॥ समुपदेशन गीतेतून ॥ : … योगक्षेमं वहाम्यहम्!

– प्रा. रमेश सप्रे

भगवद्गीतेत जे काही अमर श्‍लोक आहेत म्हणजे ज्यांचा अर्थ सर्व काळासाठी व सर्व लोकांसाठी उपयुक्त व सुसंगत आहे अशा श्‍लोकांपैकी एक श्‍लोक हा आहे-

अनन्याश्‍चिंतयन्तो माम् ये जनाः पर्युपासते|
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌॥
आठ अक्षरांचा एक असे चार चरण मिळून बत्तीस अक्षरांचा अनुष्टुप छंदातील एक श्‍लोक बनतो. असे अनेक श्‍लोक गीतेत आहेत की ज्यांचा एक चरणसुद्धा अत्यंत अर्थपूर्ण व महत्त्वाचा संदेश देणारा – समुपदेशन करणारा आहे. या श्‍लोकाचा अंतिम चरण असाच आहे – संदेश देणारा –
…. योगक्षेमं वहाम्यहम् ॥
एका जीवन-मृत्यूशी संबंधित असलेल्या संस्थेचे हे घोषवाक्य त्यांच्या अनेकविध जाहिरातीतून जनमानसावर बिंबलं गेलं आहे. ‘योगक्षेमं वहामि अहम्‌|’ हे भगवंतानं दिलेलं अभिवचन आहे. एका अर्थानं भगवंताची ही प्रतिज्ञाच आहे.
स्थूल रूपात याचा अर्थ आहे- ‘माझ्या भक्तांची सर्व प्रकारची काळजी मी घेतो. त्यांच्या सर्व गरजा-अपेक्षा मी स्वतः वाहून नेतो. त्यांच्या सर्व चिंतांची जबाबदारी मी आपल्या खांद्यांवर घेतो’.
अनेकांचा यावर आक्षेप असतो की असा कसा भगवंत आपल्या डोक्यावरून भक्तांच्या उदरनिर्वाहाची, संसाराची साधनं (योगक्षेम) वाहून नेईल? तो काय हमाल आहे? असा विचार आपण नेहमी संतवाङ्‌मयाच्या बाबतीत करतो नि संतांवर पर्यायानं स्वतःवर अन्याय करतो. ‘पूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय जो आपलं मत बनवील वा देईल तो एक मूर्ख’, असं समर्थ रामदासांनी म्हटलंय. पूर्ण ग्रंथ कशाला पूर्ण श्‍लोक वा ओवी न वाचताही लोक आपली मतं बनवतात व संतांना बडवत राहतात. यामुळे संतांचं अर्थातच काहीही नुकसान होत नाही.
समर्थांचंच पहा ना – ‘जगी सर्व सूखी असा कोण आहे|’ हा मनाचा श्‍लोकाचा एकच चरण प्रश्‍नचिन्ह घालून आपण सतत वापरत असतो. ‘जगात कोणीही सर्व सुखी नाही’ असं म्हणताना आपण हा चरण नेहमी वापरतो पण समर्थांच्या मनात प्रश्‍नचिन्ह नाहीच. आहे तर त्यांना एक विचार, एक सिद्धांत सांगायचाय की – ‘जगी सर्व सूखी असा कोण आहे| विचारें मना तूचि शोधून पाहे॥ याचा अर्थ स्पष्ट आहे- जगात सर्वसूखी म्हणजे सदासर्वदा सुखी असलेली मंडळी आहेत फक्त आपण विचार करून (विचारें मना) त्यांना शोधून काढलं पाहिजे. म्हणजे ती मंडळी कशामुळे सर्वसुखी झाली, त्यांच्या सदासर्वदा सुखी असण्याचं रहस्य काय आहे यावर चिंतन केलं पाहिजे. एवढंच नाही तर हे रहस्य कळल्यावर त्याचं आपल्या जीवनात उपयोजन केलं पाहिजे. त्याचा प्रयोग आपण करून पाहिला पाहिजे.
