येईल असे सर्व समाजवादी नेत्यांना वाटत होते. त्यानुसार ‘प्रसोपा’चे पंतप्रधानपदाचे उमेदवार लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंग्लंडप्रमाणे शॅडो कॅबिनेट पण बनवले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला व त्यांनी राजकारण संन्यास घेतला आणि ते सर्वोदय चळवळीत सामील झाले.

भारतीय जनसंघाचे यावेळेस केवळ चार खासदार निवडून आले होते व ते सर्व पश्चिम बंगालमधील होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा श्रीनगरच्या कारागृहात गूढ मृत्यू झाल्यामुळे जनसंघाची प. बंगालमधील घोडदौड तर थांबलीच, परंतु पीछेहाटही सुरू झाली. पितांबरदास, रघुवीर, डॉ. बलराज मधोक, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी अशी भारतीय जनसंघ विसर्जित होईपर्यंतच्या अध्यक्षांची मालिका होती. 1971 मध्ये स्व. इंदिरा गांधी यांनी लोकसभेचे एक वर्ष अगोदर विसर्जन करून लोकसभा निवडणुका घोषित केल्या व ‘गरीबी हटाव’ची घोषणा देऊन विरोधी पक्षांची धुळधाण उडवली. 1975 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या खासदारपदाची निवडणूक रद्दबातल ठरवल्यामुळे चिडून जाऊन त्यांनी देशावर आणीबाणी लादली. सर्व राजकीय पुढारी कारागृहात असल्यामुळे विचारमंथन झाले व मार्क्सवादी कम्युनिस्ट सोडून सर्व विरोधी पक्षांनी आपापले पक्ष विसर्जित करून जनता पार्टी नावाचा एकमेव पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली. 1977 सालच्या लोकसभा निवडणुकीत जनता पार्टीने काँग्रेस एसचा इंदिरा गांधींसह पराभव केला. परंतु विषय येथे संपला नाही. या पक्षाच्या खासदारांमध्ये जनसंघाचे अधिक खासदार होते व हे असेच चालू राहिल्यास जनसंघ हा पक्ष जनता पार्टीला गिळून टाकील असे वाटल्यामुळे काही मंडळींनी पक्षांतर्गत धूसफूस घडवून आणल्याने व चरणसिंह यांची सत्तापिपासा शिगेला पोचल्यामुळे हे सरकार अठरा महिन्यांनी कोसळले व नंतरच्या निवडणुकीत काँग्रेस पुनः सत्तेवर आली. इथेच जनता पार्टीचा हा प्रयोग फसला.

भाजपाची घोडदौड

आतापर्यंत काँग्रेसला संपवण्याची भाषा बोलणारा समाजवादी कंपू जनसंघ संपवण्यासाठी पुढे आला. जनसंघाचे कार्यकर्ते एकाचबरोबर जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन संघटनांचे सदस्य आहेत म्हणून ‘दुहेरी सदस्यत्व’ नावाचा एक बालिश विषय पुढे केला गेला. जनसंघाने रा. स्व. संघाचे विसर्जन करावे यासारखी सवंग मागणी पुढे येऊ लागली व म्हणूनच 1980 साली जनता पार्टीमधून जनसंघाची मंडळी बाहेर पडली व भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. दुहेरी सदस्यत्वाचा प्रश्न उपस्थित करणार्‍यांनी काय साधले? या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे. आज भारतीय जनता पार्टी स्वबळावर केंद्रात सत्तेवर आहे व जनता पार्टी नांगरधारी शेतकरी या आपल्या गाजलेल्या निवडणूक चिन्हासकट नामशेष झालेली आहे.

भारतीय जनता पार्टीचा प्रवास नेहमीच सुरळीतपणे चालू राहिला असे नाही. गांधीवादी समाजवाद यासारख्या बिनबुडाच्या व बिनशिडाच्या जहाजामुळे पक्षाला बरेच हेलकावे खावे लागले आहेत. अखेरीस लालकृष्ण अडवानी यांच्या श्रीराम रथयात्रेने पक्षाला हात दिला असे म्हणावे लागेल. गांधीनगर ते दिल्ली अशी निघालेली ही यात्रा बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवल्यामुळे भाजपाने केंद्रातील व्ही. पी. सिंह सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला व भारतीय जनता पार्टीला मार बसणे सोडाच- देशाच्या राजकारणात भाजपाने प्रचंड मुसंडी मारली. आतापर्यंत काँग्रेसविरुद्ध इतर पक्ष असे देशाचे राजकारण होते ते बदलून भाजपा विरुद्ध इतर पक्ष असे चित्र पालटले. वाजपेयी यांचे सव्यसाची नेतृत्व, अडवानी यांचे अथक परिश्रम व त्याचप्रमाणे प्रमोद महाजन या नव्या दमाच्या नेतृत्वाचे व्यवस्थापन व संघटनकौशल्य यांचा पक्षाच्या घोडदौडीत निश्चितच वाटा आहे.

भाजपामध्ये इतर पक्षांतून आलेल्यांचा भरणा वाढत होता. शिवाजी महाराजांच्या तत्त्वांना मुरड घातली नसती तर मराठ्यांना अटकेपार झेंडे लावता आले नसते हे तितकेच खरे आहे. परंतु आज सर्वच भाजपेतर पक्ष हतबल बनलेले आहेत. मुलायमसिंह, लालूप्रसाद यांसारखे घराणेशाहीमध्ये अडकलेले पक्ष, तर शेवटचे आचके खाणारा काँग्रेस पक्ष असे भारतीय राजकारणाचे आजचे चित्र आहे. कोणत्याही पक्षाची सत्ता अनिर्बंध असून चालत नाही, परंतु भाजपाच्या चाळिसाव्या वर्धापनवर्षानिमित्त दिसून येणारी परिस्थिती द्विपक्षीय पद्धतीला पोषक ठरेल असे वाटत नाही.