हे तर मानवी बॉम्ब!

कोरोनाच्या फैलावापासून भारताला वाचवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आटोकाट प्रयत्नांना दिल्लीतील निझामुद्दिनमधील तबलिग जमातच्या मर्कझ या धार्मिक मेळाव्याने सुरूंग लावल्याचे दिसते आहे. या मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या विदेशी पाहुण्यांनी मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या आपल्या देशी भाईबंदांना आणि त्या भाईबंदांनी घरच्या प्रवासात आणि आपापल्या राज्यामध्ये कोरोनाचे हे महासंकट नेलेले आहे. अगदी तामीळनाडू, अंदमानपर्यंत या महाभागांनी कोरोनाचे हे लोण नेले. आता या सर्वांना हुडकणे, त्यांचे विलगीकरण करणे ही प्रक्रिया केंद्रीय गृह मंत्रालयाने हाती घेतलेली असली, तरी या महाभागांनी आजवर आणखी किती हजार जणांपर्यंत आणि त्या हजार जणांनी आणखी किती जणांपर्यंत गुणाकाराने हा संसर्ग पोहोचवला असेल याची कल्पनाही करवत नाही.

तबलिग जमातचा हा मेळावा भरणारा मौलाना साद आता स्वतः नामानिराळा होऊन फरार झाला असला, तरी जे जे या मेळाव्याला उपस्थित राहिले होते, त्यापैकी बहुसंख्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिवसागणिक दिसते आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा जो अचानक वाढताना दिसतो त्याचे मूळ निझामुद्दिनच्या या मेळाव्यात आहे. हा आकडा आता आणखी वाढत जाईल अशी चिन्हे आहेत, कारण तबलिगच्या या सर्व अनुयायांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आणि संपर्कात आलेल्यांच्याही संपर्कात आलेल्यांना हुडकणे, विलगीकरण करणे ही फार मोठी वाढती प्रक्रिया आहे. भारत सरकारच्या सर्व प्रयत्नांवर या एका मेळाव्याने कसा बोळा फिरविला हे उदाहरण आजवर कोरोनाबाबत बेफिकीर राहिलेल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ठरावे!

कोरोनाचा कहर जगभरात सुरू असताना तबलिग जमातचा हा धार्मिक मेळावा आठ ते दहा मार्चच्या दरम्यान हजारोंच्या उपस्थितीत दिल्लीत झाला होता. खरे तर दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये कोरोनाचे पहिले रुग्ण सापडायला ३ मार्चच्या आसपास सुरूवात झालेली होती. असे असताना दिल्ली सरकारने मनाई करूनही या महाभागांनी हा धार्मिक मेळावा भरवला. त्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून त्यांचे अनुयायी गेले, इतकेच नव्हे, तर विदेशांतून, देशोदेशीचे त्यांचे अनुयायी भारतात पर्यटक असल्याच्या बहाण्याने पर्यटक व्हिसावर भारतात उतरले. हा मेळावा उरकताच पुन्हा भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये धर्मप्रसारासाठी गेले. लोकांत मिसळले. या सगळ्या बेफिकिरीतूनच देशातील आजचा कोरोनाचा कहर माजला आहे.

तबलिगला तरी दोष कसा द्यावा? आपल्या गोव्यामध्ये तर अगदी सतरा – अठरा मार्चपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या कोपरा सभा सुरू होत्या. तत्पूर्वी मोठ्‌ठ्या प्रमाणावर शिगमोत्सव साजरा झाला. अगदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळीत तर भव्यदिव्य शिगमोत्सव झाला. आपल्या उच्चविद्याविभूषितांनाच जर कोरोनाचा धोका मोदींनी कान उपटेपर्यंत जाणवलेला नव्हता, तर  तबलिगच्या अल्पशिक्षित म्होरक्यांना तो कळला नाही यात आश्चर्य नाही.

कोरोनाचा विषाणू हा माणसाच्या शरीरात शिरला तरी तो माणूस बाहेरून अगदी सामान्य दिसतो. आपल्याला कोणताही आजार झालेला आहे असे त्याला जाणवतच नाही. कोरोनाचा गनिमी कावा तर हाच आहे. त्यामुळे जेव्हा अनेक दिवसांनंतर त्या माणसात लक्षणे दिसायला सुरूवात होते, तोवर त्याने कित्येकांना कळत – नकळत आपल्या शरीरात संक्रमित झालेल्या आणि गुणाकाराने कित्येक पटींनी वाढलेल्या कोरोना विषाणूंचा संसर्ग बहाल केलेला असतो! कोरोनाबाबतची ही सर्वांत महत्त्वाची बाबच लक्षात घेतली गेली नाही. गोव्यातही नाही आणि तबलिगच्या मेळाव्यात तर नाहीच नाही! तबलिगची बेफिकिरी ही नुसती बेफिकिरी नाही. आत्मघातकी बॉम्बर पाठवावेत तसे हे अनुयायी देशभरात पाठवले गेलेले आहेत. त्यामुळे अत्यंत कठोर कारवाई याच्या सूत्रधारांवर झाली पाहिजे.

देशभरात तबलिगच्या मेळाव्यातून देशभरात झालेल्या कोरोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारच्या पत्रकार परिषदेत आपल्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला की गोव्यातून या मेळाव्याला किती लोक गेले होते? त्यावर आपल्याला यासंदर्भात काहीही माहिती नसल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. वास्तविक केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि पोलीस महासंचालकांना तबलिगच्या मेळाव्यास उपस्थित राहिलेल्यांना हुडकण्याचे स्पष्ट आदेश गेल्या २१ मार्चला दिलेले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या श्वेतपत्रिकेत तसा स्पष्ट उल्लेख आहे. मग अजूनही गोवा सरकार स्वस्थ कसे काय बसले होते? आठवडा उलटून गेला तरी गोव्याचे मुख्यमंत्री अनभिज्ञ कसे होते? पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेल्यावर जागे झालेल्या सरकारच्या आरोग्य खात्याने काल तबलिगच्या मेळाव्यास उपस्थित राहिलेल्यांनी सरकारशी संपर्क साधावा असे आवाहन केलेले आहे. त्या महाभागांना स्वतःहून सरकारशी संपर्क साधायचा असता तर देशभरातून येणार्‍या बातम्या पाहिल्यावर आतापर्यंत त्यांनी तो साधलाच असता. या लोकांचे विलगीकरण स्वेच्छेने होणारे नाही. ते सक्तीने करावे लागेल आणि अतिशय तातडीने त्यासाठी पावले उचलावी लागतील. या तबलिग जमातची एक मोठी मशीद म्हापशात आहे. राज्यभरात अनुयायी आहेत. यातील किती लोक दिल्लीच्या मेळाव्याला हजर होते याचा आणि आजवर त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा राज्य सरकारने तातडीने शोध घ्यावा आणि त्यांचे सक्तीचे विलगीकरण करावे. एक चूक किती महागात पडू शकते याचे हे उदाहरण पाहून तरी सर्वांचे डोळे उघडतील अशी आशा आहे.