॥ आरोग्य मंथन ॥ रुग्णाची मनःस्थिती नि परिस्थिती

  • प्रा. रमेश सप्रे

संतोष हा दैवी गुण आहे. म्हणून संतुष्ट व्यक्ती नेहमी समाधानात, आनंदात राहते. मन प्रसन्न तर रोग दूर. कारण मनाचा शरीरावर प्रभाव पडतोच. मनोकायिक आजार म्हणजे आजाराचं मूळ कारण मनात पण लक्षणं देहावर दिसून येतात. ‘मन करा रे प्रसन्न’ हा संतांचा संदेश आरोग्याचा महामंत्र आहे.

‘नीती’ हा शब्द आपल्या संस्कृतीत आणि प्रत्यक्ष जीवनात पूर्वी फार प्रतिष्ठित मानला गेला होता. नीती म्हणजे योग्य- अयोग्य, सभ्य- असभ्य, भद्र- अभद्र त्याचप्रमाणे सत् आणि असत् यांच्यामधला विवेक. सत्यं- शिवं- सुंदरम् या त्रिसूत्रीतील शिवम्‌चा संबंध नीतिमूल्यं, रीतिरिवाज, सदाचार यांच्याशी असतो. या सर्वांचा संबंध अर्थात आचाराशी, वर्तनाशी म्हणजे प्रत्यक्ष जीवनाशी असतो. अर्थनीती, राजनीती, परराष्ट्र नीती हे शब्द केवळ धोरण (पॉलिसी) ठरवण्यासाठीच वापरले जात नाहीत तर त्यांना नीतीचा- नीतिमूल्यांचा पाया असावा लागतो.

त्याचप्रमाणे स्मृतिग्रंथही व्यक्तीची स्वतःबद्दल, कुटुंबाबद्दल, समाजाबद्दल कोणती कर्तव्य आहेत त्याचं मार्गदर्शन करतात. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, देवल स्मृती या काही प्रसिद्ध स्मृती आहेत. भगवद्गीता हाही स्मृतिग्रंथ मानला जातो. पुराणातही चरित्रांच्या माध्यमातून जीवनाच्या सर्व अंगांची चर्चा केलेली असते. त्यातील काही त्या काळाशी संबंधित तपशील सोडला तर आजही पुराणातली वानगी (म्हणजे उदाहरणं; भाजीतली वांगी नव्हेत) उपयोगी पडू शकते. असो.
रामायण, महाभारत हे महान पुराणग्रंथ आहेत. त्यात जीवनाचा महत्त्वाचा पैलू जो आरोग्य समजला जातो त्याविषयी मोलाचं मार्गदर्शन आहे. हेच पहा ना.

* रोगी, घृणी तु असंतुष्टः क्रोधनो, नित्यशंकितः|
परभाग्योपजीवी च षडेते दुःखभागिनः॥

व्यासांच्या मते सहा प्रकारचे लोक सदैव दुःख भोगणारे असतात. रोगी, लोकांकडून तिरस्कृत, अतृप्त, रागीट, नेहमी शंका काढणारा, परोपजीवी म्हणजे दुसर्‍याच्या कष्टांवर, जीवावर जगणारा (पॅरासाइट). अशा दुःखी व्यक्तीत पहिला क्रमांक अर्थातच रोग्याचा असतो.

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की बाकीच्या पाच प्रकारच्या व्यक्तींमुळे- त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे माणूस रोगी बनतो. लोक ज्याचा तिरस्कार करतात त्याचं मन नेहमी त्या तिरस्काराला आत- बाहेर प्रतिक्रिया देत राहतं. साहजिकच याचा परिणाम म्हणून ती व्यक्ती शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या रुग्ण बनते. दुसरं स्वभाववैशिष्ट्य- असंतुष्टता. संतोष हा दैवी गुण आहे. म्हणून संतुष्ट व्यक्ती नेहमी समाधानात, आनंदात राहते. मन प्रसन्न तर रोग दूर. कारण मनाचा शरीरावर प्रभाव पडतोच. मनोकायिक आजार म्हणजे आजाराचं मूळ कारण मनात पण लक्षणं देहावर दिसून येतात. ‘मन करा रे प्रसन्न’ हा संतांचा संदेश आरोग्याचा महामंत्र आहे.