आणखी एका संतवचनाबद्दल असाच तर्कवितर्क – वादविवाद केले जातात. तेही खूप प्रसिद्ध वचन आहे. ज्ञानोबांनी आपल्या पसायदानात एक मागणं केलंय-
‘जो जे वांछील तो ते लाहो |’
अनेक विचारवंत सुद्धा म्हणतात हे कसं शक्य आहे? मानवी जीवन व समाजरचना यांचं स्वरूपच असं आहे की सर्वांच्या मनासारखं घडूच शकणार नाही. सर्वांना आपल्या इच्छेनुसार सारं मिळूच शकणार नाही. ‘जो जे वांछील तो ते लाहो|’ असं म्हणणं म्हणजे एक स्वप्नवत् मागणं आहे. मानवजातीविषयी कळवळा असणार्‍या संताचं! ते प्रत्यक्षात सत्य होणं कधीही शक्य नाही. पण गंमत बघा – आपल्यापैकी अनेकांना ज्ञानदेवांचं ‘पसायदान’ पाठ असतं. पण असं पाठ करण्याला एक शाप आहे. जे असं पाठ करतात ते बहुतेकवेळा अर्थाकडे पाठ करतात म्हणजे अर्थाचा विचार करत नाहीत. अर्थाला फार महत्त्वही देत नाहीत. ज्ञानदेव जेव्हा ‘जो जे वांछील तो ते लाहो|’ असं म्हणतात किंवा मागतात तेव्हा त्याच्यापूर्वी त्यांनी आणखीही काही गोष्टी मागितलेल्या असतात. उदा.- असं पसायदान द्यावं की १. जे खळांची व्यंकटी (वाकडी बुद्धी, कुटिल वृत्ती) सांडो॥
२. तया सत्कर्मी रति वाढो ॥
३. भूता परस्परे पडो (जडो) मैत्र जीवांचे॥
४. दुरितांचे तिमिर जावो॥
५. विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो (स्वकर्तव्य धर्माची पहाट होवो – सर्वत्र स्वधर्माचा प्रकाश पडो) अन् असं झालं की मग ‘जो जे वांछील तो ते लाहो॥ असं ज्ञानदेव भगवंताकडे (विश्‍वात्मक देवाकडे) मागतात.
याचा अर्थ उघड आहे. इतक्या गोष्टी आधी घडल्या तर खरं म्हणजे कोणाला काही मागण्याची इच्छाच उरणार नाही किंवा जे मागितलं जाईल ते सर्वांच्या हिताचंच असेल.
असाच पूर्ण श्‍लोक किंवा भगवंताचा मूळ उद्देश लक्षात न घेता केवळ ‘योगक्षेमं वहाम्यहम्‌|’ या एका चरणाला पुढे ठेवून संपूर्ण गीतेला व भगवंतालाही झोडपलं जातं. पण भगवंत काय एवढे वेडे आहेत? त्यांनी असं आश्‍वासन देण्यापूर्वी तीन महत्त्वाच्या गोष्टी (खरं तर अटी) सांगितल्या आहेत.
जे लोक (ये जनाः), अनन्याश्‍चिंतयंतो माम् म्हणजे माझं अनन्यभावानं चिंतन करतात; पर्युपासते म्हणजे सर्व प्रकारांनी माझी उपासना (भक्ती) करत असतात आणि जे माझ्याशी कायम जोडलेले असतात (नित्याभियुक्तानाम्) अशा भक्तांचा योगक्षेम वहामि अहम्!
किती महत्त्वाच्या आहेत या पूर्वअटी – आधी त्या पुर्‍या करा नि नंतर निश्‍चिंत व्हा, असं भगवंतांना सुचवायचंय. चिंताग्रस्त मानवाला आज हवी आहे चिंतामुक्ती. ही अर्थातच अधिक चिंता करून मिळणार नाही. पण चिंतन करून निश्‍चित मिळेल.
