२४ तासांत कोरोनाचे आणखी ३ बळी

>> राज्यात एकूण १७ मृत्यू, नवीन १३० पॉझिटिव्ह

राज्यात कोरोना विषाणूमुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह तिघांचा मृत्यू झाला. मागील ७२ तासात कोरोना पॉझिटिव्ह ८ रुग्णांचा बळी गेला असून एकूण बळी १७ झाले आहेत. दरम्यान, राज्यात नवीन १३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह ५३ रुग्ण बरे झाले आहेत.
मडगाव येथील कोविड इस्पितळात मांगूर हिलमधील ४५ वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाला. या महिलेला ६ जुलैला इथे दाखल केले होते. त्यानंतर वास्कोतील ६० वर्षीय रुग्णाचे सकाळी ११.३० च्या सुमारास निधन झाले. त्याला मागील आठवड्यात इस्पितळात दाखल केले होते. या मृत व्यक्तीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

बावीस दिवसांत १७ बळी
राज्यात मागील २२ दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह १७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात २२ जूनला कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली. सत्तरी तालुक्यातील मोर्ले गावातील एका ८५ वर्षीय रुग्णाचे निधन झाले. त्यानंतर कोरोनाने मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोविड इस्पितळामध्ये ९ पुरुष आणि ५ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, इस्पितळाच्या बाहेर ३ पुरुषांचा मृत्यू झाला आहे.
चिंबल येथे नवीन १० रूग्ण आढळून आले आहेत. मांगूर लिंकमध्ये नवीन २२ रूग्ण आढळले आहेत. कुंकळ्ळी १२, फातर्पे ३, मडगाव ३, मोले २, तळावली ३, वेरे २, फोंडा, डिचोली येथे प्रत्येकी १ नवीन रूग्ण आढळला आहे.

इतर आजारांमुळे मृत्यू ः मुख्यमंत्री
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह निधन झालेले बहुतेक रुग्ण इतर आजारांनी त्रस्त होते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा को-मॉर्बिड कंडिशनमुळे मृत्यू झाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. कोरोना विषाणूची बाधा झालेला एका रुग्णाला कॅन्सर झाला होता. चार ते पाच रुग्ण मूत्रपिंड, लिव्हर व इतर आजारांनी त्रस्त होते. तसेच काही रुग्णांचे वय ७० वर्षे, ८० वर्षे, ८५ वर्षांचे असल्याने कोरोनाला बळी पडल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पणजीत बँक कर्मचारी पॉझिटिव्ह
पणजीतील एका बँकेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तो कर्मचारी पर्वरी येथील रहिवासी आहे. त्यामुळे बँक मंगळवारपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. या कर्मचार्‍याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोविड चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रुग्णवाहिका अपुर्‍या
आरोग्य खात्याकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना इस्पितळ, कोविड सेंटरमध्ये हालविण्यासाठी सात रुग्णवाहिका होत्या. राज्यातील वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे रुग्णवाहिका अपुर्‍या पडत होत्या. कोरोनाची विषाणूची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची कोविड केअर सेंटरमध्ये हालविण्यासाठी जीटीडीसीच्या ९ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात कोविड चाचणी केली जात असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सतर्क राहण्याची गरज आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.६ टक्के एवढे आहे. तर मृत्यूचे प्रमाण ०.६१ टक्के एवढे आहे, असे आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

आमदार डायस यांची प्रकृती स्थिर
कोविड इस्पितळामध्ये उपचार घेणार्‍या आमदार क्लाफासियो डायस यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती कोविड इस्पितळाच्या प्रमुख डॉ. सुनंदा आमोणकर यांनी दिली.

वेर्ण्यातील कंपनीत नवीन ५४ पॉझिटिव्ह
वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका फार्मा कंपनीत नवीन ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी या कंपनीमध्ये २६ जण पॉझिटिव्ह आढळले होते. आणखी सुमारे ६७ कर्मचार्‍यांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी सुरू आहे. त्यांचा तपासणी अहवाल जाहीर झालेला नाही. औद्योगिक वसाहतीमधील आणखीन दोन – तीन कंपन्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. औद्योगिक कंपन्यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करावी, असे आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी सांगितले.

मुरगावात आतापर्यंत ११ बळी
कोविड -१९ विषाणूमुळे गोव्यात काल सोमवारी तिघांचा मृत्यू झाला. हे तिघेही वास्कोतील असून आत्तापर्यंत कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात ११ जणांचा बळी गेलेला आहे. तर गोव्यात एकूण १७ जणांचा कोविड -१९ महामारीने मृत्यू झालेला आहे. मडगाव कोविड इस्पितळात उपचार घेत असलेली वास्को मांगूर हिल कंटेनमेंट झोनमधील एक ४७ वर्षीय महिला, वास्को वरुणापुरी येथील ५८ वर्षीय व वास्को बेलाबाय येथील ६० वर्षीय व्यक्तींचे इस्पितळात उपचारादरम्यान सोमवारी निधन झाले.

राज्यात आत्तापर्यंत ९१ हजार १८२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील २५८३ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. आत्तापर्यंत १५४० रुग्ण बरे झाले आहेत.

डॉ. एडविन गोम्स पॉझिटिव्ह

मडगाव कोविड इस्पितळाची स्थापना केलेले डॉ. एडविन गोम्स यांची तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह सापडले. डॉ. गोम्स यांनी सुरूवातीपासून सतत ९८ दिवस या इस्पितळत काम केले व त्यानंतर ते २१ दिवसांच्या सुट्टीवर गेले होते. ते वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक व इस्पितळातील डॉक्टर आहेत. इस्पितळात डॉ. गोम्स यांच्या नेतृत्त्वाखालील इतर डॉक्टरांची तपासणी केली असता त्यांची चाचणी निगेटिव्ह आली.

खाजगी इस्पितळांतील आयसीयूत २० टक्के जागा राखीव
राज्यातील खासगी इस्पितळांनी आपल्या आयसीयूमधील २० टक्के जागा कोविड व्यवस्थापनासाठी राखीव ठेवाव्यात, असा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी दिली. कोविड व्यवस्थापनासाठी सहकार्य न करणार्‍या खासगी इस्पितळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. प्रसंगी इस्पितळाचा परवाना रद्द करण्यास मागे पुढे पाहिले जाणार नाही, असा इशारा आरोग्य सचिव मोहनन यांनी दिला.