ब्रेकिंग न्यूज़

हेमंत, शिशिर ः आरोग्यदायी ऋतू

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

उत्कृष्ट देहबल, सर्व दोषांची समस्थिती व प्रदीप्त जाठराग्नी यामुळे या ऋतूंत सहसा अनारोग्य येत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे भरपूर खाणे, पिणे व व्यायाम करणे आरोग्यदायक आहे. सकाळी वेळ नसल्यास रोज रात्री पाच मिनिटे वेळ काढून संपूर्ण अंगाला तेलाने अभ्यंग केल्यास त्वचेला स्निग्धता मिळते. शिवाय त्वचेमार्फत तेल आत जिरून रस-रक्त-मांस या धातूंचेही पोषण करते.

दरवर्षी हिवाळ्याचे स्वागत आनंदाने, स्वास्थ्यपूर्ण उत्साहाने करण्याकरिता दिवाळीत जे अभ्यंगस्नान करतात, ते तसेच वर्षभर चालू ठेवा असा सल्ला प्रत्येक रुग्णाला दिला जातो. पण इथेही ‘माकडाच्या घराप्रमाणे….!’ तीच गत. ‘‘आत्ता काहीतरी या फुटलेल्या ओठांकरिता द्या…, पायांना भेगा पडल्या, रक्त येते आहे… इतके दिवस मूळव्याध बरा होता, आत्ता वाढला… रक्तही पडायला लागले आहे….’’ इत्यादी अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन रुग्ण दवाखान्यात येताहेत. तसा हिवाळ हा आरोग्यदायी ऋतू (हेल्दी सीझन) होय. कारण हिवाळ्याची सुरवात हेमंत ऋतूंत होते. सहाही ऋथुंमध्ये हेमंत ऋतू सर्वश्रेष्ठ मानला जातो. हेमंत हा एकच ऋतू असा आहे ज्यात कोणताही दोष असंतुलित होत नाही. उलट आधीच्या ऋतूंत भडकलेले पित्त थंडी सुरू झाल्याने शांत होत असते. मराठी महिन्यानुसार अर्धा कार्तिक-मार्गशीर्ष-अर्धा पौष हा हेमंत ऋतूचा कालावधी व अर्धा पौष-माघ-अर्धा फाल्गुन हा शिशिर ऋतूचा साधारण कालावधी! हे दोन्ही ऋतू म्हणजेच हिवाळा. या दोन्ही ऋतूंत आहार-विहार हा सारखाच असतो.

* हिवाळा हा जरी हेल्दी सिझन असला तरी हवेतील कोरडेपणाचा परिणाम त्वचेवर दिसून येतोच. म्हणून हिवाळा सुरू होण्यापूर्वी किंवा चाहूल लागताच टीव्हीवर कोल्ड क्रीमची जाहिरात सुरू होते. हिवाळ्यातही सुंदर निरोगी त्वचा हवी असेल तर थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यासाठी महागड्या क्रीमचा वापर करण्यापेक्षा सर्वोत्तम उपाय म्हणजे अभ्यंग!! सकाळी वेळ नसल्यास रोज रात्री पाच मिनिटे वेळ काढून संपूर्ण अंगाला तेलाने अभ्यंग केल्यास त्वचेला स्निग्धता मिळते. शिवाय त्वचेमार्फत तेल आत जिरून रस-रक्त-मांस या धातूंचेही पोषण करते. नियमित तेल लावले तर त्वचेला आतून-बाहेरून आवश्यक ते सर्व पोषण मिळते. नियमित अभ्यंगाइतका दुसरा प्रभावी उपाय नाही.

* अभ्यंगाप्रमाणेच दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे उटण्याचा वापर. उटण्यामध्ये वाळा, चंदन, अगरूस ज्येष्ठमध, सारिवा, मंजिष्ठा, हळद, दारुहळद अशा उत्तमोत्तम वनस्पतींचे मिश्रण असते. ही द्रव्ये त्वचेला स्वच्छ करून त्वचेवरील आवश्यक स्निग्धता टिकवण्यास मदत करतात.
अभ्यंग, उटणे किंवा विशेष लेप यांचा हिवाळ्यात योग्य वापर केल्यास हवेचा दुष्परिणाम त्वचेला भोगावा लागत नाही. हिवाळ्यात स्निग्धता राखण्यासाठी लेपांचा वापर पाण्याऐवजी दूध-दुधाच्या सायीबरोबर करावा.