१. अनन्याश्चिंतयन्तो माम् ः- ‘अनन्य’ भावानं. ‘अनन्य’ भगवंताचं चिंतन, हा सरळ अर्थ आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत मीराबाई. ज्यावेळी ती म्हणते- ‘मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरा न कोय|’ त्यावेळी ती हा अनन्यभाव, हे अनन्यचिंतन किंवा ही अनन्यनिष्ठाच व्यक्त करत असते नि हे अनन्यचिंतन करता करता ती एवढी चिंतामुक्त – निश्चिंत होते की राजघराण्यातली असूनही ‘पद घुँगरू बॉंध मीरा नाचे रे’ असं म्हणायची नि तसं करायची (जगायची) तिला लाज वा भीती वाटत नाही. देहभाव पूर्ण नष्ट झाल्यामुळे ती अखंड आत्मभावात वा अमृत भावात डुंबत असते.
भगवंताशिवाय दुसर्‍या कशाचंही वा कुणाचंही चिंतन करायचं नाही ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. म्हणजे म्हणायला व सांगायला सोपी आहे पण प्रत्यक्ष जीवनात आणायला अतिशय अवघड आहे. केवढंही मोठं संकट आलं तरी इतर प्रयत्न करताना जिवाची घालमेल, मनाची तळमळ होऊ न देता भगवंतावर निष्ठा ठेवून शांत, स्थिर राहणं हे इथं अपेक्षित आहे. विठ्ठल-विठ्ठल म्हणतच नव्हे तर माझा केवळ विठ्ठलच.. असा अक्षय भाव टिकवणार्‍या अनेत संतांच्या नि सामान्य लोकांच्या कथा आपल्याला माहीत असतातच.
विठ्ठल नामाचा गजर करत चिखल तुडवणार्‍या गोरा कुंभाराचा नातू जरी चिखलात शिरून पायाखाली येतो किंवा मडक्यांची भट्टी पेटल्यावर एका मडक्यात असलेली मांजरीची पिलं सुरक्षित राहतात यातील चमत्काराचा भाग जरी बाजूला ठेवला तरी गोरा कुंभाराचा अनन्य भाव महत्त्वाचा आहे.
केवळ संतच कशाला एखादा न्यूटन डोक्यावर पडलेल्या फळाचं अनन्यचिंतन करता करता गुरुत्वाकर्षणासारखा महत्त्वाचा सिद्धांत (निसर्गरहस्य) शोधून काढतो. एखादा आइन्स्टाइन मानवी इतिहासाला कलाटणी देणारं शक्तिसूत्र देऊन जातो. या संबंधात विंदा करंदीकर म्हणतात ते किती अर्थपूर्ण आहे..
हे आइन्स्टाइन, दोन महायुद्धांची वेडी वादळं
आपटून गेली तुझ्या खिडकीवर
पण हलली नाही तुझी ज्योत…
आपल्या संशोधनावर अनन्यचिंतन करताना तो महान् वैज्ञानिक नंदादीपाच्या स्थिर ज्योतीसारखा अखंड तेवत होता. – कालिदास – शेक्सपियरसारख्या प्रतिभावंतांची अशी चिंतनसमाधी लागल्याशिवाय अमर साहित्यकृती (एपिक्स ऑर क्लासिक्स) साकार होत नाहीत. व्यासवाल्मिकींची अशी चिंतनसमाधी समजू शकते पण अन्य क्षेत्रातील प्रतिभावंतही अनन्यचिंतनात गढून गेल्याशिवाय असामान्य कलाकृती (मास्टरपीसेस्) अवतरत नाहीत.
