॥ अंतकाले च माम् एव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् … ॥

– प्रा. रमेश सप्रे
आपण सामान्य माणसं मरतो त्याला ‘देहांत’ म्हटलं जातं. असं मरणं ही पुढच्या जन्माची तयारी असते असं समजलं जातं. हे जन्ममृत्यूचं चक्र सतत गरगरत असतं. या चक्रातून सुटका म्हणजे मुक्ती असं मानलं जातं. जो परमात्मा- परमेश्‍वर आहे ज्याचे आपण एक सामान्य अंश आहोत. त्याच्याशी एकरुप होणं (सायुज्य पावणं) ही खरी मुक्ती ! सर्व माणसांचं हे समान अंतिम उद्दिष्ट किंवा अंतिम गंतव्य स्थान (डेस्टिनेशन) आपल्या ऋषीमुनींनी मानलंय. हे कसं मिळवायचं ? म्हणजेच मुक्त होण्यासाठी मृत्यू कसा झाला पाहिजे अन मुख्य म्हणजे यासाठी आपलं जीवन, जीवनशैली कशी असली पाहिजे याचा विचार उपनिषदं, भागवत यासारख्या ग्रंथात विस्तारानं केलाय. गीतेतसुद्धा या दृष्टीनं सविस्तर मार्गदर्शन (समुपदेशन) आहे.भगवंताचे यासंदर्भातील उद्गार अगदी स्पष्ट आहेत-
‘अंतकाले च माम् एव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् |
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥
याचा अर्थ सरळ आहे. शेवटच्या क्षणी (अंतीम काळी) माझंच (मामेवस्मरन्) करत जो देह ठेवतो (मुक्त्वा कलेवरम्) तो माझ्या स्वरुपातच (मद्भावं) येऊन मिळतो (स मद्भावं याति) यात काहीही संदेह नाही (न अस्ति अत्र संशयः). ‘अंते मति: सा गतिः|’ असा एक सिद्धांत सांगितला जातो. पुनर्जन्म मानणारे ‘मृत्यू’ या घटनेवर लक्ष केंद्रित करतात. पू. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, ‘आपला शेवटचा श्‍वास परमेश्‍वराचं नाम घेण्यात गेला पाहिजे. जीवनातील सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू नाम असली पाहिजे.’
मृत्यूबद्दल अनेक क्षेत्रातील महापुरुषांचे, कवींचे-लेखकांचे अनेक विचार आहेत. ‘गीतरामायण’कार ग.दि.माडगूळकर म्हणतात- ‘मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा| पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ॥ मरणाबद्दल कुतुहल आहे सर्वांना पण मरण नकोय मात्र कोणाला ! मृत्यूच्या क्षणी नक्की काय घडतं ? मृत्यूनंतर कोणता अनुभव येतो का? –
‘मृत्यूनंतरचं जीवन (लाइङ्ग आफ्टर डेथ)’ या कल्पनेचं मोठं आकर्षण अनेक देशातील मानसशास्त्रज्ञांना, तत्वज्ञांना, प्रतिभावंत लेखक-कवींना आहे. याचं प्रतिबिंब त्यांच्या रचनात दिसून येतं.
एक इंग्रजी कविता आहे –
थहशप ींहश श्रळषश ळी र्षीश्रश्र ेष ुेश
अपव र्ेीी हेशिी रीश र्वीाल;
ढहश ुेीश्रव ीरूी ’से’
अपव ींहश वशरींह ीरूी ’लेाश’!
जीवन जसं जसं जगलं जातं तसंतसं ते अधिकाधिक वेदना-यातना-दुःखं यांनी व्यापून जातं. अशावेळी जग किंवा जीवन आपल्याला म्हणत असतं- ‘पुरे झालं, आता जा’, त्यावेळी आपल्या मृत्यूचं आपल्याला बोलवणं असतं- आता या. माझ्यात समावून जा.’
एक ङ्गार प्रत्ययकारी चित्रशैलीत वर्णन आहे- जीवन ही दोन्ही टोकानं जळणारी मेणबत्ती आहे. एका टोकानं जीवन दुरावत असतं, संपत असतं तर दुसर्‍या जळणार्‍या टोकाकडून मृत्यू जवळ येत असतो. पुढे सरकत असतो. एरवी मेणबत्ती उभी जळते. पण जीवनाची मेणवात आडवी जळत असते. दोन्ही टोकांनी. जीवनाचं सरणारं अस्तित्व दाखवत!
