-ः अवती-भवती ः- छोटे-मोठे

0
398
  • दत्ताराम प्रभू-साळगावकर

मी त्या मुलाची पाठ थोपटली व त्याला शाबासकी दिली. प्रश्नाच्या उत्तराचा व शिक्षणाचा काहीही संबंध नव्हता; असलाच तर निरीक्षण किंवा अनुभवाचा! त्या मुलाकडे निरीक्षणशक्ती होती याचा प्रत्यय आला.

 

छोटे आणि मोठे म्हणजे वयानं छोटे व वयानं मोठे. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात फरक असतो; अर्थात त्यांच्या वयोमानानुसार. छोट्यांचा मेंदू परिपक्व नसतो, मोठ्यांचा असतो असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. छोट्यांचं बोलणं, वागणं तेवढं मनावर घेतलं जात नाही; ‘असूदे, लहान आहे तो!’ असं म्हणून सोडून दिलं जातं, नाहीतर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मोठ्यांच्या बाबतीत मात्र असं करायला वाव नसतो. मोठ्यांचं वागणं, बोलणं व्यवस्थित व रीतीभातीला धरूनच असावं लागतं; अर्थात मंदबुद्धी किंवा वेडसर लोक सोडले तर! छोट्यांचा खुळचटपणा ‘बालिश’ म्हणून पचून जातो, शोभत नसला तरी! मोठ्यांचं असलं शोभत नाही व पचूनही जात नाही. काहीवेळा आपल्याला असं काही अनुभवायला मिळतं की मोठेही बालिशपणा करतात. एका शिकल्या-सवरलेल्या मुलीची गोष्ट…

मुलगी मध्यमवर्गीय कुटुंबातली. अशा कुटुंबातल्या स्त्रिया सुशिक्षित असतात, तरीही घरातलं काम, येणार्‍या-जाणार्‍यांचं आदरातिथ्य म्हणजे थोडक्यात ‘गृहशास्त्र’ करतात. पुरुषलोक नोकरी-धंदा, व्यवसाय म्हणजे जास्त करून ‘अर्थशास्त्र’ करतात. अशा कुटुंबात शिक्षणाला महत्त्व असतं. मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष असा भेदभाव सहसा नसतो. कुटुंब अगदी उच्चशिक्षितांचं नसलं तरीही! मोठ्यांकडून संस्कार, रीतभात, वागणूक शिकविली जाते. चुकलं-माकलं तर लक्षात आणून दिलं जातं, समजावलं जातं. कुटुंब ‘सुखवस्तू’, माणसं कुटुंबवत्सल व घर सुख‘वास्तू’ असतं!

घरात देवकार्य होतं. कुटुंबापुरतं मर्यादित, सोडून आत्या, मामा असले जवळचे नातेवाईक. हे लोक दुपारच्या महाप्रसादाला उपस्थित होते. यजमानांचा मेहुणा म्हणजे बायकोचा भाऊ काही महत्त्वाच्या कामात व्यक्त असल्यामुळे महाप्रसादाला उपस्थित राहू शकला नाही. जेवणं उरकल्यावर बर्‍याच वेळानं पोहोचला. त्याला महाप्रसादाचं जेवण जेवायचा आग्रह झाला. पण तो म्हणाला, ‘जेवून आलो. प्रसादाचं ‘गोडसं’ थोडं द्या.’ जेवणात खीर म्हणतात तसल्या प्रकारचं गव्हाच्या जाड रव्याचं बनवलेलं ‘सोजी’ गोडसं होतं. चविष्ट असं रसायन, पक्वान्न! बहिणीनं स्वहस्ते एका थाळीमधून ते गोडसं आणलं व भावाच्या पुढ्यात ठेवून गेलं. अनावधानाने ते खाण्यासाठी लागणारा चमचा द्यायचा राहून गेला. भावानं चमच्याची मागणी केली. बहिणीनं आपल्या मुलीला हाक मारली, ‘अगं, मामाना सोजी खायला चमचा आणून दे.’ मुलगी पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. तिला पुन्हा एकदा जागवावी लागली. ‘अगं, लवकर आणून दे.’