२. पर्युपासते ः- यात दोन शब्द आहेत ‘परि’ आणि ‘उपासते’. अर्थ आहे सर्व प्रकारांनी उपासना करणे. ‘परि’ या उपसर्गाचा (प्रिफिक्स) उपयोग करून तयार झालेले अनेक शब्द आपण नेहमी वापरतो- परिसर, परिस्थिती, पर्यावरण, परीक्षा (परि ईक्षा म्हणजे सर्व बाजूंनी पाहणं, निरीक्षण करणं) इ. तसं ‘परि उपासते’ म्हणजे सर्व प्रकारांनी, पद्धतींनी, उपचारांनी भक्ती करत राहणं.
भक्ती करण्याचे बाह्य उपचार पूजा-अभिषेक-आरती-प्रदक्षिणा-नैवेद्य-नमस्कार इ. आपल्याला चांगले माहीत असतात. आपण अनेक वर्षं ते करत आलेलो असतो. यात वाईट काही नाही. प्रत्येक उपचाराचा एक मंत्र म्हटला जातो. त्याच्या अर्थावर चिंतन-मनन करत तो अर्थ आपल्या जीवनपद्धतीशी सुसंगत करून तसं जगणं ही ‘पर्युपासना’ आहे. ‘परि’ या शब्दाचा अर्थ पाहताना त्याच्या काही पैलूंचा विचार करता येईल.
सर्व काळी उपासना म्हणजे उपासनामय मनोवृत्ती. ‘ईशावास्यं इदं सर्वम्’ म्हणजे ‘अवघे विश्‍व हरिमय’ हा भाव सतत टिकवणं आवश्यक असतं.
सर्व स्थळी उपासना – आपल्या देशातल्या प्रत्येक भागाला तीर्थक्षेत्राचं महत्त्व व माहात्म्य आहे ही व्यासांनी पुराणातून दिलेली दृष्टी लक्षणीय आहे. पाण्याच्या थेंबात तीर्थ नि भूभागाच्या प्रत्येक तुकड्यात पवित्र क्षेत्र ही भावना आली तर गंगा-यमुना शुद्ध कराव्या लागणार नाहीत अन् काशीरामेश्‍वर येथील धार्मिक व्यापार निर्माणच होणार नाही. आपणही आपल्या दैनंदिन जीवनात ज्या ठिकाणी असू ते ठिकाण म्हणजे घर – कार्यालय – बाजार इ. पवित्र मानून उपासनामय मनःस्थितीत राहिलो तर संपूर्ण समाज बदलून जाईल. भ्रष्टाचार उरणार नाही.
सर्व वस्तू व्यक्तींच्या सहवासात उपासनावृत्ती. हे अशक्य नाही, थोडं अवघड मात्र आहे. कारण व्यापार्‍यांना ग्राहकांशी, डॉक्टरांना रुग्णांशी, शिक्षकांना विद्यार्थ्यांशी, नेत्यांना अनुयायांशी भक्तीसारखा शुद्धपवित्र व्यवहार करणं अपेक्षित असलं तरी तशी अपेक्षा करणं कितपत् योग्य ठरेल? आपण आपल्यापुरतं जरी ठरवलं की सहवासात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीत देव पाहून व्यवहार करणं – ही पर्युपासनाच आहे. ‘वासुदेवः सर्वम् इति’ या भावनेनं सारे दैनंदिन व्यवहार करणं म्हटलं तर जमण्यासारखं आहे.
सर्व कृती उपासनामय – करणं आवश्यक आहे. ‘तया सर्वात्मका ईश्‍वरा| स्वकर्मकुसुमांची वीरा| पूजा केली होय अपारा| तोषालागी॥ म्हणजे आपण करतो त्या क्रिया, ती कर्मं परमेश्‍वराची पूजा आहे या भावनेनं करणं हे जमलं तरच संतत उपासना जमणार आहे.
