१३ जणांसह हवाई दलाचे विमान बेपत्ता

जोरहाट-आसाम येथून काल दुपारी उड्डाण केलेले भारतीय हवाई दलाचे आंतोनोव एएन हे विमान अरुणाचल प्रदेशमधून नाहीसे झाले असल्याचे वृत्त आहे. १३ जणांसह जोरहाट येथून या विमानाने दुपारी १२.२५ वा. उड्डाण केले होते व त्याच्याशी शेवटचा संपर्क १ वा. झाला होता.

भारतीय हवाई दलाने या घटनेनंतर त्वरित सुखोई-३० लढाऊ व सी-१३० विशेष कार्य विमानांच्या सहाय्याने सर्व साधनसुविधांसह बेपत्ता विमानासाठी शोध मोहीम सुरू केली. लष्कराच्या सहाय्याने जमिनीवरही शोध मोहीम सुरू आहे. सदर विमान सोविएत काळातील असून १९८० मध्ये ते हवाई दलाच्या ताफ्यात रूजू झाले. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याप्रकरणी हवाई दल प्रमुख राकेश भदुरिया यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. विमानातील सर्वजण सुखरूप राहण्याची आपण प्रार्थना करतो असे राजनाथ यांनी म्हटले आहे.