२र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ

>> गोव्याच्या खेळाडूंची सकारात्मक सुरुवात

२र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला काल ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियममध्ये शानदार प्रारंभ झाला. स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंनी सकारात्मक सुरुवात केली आहे.

२३ देेशांतील मिळवून ३७ ग्रँडमास्टर्स, जेतेपदे मिळविलेले विविध देशांतील १०० बुद्धिबळपटू मिळून सुमारे १२००च्या वर खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. त्यापैकी ५ जण हे सुपर ग्रँडमास्टर्स आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन गोव्याचे वीजमंत्री तथा गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष निलेश काब्राल यांच्या हस्ते सागचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार तथा स्पर्धा संचालक किशोर बांदेकर, एआयसीएफचे उपाध्यक्ष आयएम शेखर साहू व जीसीएचे उपाध्यक्ष वसंत नाईक, महेश कांदोळकर, खजिनदार विश्वास पिळणकर व मुख्य आर्बिटर गोपाल कुमार व अन्य मान्यवरांच्या उपस्थिती झाले.

यावेळी बोलताना आम्ही येथे गोव्यात तसेच राष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळाच विकास करण्यासाठी जमलेलो आहोत. या स्पर्धेत गोव्यातील खेळाडूंना उभारी घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंना त्यांच्या नॉर्म्समध्ये वृद्धी करण्याची संधी मिळणार आहे. आम्ही गेल्या वर्षीपेक्षा ही स्पर्धा आणखी चांगली करण्यासाठी काही बदल केले आहेत. आमाचा प्रयत्न गोव्याला जगभारतील एक बुद्धिबळ स्थळ म्हणून ओळख मिळवून देणे हा असेल, असे काब्राल यांनी सांगितले. त्याच बरोबरी त्यांनी स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल गोवा सरकारचेही आभार व्यक्त केले.
यावेळी काब्राल यांनी वेनेझुएलाचा नंबर १ तथा स्पर्धेतील अव्वल मानांकित खेळाडू इतुरिझागा एदुआर्दो बोनेल्ली याच्याविरुद्ध चाल खेळून स्पर्धेचा शुभारंभ केला.
यावेळी स्पर्धा संचालक किशोर बांदेकर, सागचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, एआयसीएफचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय मास्टर शेखर साहू यांनीही आपले विचार मांडले.

गोव्याच्या खेळाडूंची सकारात्मक सुरुवात
गोव्याच्या खेळाडूंनी स्पर्धेत काल पहिल्या दिवशी शानदार सलामी देताना सकारात्मक सुरुवात केली. काल झालेल्या पहिल्या फेरीतील लढतीत ग्रँडमास्टर अनुराग म्हामलने (२४९७) अथर्व जाईलचा (२०९८) पराभव केला. उदयोन्मुख खेळाडू लीऑन मेंडोसाने (२४०५) मोहम्मद अबझिद रेहमानवर (२०५३) मात केली. फिडे मास्टर नितेश बेलुकरने (२३५३) जयपान भटला (२००१), नंदिनी सारिपल्लीने (१८८४) आएम प्रवीण कुमारला (२२२३) पराभूत केले. पहिल्या फेरीतअंती अनुराग, लीऑन, नितीश व नंदिनी प्रत्येकी १ गुणांवर आहेत. अन्य एका लढतीत देवेश नाईकने (१८४१) मोहन कुशाग्रला (२२०७) बरोबरीत रोखले.