ब्रेकिंग न्यूज़

२७०० कोटींचे हेरॉईन अत्तारी सीमेवर जप्त

>> जकात खात्याची कारवाई

जकात खात्याने काल अत्तारी सीमेवर काल केलेल्या एका कारवाईत पाकिस्तानमधून भारतात तस्करी केले जाणारे सुमारे २७०० कोटी रुपये किमतीचे ५३२ किलो एवढे अंमली पदार्थ (हेरॉईन) जप्त केले. या खात्याच्या कारवाईत आतापर्यंतचे हे सर्वात मोठे घबाड ठरले आहे. एका ट्रकमधून हे अंमली पदार्थ (हेरॉईन) आणले जात होते. जकात आयुक्त दीपक कुमार गुप्ता यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

या माहितीनुसार अंमली पदार्थ तस्करीचे हे एक मोठे रॅकेट असून त्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या काश्मीर खोर्‍यातील व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तर हा माल आयात करणार्‍या अमृतसरस्थित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
जकात अधिकार्‍यांच्या या कारवाईत ५३२ किलो हेरॉईनसह ५२ किलो अन्य मिश्र अंमली पदार्थही सापडले आहेत. भारतीय जकात खात्याच्या इतिहासातील जप्त करण्यात आलेले हे सर्वाधिक अंमली पदार्थांचे घबाड असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

अंमली पदार्थांची नियोजनबध्द अशी तस्करी करण्याचे हे रॅकेट असून याचा सूत्रधार हा काश्मीरमधील हंडवारा येथील तारीक अहमद याला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. सदर माल आयात करणार्‍या अमृतसरमधील व्यक्तीची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.