प्रसिद्ध इंग्रजी कवी रॉबर्ट ङ्ग्रॉस्ट याच्या आत्मवृत्तात्मक कवितेच्या ओळी प्रसिद्ध आहेत-
थेेवी रीश र्श्रेींशश्रू, वरीज्ञ रपव वशशि
र्इीीं ख हर्रींश िीेाळीशी ींे ज्ञशशि
अपव ाळश्रशी ींे से लशषेीश ख ीश्रशशि
अपव ाळश्रशी ींे से लशषेीश ख ीश्रशशि
असं म्हणताना मृत्यूद्दलचं आकर्षणही आहे पण जीवनातल्या जबाबदार्‍यांची जाणीवही आहे. अनेकांना दिलेल्या वचनांची पूर्ती केल्याशिवाय मृत्यूच्या त्या ‘सुंदर, घनदाट अरण्यात शिरता येणार नाही.’ असं स्वतःला बजावण्यासारखं आहे.
शुकदेवांकडून भागवत श्रवण करताना डोक्यावर निश्‍चितपणे कोसळणार्‍या मृत्यूची तलवार टांगती असलेला परीक्षित विचारतो- मृत्यूनंतर परमेश्‍वराशी एकरुप होण्यासाठी, परमात्म्यात मिळून जाण्यासाठी म्हणजेच मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? यावर शुकदेवांचं उत्तर हेच आहे- ‘शेवटच्या क्षणी भगवंताचं स्मरण करत आलेलं मरण मुक्तिदायक असते.’
वरवर ऐकायला, वाचायला किती सोप्पं वाटतं नाही हे? अर्जुनालाही तसंच वाटलं. शेवटच्या क्षणी, शेवटचा श्‍वास घेताना ‘कृष्ण किंवा कृष्णाऽऽ’ म्हटलं की झालं. कारण भगवंताचं तसं वचनच आहे ना. शेवटचा श्‍वास माझं नाम घेत ज्याचा जीव जातो तो माझ्या स्वरुपात मिसळून जातो हे निश्‍चित.
पण या सोप्या गोष्टीच्या मुळाशी एक अत्यंत अवघड गोष्ट आहे अन् ती म्हणजे ‘हा अखेरचा श्‍वास किंवा अखेरचा क्षण’ केव्हा येणार… कसा येणार… कुठे येणार… याची कुणालाही कल्पना नसते. या अज्ञानाला उद्देशूनच म्हटलंय, ’देशी डोळे परि निर्मिसी तयापुढे अंधार | विठ्ठला, तू वेडा कुंभार|’…
खरंच दूरच्या अंतरीक्षात (स्पेसमध्ये) आपण दुर्बिणीद्वारे अगदी अवकाशात ङ्गिरणार्‍या दुर्बिणीच्या माध्यमातून पाहू शकतो…दूरदूरच्या तार्‍यांचा आकाशगंगांचा वेध घेऊ शकतो. पण पुढच्या क्षणी (टाइम) काय घडेल याचं भविष्य ना धर्माचार्य सांगू शकतात, ना ज्योतिषी, ना प्रगत संगणक (कॉम्प्यूटर्स). नाहीतर त्सुनामीची महाकाय लाट; रुद्रउग्र झंझावात; प्रलयंकारी भूकंप, जीवघेणी ढगङ्गुटी (क्लाउडबर्स्ट) इतकच काय पण अमानुष आतंकवाद्यांचं जीवघेणं तांडव, मानवी बॉंबचा स्ङ्गोट हे सारे आधी कळून विनाश थांबवता आला असता…अनर्थ टाळता आला असता. पण असं घडतं का?
म्हणून देह ठेवतांना…मरणाच्या क्षणी ईश्‍वराचं-परमेश्‍वराचं-स्मरण अत्यंत अवघड पण तितकच मुक्तीसाठी मोलाचं आहे या संदर्भात जीवन कसं असलं पाहिजे…कसं जगलं पाहीजे हे पाहण्यापूर्वी काही व्यक्तींचे मृत्यू (देहान्त) कसे झाले ते पाहूया.