* हिवाळ्याचा परिणाम ओठांवर प्रथम होतो. ओठ फुटणे, दोन ओठ मिळतात तिथे चीर पडणे व ती चीर बर्‍याच वेळा वेदनामय असते. अशा स्थितीत ओठ फुटू नये यासाठी ओठांवर दुधावरची साय लावणे हितावह ठरते किंवा घरचे ताजे लोणी किंवा साजूक तूप लावल्याने फायदा होतो. आपल्याला प्रत्येकाला परवडणारे व आरोग्यास हितकर असे तुपासारखे ‘लिप-गार्ड’ नाही, ज्याला एक्स्पायरी डेटही नाही.

* हिवाळ्यामध्ये दुसरा वाईट परिणाम होतो तो तळपायांवर. तळपाय.. विशेषतः टाचांना भेगा पडणे हे मुख्यतः दिसून येते. शरीरात अतिरुक्षता वाढली तर भेगांमधून रक्तही येऊ लागते. म्हणूनच यावर नियमित पादाभ्यंग सांगितले आहे. तुपाने पादाभ्यंग केल्याने फायदा होतोच. पण त्यातही शतधौत व घृत वापरण्याने भेगा भरून येण्यास, तसेच रक्त थांबण्यास मदत होते.
तसेच कोकमाचे तेल, जात्यादि तेलाने गुण मिळतो. फरशीच्या थंडपणापासून संरक्षण करण्याच्या हेतूने पायांत मोजे घालणे किंवा घरातही पादत्राणे घालणे हेसुद्धा उपयोगी ठरते. पूर्वी घरात मातीच्या जमिनी असायच्या. या मातीच्या जमिनी थंडीत व पावसाळ्यातही उबदार असतात, पण आता या मातीच्या जमिनींची जागा संगमरवरी टाईल्सने घेतली आहे ज्यांच्या थंडगारपणाचा त्रास थेट मूत्रपिंडावर होऊ शकतो. म्हणून ही श्रीमंत लोकांची फॅशन नसून काळाची गरज आहे.

* हिवाळ्यात आढळणारा तिसरा दुष्परिणाम म्हणजे गुदाच्या ठिकाणी त्वचा कोरडी झाली की त्याचा परिणाम आसपासच्या त्वचेवर होतो. गुदाला भेगा पडून शौचाच्या वेळी आग होणे, वेदना होणे, रक्त पडणे या प्रकारचा त्रास होऊ शकतो. यावर गुदभागी व्रणरोपण तेल लावण्याने फायदा होतो किंवा शतधौत घृत लावावे किंवा एरंड तेलाचा पिचू संपूर्ण रात्रभर गुदभागी ठेवावा. याने बराच उपशय मिळतो. चपाती किंवा भाकरीमध्येही एरंड तेलाचा वापर करावा. याने आभ्यंतरातही स्निग्धता येते. त्याचबरोबर अवगाह स्वेदन घ्यावे. गरम पाण्याच्या टबमध्ये पंधरा मिनिटे बसून स्वेदन घ्यावे.
हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी स्नेहन-स्वेदनासारखे बाह्योपचार हवेच. पण त्याचबरोबर योग्य आहार-विहार घेणेही महत्त्वाचे!!

