-ः इतिहासाच्या पाऊलखुणा ः- भारतीय इतिहासाला वसाहतवाद्यांनी दिलेले विकृत वळण

0
135
  • दत्ता भि. नाईक

 

स्वतःचाच इतिहास नष्ट करणार्‍यांनी आपल्या इतिहासाचे काय केले याची चर्चा तरी करून काय उपयोग? आता आपल्या इतिहासाला संपूर्णपणे आधुनिक प्रमेयांचा वापर करून स्पष्टपणे मांडण्याची आवश्यकता आहे. भारतीय इतिहासाला वसाहतवाद्यांनी दिलेले विकृत वळण आता सरळ करण्याची वेळ आलेली आहे.

 

भारतीयांना दैनंदिनी लिहिण्याची सवय नाही. त्यामुळे रामायण व महाभारत या महाकाव्यांची कालनिश्‍चिती करणे अतिशय अवघड बनलेले आहे. महाभारताचे तर ‘जयोनामेतिहासोयम्’ म्हणजे ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ अशीच त्याच्या सुरुवातीला व्याख्या करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा या इतिहासाचा कालखंड ठरवणे हे इतिहासकार व पुरातत्त्ववेत्ते यांच्यासमोर मोठे आव्हान होऊन बसले आहे. ज्या काळात पुस्तक छपाई नव्हती, चित्रपट नव्हते, अगदी अलीकडच्यासारख्या दूरदर्शन मालिका नव्हत्या त्या काळात कथा-कीर्तन व नाट्य यांद्वारा भारतीय जनमानसावर या दोन्ही महाकाव्यांचा व त्यांच्या जोडीस भागवतासारखी अन्य पुराणे यांचा प्रभाव होता हे लक्षात येते. यातील घटना कालपरवाच घडल्यासारखे सर्वसामान्यांना वाटत असे. त्यामुळे यातील घटनाक्रमांचा कालखंड कोणता असेल याचीही चौकशी करावी असे कुणाला वाटले नाही. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास भारतात इंग्रजांचा प्रवेश झाल्यापासून ऋग्वेदापासून सुरू झालेल्या वाङ्‌मयीन परंपरेचा काळ ठरवणे यापासून ते ठिकठिकाणी उत्खनन करून प्राचीन नगरे, गावे तसेच सभ्यतेचा अभ्यास करणे यांसारखे खटाटोप सुरू झाले. त्यात फाळणीपूर्वीचा अखंड पंजाब व सिंधमधील मोहेंजो दडो व हडाप्पा अशा दोन ठिकाणी उत्खनन करण्यात आले. आश्‍चर्य म्हणजे मागासलेला म्हणून गणलेल्या या देशात अतिशय सुनियोजित असलेली नगररचना अस्तित्वात असलेली सभ्यता नांदत होती हे सिद्ध झाले. सिंधू नदीच्या खोर्‍यातील संस्कृती म्हणून हिला सिंधू संस्कृती (इंडस सिव्हिलायझेशन) हे नाव देण्यात आले.

‘आर्य’ हा शब्द वंशवाचक नव्हे

भारतात अस्तित्वात असलेल्या भाषांचाही अभ्यास केल्यानंतर पाश्‍चात्त्य विद्वान संस्कृतसारख्या अतिविकसित भाषेच्या संपर्कात आले. युरोपमधील प्राचीन भाषा असलेल्या लॅटिन व ग्रीक भाषांमधील अनेक शब्दांचे संस्कृत शब्दांशी असलेले साध्यर्म पाहून त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. याशिवाय त्याच्या दोन्ही प्राचीन भाषांचे मूळ संस्कृतमध्ये असावे इतकी भाषा विकसित आहे हेही त्यांच्या संशोधक बुद्धीच्या लक्षात आले. साम्राज्यवादी, वसाहतवादी कार्यक्रम घेऊन जगभर राज्य करण्यासाठी निघालेल्या इंग्रज व इतर गोर्‍या कातडीच्या लोकांना त्यांच्या भाषांचे मातृत्व त्यांच्या ताब्यात असलेल्या देशातील भाषेला द्यावे हे परवडणारे नव्हते. ‘आर्य’ हा शब्द संस्कृत; अपभ्रंश व सर्व प्राकृत भाषांमध्ये श्रेष्ठ या अर्थाने वापरला गेलेला आहे. भगवान बुद्धांनी आपले तत्त्वज्ञान चार वाक्यांतून सांगितलेले आहे. त्यांना ‘आर्यसत्य’ असे म्हणतात. ज्या रावणाला वेगळ्या वंशावळीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो त्या रावणाला त्याची पत्नी मंदोदरी ‘हे आर्य’ म्हणून संबोधीत होती. परंतु परकीय इतिहासकारांनी ‘आर्य’ शब्द वंशवाचक ठरवून त्यांनी युरोपमधून निघून मध्य आशियामधून भारतावर आक्रमण केले असा निष्कर्ष काढला व ठामपणे त्याचा प्रचार केला त्यामुळे आपल्या देशातील संपूर्ण इतिहास संशोधनावर या संकल्पनेचा प्रभाव पडलेला दिसून येतो.

युरोपमध्ये जेव्हा कोणतीही सुनियोजित व्यवस्था नव्हती त्या काळात भारतात नगरनियोजन होते. भाषेच्या बाबतीत तर सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला होता म्हणून या देशातील समाज ज्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो तिला उपरी ठरवण्याचा सुनियोजित डाव रचला गेला. सिंधू खोर्‍यातील सभ्यता ही आर्यपूर्व असून तिला द्रविड ही मुळात वंशवाचक नसलेली दुसरी संकल्पना चिकटवण्यात आली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे द्रविडही बाहेरून आले. त्यांनी सिंधू सभ्यता वसवली. त्यांना घोड्यांचा वापर माहीत नव्हता. घोड्यावर बसून आलेल्या आर्यांनी त्यांची सरसहा कत्तल केली व शिल्लक राहिलेले दक्षिणेला गेले. आर्य या देशात स्थिर झाल्यानंतर वैदिक सभ्यतेची सुरुवात झाली.

