५९ ऍप्सवर बंदीनंतर चीनकडून चिंता व्यक्त

केंद्र सरकारने भारतात ५९ चिनी ऍप्सवर बंदी आणल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी, त्यांचा देश भारताने उचललेल्या पावलानंतर चिंतेत असल्याचे म्हटले आहे. याबाबतच्या परिस्थितीची पडताळणी चीनकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चिनी ऍप्सवर बंदी घातल्याच्या भारताच्या निर्णयावर चीनकडून ही पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

वापरकर्त्यांची माहिती चोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घालण्यात आल्याचे सोमवारी केंद्र सरकारने जाहीर केले. यामध्ये टिकटॉक, कॅमस्कॅनर, शेअरइट अशा अनेक लोकप्रिय ऍप्सचाही समावेश आहे.