‘आणते-आणते’ म्हणून पुस्तकात डोकं खुपसलेल्या स्थितीतच ती घरात गेली व चक्क पळी घेऊन आली व मामाच्या हाती दिली. मागितला चमचा, हाती आली पळी! मामाही तेवढेच बहाद्दर, त्याच पळीनं सोजी खायला सुरुवात केली. तेवढ्यात बहीण भावाबरोबर चार गप्पा मारण्यासाठी आली. पाहते तर काय? भाऊ पळीनं सोजी खातो आहे! मुलीवर ओरडली, ‘अगं, तुला चमचा आणून द्यायला सांगितला तर तू पळी आणून दिलीस? पळीनं तू तरी कधी सोजी खाल्ली आहेस काय? चल चमचा घेऊन ये लवकर!’

मामाना पळीनं सोजी खायला जमेना, जमणार कशी? त्यानी थाळी उचलली व तोंडाला लावली; सोजी अक्षरशः भुरकली व खायची कामगिरी उरकली! मुलगी चमचा घेऊन आली पण आता त्याचा उपयोग काय? मामानी सोजी तर खाऊन संपवली. बहीण खजील झाली. मुलीवर पुन्हा ओरडली, ‘काय हे? असं काम केलंस तर कसं होईल? उद्या लग्न होऊन सासरी गेल्यावर काय होईल याची चिंता वाटते बाई. माणसं समंजस असतील तर ठीक, नाहीतर जिणं हराम होईल.’ मुलीची कानउघाडणी केली. ऐकून मामाही थोडे व्यथित झाले. म्हणाले, ‘मी चमच्यासाठी थांबायला हवं होतं. उगाच थाळी तोंडाला लावली.’ भुरकलेली सोजी मामांच्या जिव्हारी लागली. ‘जाऊ दे गं, आणखी विषय वाढवू नकोस’ साळसूद सल्ला दिला.

शिकलं म्हणून कोणी शहाणा होतो असं नाही. व्यावहारिक ज्ञान मिळवावं लागतं!

***********

लहानपणी एक विनोद ऐकला होता, दोन वेड्यांचा. एक वेडा दुसर्‍या वेड्याला म्हणतो, ‘तुला एक उत्तम प्रश्न विचारतो, समुद्राला आग लागली तर त्यातले मासे कुठे जातील?’ दुसरा वेडा म्हणतो, ‘या प्रश्नाचं उत्तर न यायला मी काय वेडा आहे की काय? साधं आहे, झाडावर चढतील.’ त्यावर पहिला म्हणतो, ‘शहाणाच आहेस, झाडावर चढायला ती काय गुरं आहेत?’ विनोद ऐकून त्यावेळी मी पोटभर हसलो होतो. मोठेपणी मी एका मित्राच्या घरी समारंभाला गेलो होतो. पुष्कळशी बच्चेमंडळी उपस्थित होती व त्यांच्या ‘लिला’ चालल्या होत्या. मला त्या वेड्यांच्या विनोदाची आठवण झाली व मुलांना तो प्रश्न विचारायची हुक्की आली. मी त्यांना विचारलं, ‘अरे सांगा, समुद्राला आग लागली तर त्यातले मासे कुठं जातील?’ एकजण म्हणाला, ‘बिळात शिरतील.’ दुसरा म्हणाला, ‘उड्या मारून बाहेर पडतील.’ कोणी म्हणाला, ‘दूरवर पळून जातील.’ अजाण बालकंच ती; उत्तरं ऐकून उपस्थितांची करमणूक झाली. बहुतेकांनी कदाचित समुद्र प्रत्यक्ष पाहिलेलाही नसावा! पण त्यांत खेडेगावातला एक मुलगा होता. म्हणाला, ‘समुद्राला आग लागतेच कशी?’

‘का नाही?’ मी विचारलं.

म्हणाला, ‘समुद्र म्हणजे पाणी.’

‘म्हणून काय झालंय’- मी.

‘आमची आई कधीकधी चुलीवर स्वयंपाक करते. करून झाला की अर्धवट जळलेली लाकडं बाहेर काढते व त्यांच्यावर पाणी ओतते व ती विझतात. पाणी जर आग विझवतं तर पाण्याच्या समुद्राला आग लागेलच कशी?’ मुलाने स्पष्टीकरण केले.

मी त्या मुलाची पाठ थोपटली व त्याला शाबासकी दिली. प्रश्नाच्या उत्तराचा व शिक्षणाचा काहीही संबंध नव्हता; असलाच तर निरीक्षण किंवा अनुभवाचा! त्या मुलाकडे निरीक्षणशक्ती होती याचा प्रत्यय आला.

सारांश, मोठे लोक कधी बालिशपणा करतात, तर छोटे बुद्धिमान असतात!