ग. दि. माडगूळकरांना ज्यावेळी असाध्य रोगानं ग्रासलं त्या जीवनाच्या संधिकाळात त्यांनी एक लेख लिहून येऊ घातलेल्या मृत्यूंच निर्भयतेने … मोकळ्या मनानं स्वागत केलं होते. ‘ये मृत्यो ये’…म्हणताना त्यांनी मृत्यूला तीन पर्याय दिले होते. ये मृत्यो…केव्हाही ये…मी तयारच आहे तुझं स्वागत करायला. कसं करू स्वागत? हस्तांदोलन करून की चुंबन घेऊन की आलिंगन देऊन?…शांतपणे मृत्यूला कवटाळताना या आधुनिक वाल्मीकीचं जीवन उजळून निघालं. ‘गीतरामायण’ लिहिणारा भावकवी रामात मिळून-मिसळून गेला. रामरूप जाहला.
आपली प्रिय शिष्या (मानसकन्यांच!) भगिनी निवेदिताला स्वामी विवेकानंदांनी जवळ असलेल्या दिनदर्शिकेची (कॅलेंडरची) पानं उलटायला सांगितली होती. स्वामीजी म्हणाले,‘चल, ते मे महिन्याचं पान उलट पाहू…हं ते जूनचंही उलट…छान…आता जुलै महिन्याच्या चार तारखेभोवती एक वर्तूळ काढ’…याप्रमाणे केल्यावर निवेदीतानं साहाजिकच विचारलं,‘स्वामीजी, काय विशेष आहे या तारखेबद्दल?’ स्वामीजी उदगारले,‘विचार करून सांग बरं!’ काही क्षणातंच निवेदिता म्हणाली,‘चार जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन आहे. अमेरिकेनं-अमेरिकेतील लोकांनी-तुम्हाला ‘विवेकानंद’ म्हणून जगासमोर आणलं म्हणून साजरा करणार आहात का हा दिवस?
यावर एक दीर्घ श्‍वास घेउन स्वामीजी थांबत थांबत म्हणाले…‘स्वातंत्र्यदिन…नव्हे मुक्तिदिन साजरा कारायचा…कुणाचा…कसा ते त्या दिवशीच कळेल हं!’ अन् चार जुलै एकोणीसशे दोन या दिवशी सायंकाळी स्वामी विवेकानंद ॐकारांचा उच्चार करत…शिवाचा जप करत अनतांत विलीन झाले. महासमाधी घेतली त्यांनी. ‘अंतकाले च माम् एव स्मरन् मुक्त्या कलेवरम्’ असाच धीरगंभीर मुक्तिदायक देहान्त होता तो ! स्वामी विवेकानंद मुक्त झाले असंआपण म्हणायच कारण ते देह रुपान आपल्यात वावरत होते. एरवी रामकृष्ण परमहंस म्हणायचे तेच खंर ‘नरेंद्र नित्यसिध्द आहे. नित्य-शुध्द आहे. नित्यबुध्द आहे. नित्यमुक्त आहे!
समर्थ रामदासांनी चैत्र वद्य नवमीला- दहा महिने आधीच सांगितलं…‘माघ वद्य नवमी| जाणे आहे परंधामी| केला निश्‍चय अंतर्यामी| ऐसा असे॥ अन् बरोबर त्याच दिवशी त्यांनी सज्जनगडावर देह ठेवला. अर्थातच प्रभू श्रीरामचंद्र नि चिरंजीव श्रीहनुमंत यांचंस्मरण करतच…!
अनेक साधुसंतांनी आपल्या महानिर्वाणाची तिथी किती तरी दिवस आधी सांगितली होती.
श्च शेगावच्या पू. गजानन महाराजांनी आषाढी वारीला पंढरपुरी जाऊन विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन आपल्या भक्तजनांना सांगितलं, ‘ भाद्रपद शुद्ध पंचमीला (ऋषीपंचमीला) आद्ल्या दिवशी चतुर्थीला बसवलेल्या (प्राणप्रतिष्ठा केलेल्या) गणपतीचं विसर्जन करता ना ? त्याच दिवशी या गणूचं (गजाननाचं) विसर्जन करा. अन् त्या दिवशी हा शेगावीचा महाराणा प्रणवाचा (ॐकाराचा) उच्चार करत महासमाधीत प्रवेश करता झाला.
