१३०० पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू
????????????????????????????????????

१३०० पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू

>> पुढील महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार

पोलीस खात्यातर्फे १३०० पोलीसांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून पुढील महिन्यात त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत सांगितले.

काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मडगाव पोलीस स्थानकावर पोलिसांची संख्या कमी असून तेथे आणखी पोलीस देण्याची मागणी करणारा प्रश्‍न उपस्थित केला असता सावंत यांनी वरील माहिती दिली.
मडगाव पोलीस स्थानकावरील पोलिसांची संख्या किती आहे त्याचा फेरआढावा घेऊन आवश्यक ती पदे भरण्यात येतील, असे सावंत म्हणाले.

मडगाव पोलीस स्थानकासाठीचा मंजूर झालेला पोलीसकर्मींचा आकडा किती आहे, असा प्रश्‍न कामत यांनी विचारला होता. गेल्या वर्षीही आपण हा प्रश्‍न विचारला होता असे सांगून कामत म्हणाले की, २००५ सालापासून या पोलीस स्थानकावरील पोलिसांच्या संख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे आता या पोलीस स्थानकावरील पोलिसांच्या संख्येचा मुख्यमंत्र्यांनी फेरआढावा घ्यावा, असे कामत म्हणाले.
यापूर्वी आपण हा प्रश्‍न उपस्थित केला होता. तेव्हा सरकारने मडगाव पोलीस स्थानकावर किती पोलीसकर्मी आहेत व आणखी किती जणांची गरज आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून अहवाल घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते याची कामत यांनी आठवण करून दिली.

मडगाव स्थानकावर
४७ पोलिसांचा तुटवडा
मडगाव पोलीस स्थानकावर १५ हेड कॉन्स्टेबल व ३२ कॉन्स्टेबल्सच्या जागा रिक्त असल्याचे कामत यांनी यावेळी सभागृहाच्या नजरेस आणून दिले.
यावर बोलतात सावंत म्हणाले की, मडगाव पोलीस स्थानकासाठी मंजूर झालेली पोलिसांची संख्या १५९ एवढी आहे. मात्र, प्रत्यक्षात तेथे ११३ पोलीस असल्याची माहिती सावंत यांनी दिली. मडगावमधील पोलिसांच्या संख्येचा फेरआढावा घेऊन योग्य ती पदे भरू, असे आश्‍वासन सावंत यांनी यावेळी दिले.