तिसरा दुर्गुण म्हणजे राग. रागातून द्वेष, रोगट स्पर्धा, सूड, ईर्ष्या अशा नकारात्मक गोष्टींची भुतावळ जन्माला येते. मग आरोग्य राहीलच कसं?
नित्य शंका घेणारी व्यक्ती कायम अस्वस्थ राहते. स्वस्थ किंवा आश्‍वस्त कधी होत नाही. मनावर सतत ताण, दडपण याचा परिणाम म्हणजे आजार नि व्यक्ती रोगी.
शेवटचं जे लक्षण सांगितलंय ‘परभाग्योपजीवी’ त्यात स्वप्रयत्नांचा प्रयत्नच नसतो. दुसर्‍याच्या जीवावर जगणं, ऐषाराम करणं इतकं की शरीराच्या हालचालीसुद्धा अगदी नाइलाज झाला तरच करणं.. हे सारं रोगाला आमंत्रण देणारंच नाही का?
अशा प्रकारच्या व्यक्तींना महाभारतात ‘दुःखभागिनः’ म्हटलंय, म्हणजे दुर्भागी, दुर्दैवी! यालाच धरून महाभारतात असंही सांगितलंय-

* रोगार्दिता न फलानि इंद्रियन्ते
न वै लाभन्ते विषयेषु तत्त्वम् |
दुःखोपेता रोगिणो नित्यमेव
न बुद्ध्यंते धनभोगान्त सौख्यम् ॥
अर्थ स्पष्ट आहे – रोगांमुळे आर्त, त्रस्त नि ग्रस्त झालेले लोक आपल्या पुण्यकर्मांचा- चांगल्या कृत्यांचा उपभोगही घेऊ शकत नाहीत. त्यांना निरनिराळ्या इंद्रियांच्या उपभोगांचा आस्वादही घेता येत नाही. साधा सर्दीताप आला तर जिभेची चव जाते नि कावीळ तर सारं जग पिवळंच (पण सोन्याचं नव्हे!) करून टाकते. रोगी सतत दुःखी कष्टी असतो, चिडचिड करतो, त्याला ताप आला की संतापानं सार्‍या घराला ताप देतो याचा आपणा सर्वांना अनुभव असतोच. हे सर्व ठीक आहे. पण पैसा ज्याला दुर्दैवानं आज सारे एकमेव साध्य, परब्रह्म समजतात त्याच्या माध्यमातून मिळणार्‍या सुखोपभोगातही रोगी माणसाला रस असत नाही, गोडी वाटत नाही. एकूण काय सारं असून काहीही नाही, असा दुर्दैवी अनुभव रोगी माणसाला येत असतो.
व्यासांचा दाखला देऊन ‘पंचतंत्र’ नावाच्या जीवन यशस्वी, आनंदी रीतीनं जगण्याविषयी मार्गदर्शन करणार्‍या ग्रंथात म्हटलंय-

* जीवितोऽपि मृताः पंच व्यासेनंपरिकीर्तिताः|
दरिद्रो, व्याधितो, मूर्खः, प्रवासी, नित्यसेवकः ॥

म्हणजे व्यासांच्या मते- पुढील पाच प्रकारच्या व्यक्ती जिवंत असल्या तरी मृतासारख्याच असतात. दरिद्री म्हणजे धनहीन व्यक्तीला कुणी ती जिवंत आहे असं मानतच नाहीत. यासंदर्भात संस्कृतमध्ये एक फार छान सुभाषित आहे-