संशोधनापूर्वीच निष्कर्ष

सरस्वती नावाची नदी लुप्त झाल्याचा उल्लेख वैदिक वाङ्‌मयात आढळतो. या घटनेचा भारतीय जनमानसावर इतका प्रभाव आहे की, प्रयागराज येथे गंगा, यमुना व सरस्वती यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे असे मानले जाते. इतकेच नव्हे तर देशभर कित्येक ठिकाणी दोन नद्यांचा संगम होत असला तरी तेथे गुप्त सरस्वती आहे असे मानले जाते व सर्वसाधारणपणे अशा संगमाला त्रिवेणी संगम म्हटले जाते. अलीकडच्या काळात भारतीय इतिहास संकलन समितीच्या प्रयत्नाने या जमिनीखाली लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा शोध लावण्यात आला असून ती सिंधू नदीच्या समांतर वाहत होती हे सिद्ध झाले आहे. आणि भूकंपासारख्या कोणत्यातरी नैसर्गिक आपत्तीमुळे ही नदी भूमिगत झाल्यामुळे तिच्या किनार्‍यावरील वस्ती एकतर गाडली गेली किंवा परागंदा झाली असे नवीन संशोधनावरून सिद्ध झाले आहे.

इंग्रज संशोधकांनी संशोधन सुरू होण्यापूर्वीच निष्कर्ष लिहून तयार ठेवल्यामुळे या सिंधू-सरस्वती सभ्यतेतील उत्खननात घोड्याचे हाड सापडूनही तिथे घोडा नव्हता असा निष्कर्ष काढला होता. हे ज्यांनी द्वारकेचा शोध लावला त्या पुरातत्त्व विद्वान डॉ. एस. आर. राव यांनी स्पष्टपणे मांडले आहे की, सभ्यता अवैदिक ठरवण्याचेही आटोकाट प्रयत्न करण्यात आले, परंतु जसजसे उत्खनन विकसित होत गेले तसतसे या स्थानांवर यज्ञाच्या वेळी समिधांचे साहित्य वगैरे वस्तू सापडल्या ज्यावरून ही सभ्यता वैदिक होती हे सिद्ध होते. या सभ्यतेच्या काळासंबंधानेही गोंधळ करून ठेवलेला आहे. त्यामुळे या सर्व संशोधनाकडे भारत केंद्रित दृष्टिकोनातून लक्ष पुरवण्याची आवश्यता निर्माण झालेली आहे.

आधुनिक प्रमेयांचा वापर करावा

१९८० च्या आसपास झालेल्या संशोधनातून भारतावरील आर्यांचे कथित आक्रमण ही असत्य कल्पना असल्याचे सिद्ध झालेले आहे. जगातील विविध भाषांमधील साम्य हे वांशिक आधारावर नसून निरनिराळ्या संस्कृतीमधील संपर्कामुळे असे साम्य घडलेले दिसून येते. महाभारतात पांडव वारणावत येथे जाण्यापूर्वी लाक्षागृहाचा धोका काय आहे हे विदूर युधिष्ठिराला म्लेच्छ भाषेतून समजावून सांगतो असा उल्लेख आहे. याचा अर्थ राजघराण्यातील महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती परदेशी भाषेचा गुप्त संदेश देण्याकरिता वापर करीत होते. सर्व बारा राशींची नावे, नक्षत्रांची नावे, सात वारांची नावे यात आढळणारे कमालीचे साम्य पाहता जगभरातील विद्वानांचा एकमेकांशी संपर्क होता व अधूनमधून ते एकत्र बसून विचारमंथन करत असावे असा निष्कर्ष निघतो. यावरून भाषा वा इतर ज्ञानविज्ञानासंबंधी साम्यस्थळावरून वंशविषयक निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल व या मताशी हल्लीचे बहुतेक सर्व अभ्यासक सहमत आहेत.

उत्खनन व संशोधनाची प्रगत साधने यांच्यामुळे साम्राज्यवादी व वसाहतवादी संशोधकांचे निष्कर्षच काय तर त्यांची प्रमेयेही आता धुडकावून लावण्यात आलेली आहेत. संगणकाच्या युगात प्रणिनीच्या व्याकरण सूत्रांच्या आधारावर संस्कृत ही सर्वोत्कृष्ट भाषा आहे हे आता सिद्ध झाले आहे. चर्च या संस्थेने युरोपमधीलही कालगणना नष्ट करून बी.सी. आणि ए.डी.ची प्रथा सुरू केली. ज्युलियस सिजर आपल्या दरबारात आदेश देताना कोणती कालगणना वापरत असे याला उत्तर नाही. सोक्रेटिसचा जन्म त्यांच्या कालगणनेनुसार कोणत्या वर्षी झाला याची नोंद नव्हती की त्यांच्या आईवडिलांनी बी.सी. म्हणून पुढे होऊ घातलेल्या कॅलेंडरचा विचार करून दिनांकाची नोंद केली होती? स्वतःचाच इतिहास नष्ट करणार्‍यांनी आपल्या इतिहासाचे काय केले याची चर्चा तरी करून काय उपयोग? आता आपल्या इतिहासाला संपूर्णपणे आधुनिक प्रमेयांचा वापर करून स्पष्टपणे मांडण्याची आवश्यकता आहे. भारतीय इतिहासाला वसाहतवाद्यांनी दिलेले विकृत वळण आता सरळ करण्याची वेळ आलेली आहे.