श्च पू. गोंदवलेकर महाराजांनी अखेरची गुरुपौर्णिमा (आषाढी पौर्णिमा) पंढरपूरला साजरी केली. काही दिवसानंतर तिथल्याच एका रस्त्याच्या मध्यभागी आपला प्राणशिष्य श्री ब्रम्हानंद महाराज यांना आपल्या मृत्यूची कल्पना देऊन आपल्या जीवनातील काही महत्वाचे प्रसंग, रहस्यमय घटना आपल्या या शिष्याला सांगून त्याच्या सर्व शंकांचं समाधान करून पुढे गोंदवल्याला देह ठेवला तो मार्गशीर्ष वद्य दशमीला. गोंदवल्याला असलेल्या व दर्शनासाठी येणार्‍या अनेकांना आपल्या मृत्यूची पूर्वकल्पना श्रीमहाराजांनी दिली होती. ते अनेकदा म्हणत, ‘रामाची चिठ्ठी आहे. आता गेलं पाहिजे.’ ‘स्वर्गातून कुर्‍हाड सुटलीय. कोणत्याही क्षणी डोक्यावर कोसळणार आहे. आनंदाने तयार राहिलं पाहिजे’. आणि अगदी अखेरच्या श्‍वासापर्यंत नास्मरण करतांना जीवनाच्या मावळत्या क्षणी आपणा सर्वांना उपदेश,नव्हे आदेश देऊन गेले-‘जेथे नाम ,तेथे माझे प्राण |ही सांभाळावी खुण ॥
ही उदाहरणं असामान्य व्यक्तींची,अलौकिक विभुतिची वाटतील पण ती याच उद्देशान दिली की त्यांचा जगाला जो संदेश-उपदेश होता त्याप्रमाणे ते स्वत: वागले-जगले नि अनंतात विलिन झाले.
भगवंताचा हा जो अंतकाळी ईश्‍वरस्मरण करण्याचा आदेश आहे नि त्याचबरोबर आश्‍वासनही आहे त्याचे महत्वाचे पैलु पाहू या-
* अंतकाले : जीवनाचा अंतकाल, मृत्यूची वेळ, शेवटचा श्‍वास हा कधी बेशुध्दीत असेल;कधी देहाच्या गलितगात्र, मृतप्राय अवस्थेत;कधी एकदम वार्‍याच्या ज्योतिनं विझणार्‍या ज्योतिसारखा क्षणात संपणारा असेल तर क्वचित जाणीवपूर्वक साक्षीभावानं आनंदात झालेला जीवनान्त असेल…. पण अंतकाल व परमेश्‍वराचं स्मरण एकत्र झालं तरच मुक्तिचा सोहळा सजेल.
माम् एव स्मरन् -‘माझंच स्मरण हव.’….संसाराचं, कोणत्या वस्तूचं,व्यक्तीचं.. व्यवहाराचं, घडलेल्या-घडणार्‍या -घडू घातलेल्या प्रसंगाचं स्मरण नकोच.
मुकचा कलेवरम् – स्मरण करत मरण येऊ दे. एरवी जीवंत असतांनाही भगवंताचं ‘स्मरण हेच जीवन; विस्मरण म्हणजे मरण’ हेच सूत्र ध्यानात ठेवून जगायचं.
य: प्रयति,स मद्भावंयाति – जो प्रयाण करतो(प्रयति) म्हणजे ज्याचं निर्याण (मृत्यू) होतं तो माझ्या स्वरूपातच येऊन माझ्याशी एकरूप होतो. एकात्म होतो.मुक्त होतो.
आपले सर्वांचे लाडके भावकवी बा.भ.(बाकीबाब) बोरकर त्यांच्या प्रत्ययकारी शैलीत हेच म्हणतात ‘ देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा | अग्निचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा ॥ तोच मृत्यू सत्य-शिव-सुंदर जो स्वत: अग्निसात (अग्नीला आत्मसात करतांना) होतांना- चितेवर भस्म होतांना इतरांच्या जीवनात सत्‌चित् आनंदाचं बीजारोपण करून जातो. या अप्रतिम कवितेचं नाव आहे -‘देखणी ती जीवने|’ मुक्तीसाठी मरण्यासाठी जीवनशैली कशी असावी हाच विचार महत्त्वाचा आहे. आता एवढचं म्हणू या–‘मृत्योर्मा अमृतं गमय…..|’