* भो दारिद्य्र, नमस्तुभ्यं सिद्धोऽहं त्वत्प्रसादतः|
पश्याम्यहं जगत् सर्वं न मां पश्यति कश्‍चन ॥

म्हणजे- हे दारिद्य्रा तुला नमस्कार! कारण तुझ्यामुळे मला एक सिद्धी प्राप्त झालीय. ती अशी की- (भीक मागताना) मला सर्व जग दिसतं. (पण भीक द्यावी लागेल म्हणून) मी कुणालाच दिसत नाही. दारिद्य्रामुळे आपण अदृश्य तर बनलो नाही ना?- असा सुरेख विचार मांडलाय. अशा गरीब परिस्थितीमुळे उपासमार, कुपोषण नि त्यातून निर्माण होणार्‍या व्याधी होतात. म्हणून गरीब व्यक्ती जिवंत असली तरी मृतवतच असते. जीवन्मृत!

व्याधिग्रस्त माणूस तर उघडउघड असून नसल्यासारखा असतो. काळजी घेणारी प्रेमळ मंडळी जरी असली तरी रोगी व्यक्तीची मनःस्थिती मृतासारखीच असते.
मूर्ख व्यक्ती असून नसून सारखीच. तिचं अस्तित्वच आजुबाजूच्या मंडळींच्या ध्यानीमनी नसतं. तिचं मत विचारलं जात नाही, तिचा सल्ला विचारात घेतला जात नाही मग तिच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षाच कसली?
प्रवासी मनुष्यही जिवंत असून मेल्यासारखा असतो. तो कधी कोणत्या ठिकाणी असेल हे निश्चित नसतं. त्याचं बूड (मुक्काम) स्थिर नसल्यामुळे त्याला जिवंतपणाचा जीवनातील रंगीबेरंगी आस्वादांचा अनुभव तेवढा घेता येत नाही. तो कधीही पूर्ण नि कायमचा कुणाचाही बनू शकत नाही.

त्याचप्रमाणे नित्यसेवक माणूसही जिवंत असूनही मृत असल्यासारखाच असतो. हनुमंतासारखी सेवा करणारा दास किंवा शिवाजी महाराजांची रात्रंदिवस सेवा करणारी मंडळी मृत कशी? इथं दुसर्‍याची सेवा करणारा म्हणजे गुलाम, लाचार असा असतो. अशा स्वाभिमानशून्य माणसाला केवळ हालचाल करतो म्हणून जिवंत कसं म्हणायचं?
अनेक रोगांची अशी अवस्था असते की इकडे तिकडे न फिरता बिछान्यावरच सक्तीची विश्रांती (कंपल्सरी बेडरेस्ट) घ्यायला डॉक्टर सांगतात. पुढे म्हातारपणी जेव्हा उठणं बसणं अतिशय अवघड बनतं तेव्हा तर रोग्याला बिछान्यावरच मुक्काम करावा लागतो. एक तर वय वाढल्यामुळे पातळ बनलेली त्वचा नि कठीण अशा बिछान्याच्या पृष्ठभागाशी होणारं घर्षण यामुळे शरीरावर जखमा होतात (बेड सोअर्स). त्या होऊ नयेत म्हणून हल्ली निरनिराळ्या प्रकारचे हवा भरता येणारे, पाणी भरता येणारे, मऊ मऊ तरीही मजबूत असे बिछाने तयार मिळतात. हा मुद्दा पूर्वीच्या काळातही महत्त्वाचा होताच.
अप्रत्यक्षपणे एखादी गोष्ट स्पष्ट करण्यासाठी वर्णन केलेली काही सुभाषितं असतात. हा नमूना पाहू या-

* शय्या नावनता तथास्तृतसमा न व्याकुलप्रच्छदा
न क्लिष्टं हि शिरोपधानममलं शीर्षाभिघातौषधैः |
रोगे दृष्टिविलोभनं जनयितुं शोभा न काचित्कृता
प्राणी प्राप्य रुजा पुनर्नशयनं शीघ्रं स्वयं मुंचति ॥