सर्व घटनाप्रसंगात – उपासनेचा नियम न चुकणे व भक्ति भाव टिकून राहणे. यासाठी सर्व घडणार्‍या गोष्टी ही परमेश्‍वराची इच्छा आहे, सार्‍यांचा कर्ताकरविता तोच आहे हा भाव मनात दृढ करायला हवा. ‘कर्म हीच पूजा’ हे केवळ ध्येय नव्हे तर जीवनशैली बनली पाहिजे. काम बिलकुल न सोडता त्यालाच उपासनेचं रूप देऊन अतिशय सामान्य अशा व्यक्तींनी संतपद प्राप्त करून घेतलं नाही का? आपल्या प्रापंचिक दृष्टीनं स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज अशा व्यक्तींना किती गोष्टी प्रत्यक्ष अनुकूल होत्या? तरीही त्यांनी चारचौघात राहून त्यांच्यासारखं सर्वसामान्य जीवन जगूनच अभूतपूर्व कार्य सिद्ध केलं. म्हणून आपला प्रपंचच परमार्थमय, प्रत्येक कृती उपासनापरायण बनल्याशिवाय भगवंत आपला योगक्षेम कसा सांभाळील?
३. नित्याभियुक्तानाम् ः- यात तीन शब्द आहेत- नित्य, अभि, युक्त! म्हणजे सतत जो नित्य भगवंत आहे त्याच्याशी जोडलेले. भगवंत म्हणजे आपला आदर्श, उच्च ध्येयाला त्याला सतत जोडलेलं राहिल्यामुळेच भगतसिंगादी स्वातंत्र्यवीर हसत फासावर जाऊ शकले; रविंद्रनाथ टागोर ‘गीतांजली’ रचू शकले; अत्युच्च पातळीवर कामगिरी करणारे लेखक-प्रतिभावंत कलाकार-संशोधक-क्रिडापटू अलौकिक दिव्यत्वाची प्रचिती देऊन जातात.
अशा सर्व अटी (अपेक्षा) पूर्ण करणार्‍यांचा योगक्षेम मी वाहून नेतो असं आश्‍वासन भगवंत देतात. केवळ उदरनिर्वाहाची साधनं पुरवणं, संकटं दूर करणं, प्रपंचातील समस्या सोडवणं म्हणजे योगक्षेम असा अर्थ नाही. तर या सर्व गोष्टी भगवंतावर – त्याच्या कर्तेपणावर – त्याच्या इच्छेवर – त्याच्या कृपेवर सोडून अखंड आनंदात राहणं हे योगक्षेमात सामावलेलं आहे.
‘योग’ म्हणजे हव्या असतील त्या गोष्टी ‘जोडणं (मिळवणं)’ अन् ‘क्षेम’ म्हणजे ‘जवळ आहेत त्या गोष्टींचं रक्षण करणं’ एवढाच अर्थ नाहीये. तर चिंतामुक्त, ताणतणावमुक्त जीवन जगण्याचं तंत्र व मंत्र साध्य होणंही आवश्यक आहे. अखंड आनंदयुक्त जीवन जगणं अपेक्षित आहे.
यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतरंगीची मानस उपासना जमली पाहिजे. भगवंताचं समुपदेशन हेच आहे की कोणत्याही गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय व संतत प्रयोग व प्रयत्न केल्याशिवाय आणि अखंड भगवद्भावात राहिल्याशिवाय तृप्ती-समाधान-आनंद शक्य नाही. पूजेच्या उपचारांपेक्षा मनातील पूज्य भाव; मंत्राच्या केवळ जपापेक्षा त्याच्या अर्थाचं मनन; ग्रंथाच्या पारायणापेक्षा त्यांचं चिंतन; देहाच्या कृतींपेक्षा मनबुद्धीची वृत्ती आनंददायी म्हणजेच मुक्तिदायी आहे. हे सारं जमलं तर (आणि तरंच) भगवंताचं चिरंतन आश्‍वासन प्रत्यक्षात येईल –
योगक्षेमं वहाम्यहम्…!
………………………………………………………….

Leave a Reply