२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना होता ‘फिक्स’

>> लंकेच्या तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी केला दावा

>> यापूर्वी रणतुंगानेही केला होता खळबळजनक आरोप

१९९६ विश्वचषक विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगानंतर आता श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमागे यांनीही भारत आणि श्रीलंका यांच्यात २०११ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना ‘फिक्स’ होता असा मोठा आरोप केला आहे. लंकेतील ‘न्यूज फर्स्ट’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महिंदानंद यांनी सरळ सरळ श्रीलंकन संघाने तो अंतिम सामना भारताला ‘विकला’ होता असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमावत २७४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. त्यात महिला जयवर्धनेने नाबाद १०३ धावांची शतकी खेळी केली होती. तर कर्णधार कुमार संगकाराने ४८ चेंडूत ६७ धावा जोडल्या होत्या. प्रत्युत्तरात खेळताना गौतम गंभीर (१२२ चेंडूत ९७) आणि महेंद्रसिंह धोनीने त्याला चांगली साथ देताना ९१ धावांची तडफदार खेळी केली होती. अखेर धोनीने ११ चेंडूत ४ धावांची गरज असताना षटकार खेचत टीम इंडियाला दुसर्‍यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते. भारताने हा सामना ४ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा करीत जिंकला होता.
१९८३नंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०११ साली अंतिम सामन्यात श्रीलंकेला नमवीत २८ वर्षानंतर पुन्हा एकदा जगज्जेते बनण्याचा मान मिळविला होता. त्यावेळी महिंदानंद हे श्रीलंकेचे क्रीडामंत्री होते. आपण हे वक्तव्य विचारपूर्वक करीत असून त्याची पूर्ण जबाबदारी आपण घेत असल्याचेही महिंदानंद यांनी स्पष्ट केल्याने त्यांनी केलेल्या आरोपांना बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण त्यावेळी देशाचा क्रीडामंत्री होतो आणि मला त्या गोष्टीवर विश्वास आहे. ही माझ्या देशाच्या सन्मानाची बाब असून आणि त्यामुळे आपण त्याबाबतीत आता जास्त खुलासा करू इच्छित नसल्याचे २०१० ते २०१५पर्यंत श्रीलंकेचे क्रीडामंत्री राहिलेल्या महिंदानंद यांनी स्पष्ट केले.

२०११ साली माझ्या क्रीडामंत्रीपदाच्या कारकिर्दीतच हा सामना फिक्स झाला होता. मी या माझ्या विधानावर ठाम आहे. आम्ही हा सामना जिंकू शकलो असतो, परंतु त्याचा निकाल पूर्वीच निश्‍चित झाला होता. त्यामुळे आम्ही तो गमावला. हे वक्तव्य मी स्वतः करीत असून त्याची पूर्ण जबाबदारी घेत आहे. पण मी यामध्ये गुंतलेल्या कोणाचीही नावे घेऊ इच्छित नाही, असे महिंदानंद यांनी सांगितले.

दावा करताना पुरावे
सादर करावेत ः संगकारा
दरम्यान, श्रीलंकन संघाचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकारानेही हा आरोप धुडकावून लावताना तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी असा आरोप करताना योग्य पुरावे सादर करण्याचे आवाहन केले. जर पुरावे सादर केले गेले तर या प्रकरणाबाबत योग्य तो तपास केला जाऊ शकतो. त्यामुळे आरोप करण्याअगोदर पुरावेही सादर करणे महत्त्वाचे असते असे संगकाराने स्पष्ट केले.

ही आहे निवडणुकीपूर्वीची
सर्कस ः जयवर्धने
दरम्यान, या सामन्यात शतकी खेळी केलेल्या महेला जयवर्धने याने हा आरोप फेटाळून लावताना निवडणुका जवळ पोहोचल्याने हा राजकीय खेळ सुरू झाला असल्याचे म्हटले आहे. असा आरोप करणार्‍या माजी क्रीडामंत्र्यांनी आपल्या दाव्याबाबत पुरावे सादर करण्यास जयवर्धनेने सांगितले. निवडणुका जवळ आल्या आहेत का? असा प्रश्‍न करीत हे सगळे म्हणजे निवडणुकीपूर्वीची सर्कस असल्यासारखे वाटतेय. क्रीडामंत्र्यांनी पुरावे सादर करावेत. ते कुठे आहेत? असे जयवर्धने म्हणाला.