आधी अर्थ लक्षात घेऊया –
बिछाना कुठेही वरखाली झालेला, दबलेला नाही; ज्यावेळी अंथरला त्यावेळी होता तसाच तो (अजूनही) आहे; त्याच्यावर पसरलेलं आच्छादनही (चादरही) अगदी व्यवस्थित – सुरकुती न पडलेली अशी आहे; डोक्याखालची उशीसुद्धा डोक्याला लावायच्या औषधामुळे वा सुगंधी रंगीत तेलामुळे बिलकुल खराव झालेली नाही; आजुबाजूची रचना, सजावट ही रुग्णाच्या डोळ्याला त्रास होईल अशी (प्रखर दिवे, सतत हालचाल करणारी दृश्ये इ.) केलेली नाही- अशा बिछान्यावर रोगी आरामात झोपू शकतो. पूर्ण बरा होईपर्यंत तो बिछाना सोडत नाही, तिथंच पडून राहतो.
थोडक्यात रोगी माणसाचा बिछाना रोगस्नेही (डिसिजफ्रेन्डली तसाच पेशंटफ्रेंडली) असला पाहिजे. म्हणजे रोग बरा होण्यात, रोग्याला बरं वाटण्यात त्याचं सहाय्य होईल. आज हा विचार केला जातो.
एक गंमतीदार उदाहरण देऊन रोग्यांना चेतावणी (सूचना) दिलीय. अशी अनेक सुभाषितं आहेत. त्यापैकी हे एक-

* कासी विवर्जयेत् चौर्यं निद्रालुश्च स चौरिकाम् |
जिव्हालौल्यं रुजाक्रांतो जीवितं योऽभिवांछति ॥

ज्याला खासी म्हणजे खोकला (कासी) येतो आणि ज्याला रात्री झोप अनावर होते अशा व्यक्तीनं चोरी करणं सोडून देणंच योग्य. त्याप्रमाणेच ज्याला जिवंत राहायची इच्छा आहे त्याने जिभेचे चोचले किंवा लाड (जिव्हालौल्यं) बंद केले पाहिजेत. उदा.- मधुमेह (डायबेटीस) झालेल्यानं साखर, मिठाई वर्ज्य करायला हवी, उच्च-रक्तदाब असलेल्यानं मीठ-मसाल्याचे पदार्थ टाळले पाहिजेत. इ.

‘स्मशान वैराग्य’ एक शब्दप्रयोग प्रचलित आहे. आपल्या बरोबरीची एखादी व्यक्ती मृत्यू पावली, एखादी व्यक्ती अकाली मरण पावली तर तिच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेल्यावर विशेषतः प्रेत चितेवर जळताना वा मातीत पुरलं जात असताना पाहून ‘आयुष्याचं काही खरं नाही; केव्हा कुठं मरण येईल याची कल्पना नाही’ असे मृत्यूबद्दलचे विचार मनात येतात. आता जीवनातले उपभोग, मौजमजा जरा आवरती घेतली पाहिजे असे वैराग्ययुक्त विचार मनात येतात नि उच्चार मुखातून बाहेर पडतात त्याला उद्देशून एक सुभाषित आहे –

* धर्माख्याने स्मशाने च रोगिणां या मतिर्भवेत् |
या सर्वदैव तिष्ठत् चेत् को न मुच्छेत् बंधनात् ॥

प्रवचन कीर्तनात ऐकून, स्मशानातील राख किंवा माती बनणारं प्रेत पाहून सामान्य माणसाला एखाद्या दुर्धर रोगाने पछाडल्यावर त्याची जी विरक्त वृत्ती होते तशी ती जीवनभर कायम राहील तर अखंड आनंद वा जीवनमुक्ती अशक्य नाही. पण म्हणतात ना- कळतं पण वळत नाही, म्हणून ते फळत नाही. जळत मात्र राहतं. हो ना?