३ हजार एलईडी दिवे वितरीत; आज, उद्या ७ हजार देणार

गणेश चतुर्थीपूर्वी राज्यातील चाळीसही मतदारसंघांत प्रत्येकी ३०० एलईडी दिवे देण्याची सोय करण्यात येणार असून वीज खात्याने यापूर्वीच ३ हजार एलईडी दिव्यांचे वितरण केले आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल दिली.

गुरुवारपर्यंत (आज) वीज खाते विविध मतदारसंघात आणखी २ हजार एलईडी दिव्यांचे वितरण करणार आहे. तर शुक्रवारी (उद्या) आणखी ५ हजार एलईडी दिवे मतदारसंघांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती काब्राल यानी दिली. यामुळे विरोधी नेते दिगंबर कामत यांनी विनाकारण सरकारवर टीका करू नये, असे ते म्हणाले.
चतुर्थीपूर्वी प्रत्येक मतदारसंघांत १५० एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात येईल, असे आश्‍वासन आपण दिले होते. तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रत्येक मतदारसंघांत ३०० एलईडी देऊ असे म्हटले होते.

वीज खात्याच्या स्टोअर्समधून आम्ही यापूर्वीच ३ हजार एलईडी दिव्यांचे वितरण केले आहे. तर आज गुरुवारी आणखी २ हजार दिव्यांचे वितरण होईल तर शुक्रवारी आणखी ५ हजार एलईडी वितरण केले जातील. चतुर्थीपूर्वी गोव्यातील सर्व मतदारसंघ ह्या दिव्यांमुळे उजळून निघणार असल्याचे काब्राल म्हणाले.