२०२२ महिला आशिया चषक भारतात

>> एएफसीने केले यजमानपद बहाल; १९७९नंतर प्रथमच मिळाला मान

भारतात २०२२साली महिला आशिया चषकाचे आयोजन होणार आहे. एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनने काल १९७९नंतर प्रथमच भारताला हे महिला आशिया चषकाचे यजमानपद बहाल केले आहे. १९७९साली झालेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपविजेतेपद प्राप्त केले होते.
एएफसी महिला फुटबॉल समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारीमध्ये एएफसी महिला फुटबॉल समितीने भारताला यजमानपद देण्याची शिफारस केली होती.

एएफसीचे सरचिटणीस डेटो विंडसर जॉन यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला लिहिलेल्या पत्रात समितीने एएफसी महिला आशियाई चषक २०२२ च्या फायनल्सच्या यजमानपदाचे अधिकार अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला बहाल करण्यात आल्याचे म्हटले आहे. ही स्पर्धा २०२२च्या उत्तरार्धात होणार आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल केल्याबद्दल आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनचे आभार व्यक्त केले आहेत. या स्पर्धेद्वारे भारातील महिला खेळाडूंचा उत्साह निश्‍चितच वाढेल आणि देशातील महिला फुटबॉलच्या क्षेत्रात सर्वंकष सामाजिक क्रांती निर्माण होईल, असे पटेल म्हणाले.

स्पर्धेत १२ संघ सहभागी होणार आहेत. गेल्या वेळी ८ संघाचा समावेेश होता. आता आणखी चार संघांना स्थान देण्यात आले आहे. भारतीय महिला संघ थेट यजमान म्हणून पात्र ठरला आहे. ही स्पर्धा २०२३ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम पात्रता स्पर्धा असेल. पुढील वर्षी भारतात फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे २०२२च्या आयोजनाचे अधिकार भारताला मिळाल्याने निश्‍चितच उत्साह दुणावणार आहे.
यापूर्वी भारतात २९१६साली एफएफसी अंडर-१६ अजिंक्यपद तर २०१७साली फिफा अंडर-१७ विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी आयोजनही झाले होते.

ही स्पर्धा भारतातील महिला फुटबॉलला अधिक लोकप्रिय करण्यासाठी मोठी भूमिका बजावेल. २०२१पर्यंत स्थगित झालेल्या २०२० अंडर-१७ महिला विश्वचषका पाठोपाठ आता २०२२ महिला आशिया चषकाचे यजमानपदही भारताला मिळाल्याने आम्हाला फुटबॉल क्षेत्रातील गती टिकवून ठेवण्यास मदत होईल, असे एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास यांनी आनंद व्यक्त करताना म्हणाले.