* आहार –
हिवाळ्यात शरीरोष्मा शरीरात संचित होतो व जाठराग्नी प्रदीप्त होऊ लागतो. म्हणून भूक वाढते व अधिक आहाराची इच्छा उत्पन्न होते. म्हणूनच यावेळी मात्रा गुरू व प्रकृति गुरू असा आहार घ्यावा. अधिक मात्रेत पचण्यास जड असे पदार्थ खाऊ शकतात.
ःः तेल, तूप, लोणी आणि स्नेहद्रव्यांचा भरपूर यथेच्छ वापर करता येतो.
ःः गहू, उडीद, साखर, दूध इ.चा आहारात समावेश हवा. या ऋतूंत गहू-तांदळापेक्षाही बाजरी अधिक प्रमाणात खाणे योग्य ठरते. बाजरी ही उष्ण आहे पण तशीच रुक्षही आहे. म्हणून भाकरी करताना त्यात तिळ मिसळले जातात..
ःः तूर, मूग, मटकी, हरभरा, चवळी इ. कडधान्ये.
ःःभुई कोहळा, बटाटा, रताळी, कांदा यांसारखी कंदमुळे व नवलगोल, दोडके, पडवळ, वांगी, मुळा इ. विशेष पथ्यकर आहेत.
ःः मांस-मच्छी-कोंबडी-अंडी एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचा मांसाहार या ऋतूंत वरचेवर खावा.
ःः मांसाहार न करणार्‍यांनी दूध, दही, लोणी, मलई, बासुंदी, पेढे, गुलाबजाम, बर्फीसारखे पदार्थ यथेच्छ खावेत.
ःः अनेक प्रकारची पक्वान्ने तयार करून खावीत ती याच ऋतूंत!!
ःः द्राक्षे, मनुका, सफरचंद, केळी, चिक्कू, कवठ, नारळ, पेरू, डाळिंब, जर्दाळू, खारीक, पिस्ता, काजू, बदाम या प्रकारची एक ना अनेक फळे व सुकामेवा अवश्य खावा.
ःः हेमंत ऋतूंत रात्र मोठी व दिवस लहान असतो. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते. या ऋतूंत सकाळी उठल्याबरोबर न्याहारी व तीही पोटभर केली पाहिजे.
ःः शिशिर ऋतूंत सर्वच उष्ण पदार्थ उपयुक्त ठरतात. उदा. गुळाची पोळी. म्हणून जानेवारीच्या मध्यावरच येणार्‍या या मकरसंक्रांतीला तीळ व गूळापासून बनविल्या जाणारा तिळगूळाचे लाडू वाटण्याची पद्धत आहे.
ःः पौष महिन्यात धुंधुरमांस पाळण्याची पद्धत आहे. म्हणजे सकाळी लवकर उठून स्नानादि आटोपून सकाळच्या उन्हात बसून मुगाची खिचडी, गुळाची पोळी, वांग्याचे भरीत अशा प्रकारचा आहार घ्यावा.
ःः स्नान व पानासाठी गरम पाणी वापरणेच अधिक चांगले.

* विहार ः-
हिवाळ्यात थंडापासून संरक्षण मिळण्यासाठी उबदार कपडे, स्वेटर्स, पायमोजे, शाल, कानटोपी, स्कार्फ, रजई यांसारख्या वस्तू वापरता येतात, परंतु शरीर उबदार राहण्यासाठी सोपा व प्रभावी उपाय म्हणजे व्यायाम. खरं तर व्यायाम आपल्या दैनंदिन दिनक्रमातील अविभाज्य भाग असायला हवा. मात्र हिवाळ्यात तरी व्यायाम करायलाच पाहिजे. कारण भरपूर व्यायामाने प्राप्त झालेली शक्ती संपूर्ण वर्षभर आरोग्य चांगले टिकवण्यास सहाय्यभूत ठरते.
– व्यायाम करण्याने शरीराबरोबर मन प्रफुल्लित होते. शरीरातील अग्नी प्रदीप्त होऊन आतून ऊब मिळू शकते आणि एकंदर शरीरसामर्थ्य वाढविण्यास मदत होते.
– प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, धावणे यांसारखे व्यायाम वयाचा व शक्तीचा विचार करून निवडावा.
– योगासने, चालणे, धावणे यांसारख्या व्यायामाने शरीर लवचिक राहते. रक्ताभिसरण संस्था, मज्जासंस्थेचे कार्य सुधारते.
– प्राणायाम- भस्त्रिकासारख्या श्‍वसनक्रियांमुळे शरीरात प्राणशक्तीचा संचार अधिक चांगल्या प्रकारे होतो.
– शरीर, इंद्रिये व मन प्रफुल्लित होण्यास मदत होते.
उत्कृष्ट देहबल, सर्व दोषांची समस्थिती व प्रदीप्त जाठराग्नी यामुळे या ऋतूंत सहसा अनारोग्य येत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे भरपूर खाणे, पिणे व व्यायाम करणे आरोग्यदायक आहे.