ब्रेकिंग न्यूज़
हेडगेवार विद्यालयातील मुलांच्या कुंचल्यातून साकारली  ‘चित्रपालवी’

हेडगेवार विद्यालयातील मुलांच्या कुंचल्यातून साकारली ‘चित्रपालवी’

  • नितीन कोरगावकर

डॉ. केशव बळीराम हेडगेवार विद्यालयाने आत्तापर्यंत अनेक स्तुत्य उपक्रम राबवून आदर्शवत अशी कामगिरी बजावलेली आहे. मग ते ऐतिहासिक विषयावरील महानाट्य असो, किंवा संपूर्ण वंदेमातरम् सारखी देशप्रेम जागविणारी आगळी स्पर्धा असो. हेडगेवार विद्यालयाच्या उपक्रमांचे अनुकरण होते, यातच सर्व आले.
असे उपक्रम हे सहज जाता जाता होत नाहीत. त्यामागे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचेही योगदान असते. परस्पर सहकार्यानेच हे उपक्रम यशस्वी होतात. अर्थातच अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणार्‍या निष्ठावान शिक्षकांचा यात वाटा महत्त्वाचा असतो. त्यांनी अशा उपक्रमात रस घेऊन मुलांना प्रोत्साहित करावे लागते. मुलांच्या सुप्त गुणांना आकार देणारे शिक्षक त्यांच्याकडून आगळे काही तरी करवून घेऊ शकतात.

असाच एक सुंदर उपक्रम डॉ. हेडगेवार विद्यालयाने यशस्वी करून आपल्या शिरपेचात आणखी एक मोरपीस चढविले आहे. कला अकादमीच्या कला दालनात या विद्यालयाने कला अकादमीच्या सौजन्याने ‘चित्रपालवी’ हे आपल्या विद्यालयातील इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन २४ ते २६ एप्रिल दरम्यान भरविले होते. या प्रदर्शनातील चित्रकृती पाहून रसिक मन थक्क व्हावे, अशीच चित्रे तिथे होती. काही विद्यार्थ्यांनी तर इतक्या सफाईने आणि प्रभावीपणे चित्रे रेखाटली की, ती विद्यार्थ्यांनी काढली, यावर विश्‍वास बसणार नाही.
या विद्यालयामधील सर्जनशीलतेला योग्यप्रकारे आकार देणारे या विद्यालयाचे कला शिक्षक, प्रतिभाशाली चित्रकार प्रवीण नाईक यांचे आवर्जून अभिनंदन करायला हवे. कारण या प्रदर्शनातील सुबक, सुंदर चित्रकृती रसिकांसमोर आणण्यासाठी त्यांनी उत्कृष्टपणे मुलांना मार्गदर्शन केले आहे. चित्रकलेबद्दलची त्यांची निष्ठा तर मला माहीत आहे.

२८ विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ९२ चित्रकृती या प्रदर्शनात मांडलेल्या होत्या. निसर्गचित्रे, स्टील लाइफ, गणपती, बुद्ध यांच्यावरील चित्रे अशी विविध चित्रांचा यात समावेश आहे. या प्रदर्शनातील सर्व चित्रे ही ऍक्रॅलिक ऑन कॅनव्हास माध्यमातील आहेत. हे माध्यम विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे हाताळलेले आहे. आयुष नाईक या विद्यार्थ्याच्या गणपती, पक्षी व निसर्गचित्र कलाकृती सुंदर आहेत. लेखराज सुर्लकर याचे निसर्गचित्र खूपच प्रभावी आहे. त्यातील धबधबा, वृक्ष, वनराई आल्हाद देतात. गणपतीचे त्याचे चित्र वेधक आहे त्यात कलात्मकतेचा सुरेख आविष्कार आहे. वेगळी संकल्पना त्यात आहे. बुद्धाची भावमुद्रा टिपणारे एक त्याचे चित्र आहे. तसेच पांढर्‍या फुलावरील एक नितांत सुंदर चित्र आहे.

निधी ठाकूर हिचे फुलपाखराचे चित्र सौंदर्यपूर्ण आहे. मानस आमोणकर, वेदार्थ जोशी आदींची निसर्गचित्रे प्रदर्शनाची शोभा वाढवत आहेत. सुमेध प्रभुदेसाई, आश्‍वेक दिवाडकर यांनी स्टील लाइफवर चांगल्याप्रकारे चित्रे रेखाटली आहेत. तन्वी वायंगणकर हिने झाडाच्या फांदीवर विसावलेल्या ‘तोता मैना’चे चित्र छान चितारले आहे. निशीद च्यारी याने निष्पर्ण झाडातील सौंदर्य टिपले आहे. नेहाल च्यारीने गणपतीचे सात्त्विक रूप रेखाटले आहे. तर दुर्गेश वेंगुर्लेकरने बुद्धाची भाव मुद्रा उत्तमरीत्या रेखाटलेली आहे. रईश शिरोडकरचे पोपटाचे चित्र वेधक आहे.

रूक्मा फडके हिने काढलेला सुतार पक्षी, बरखा देसाईने मेणबत्ती व संगीतावर प्रतीकात्मक रंगवलेली चित्रे, सई भंडारे हिने रेखाटलेल्या फुलाचे मध चाखण्यासाठी सज्ज असलेला पक्षी, सिद्धी पेडणेकर हिचा फ्लॉवर पॉट, उर्वी होबळे हिने काढलेली सुंदर फुले अशा चित्रकृतींनी प्रदर्शन सजले आहे. देविका पै वेर्णेकर हिने झाडाच्या फांदीला लटकावलेल्या झोपाळ्यावर झोका घेणार्‍या बालिकेचे चित्र तसेच नाजूकशा फांदीवर बसलेल्या चार कावळ्यांचे चित्र विलक्षणरित्या रेखाटले आहे. वेदार्थ जोशी याने सूर्य अस्ताला जाण्याचे वातावरण आणि समुद्रकिनार्‍यावर विसावलेली होडी हे दृष्ट प्रभावीपणे टिपले आहे.

इतरही मुलांची चित्रे प्रदर्शनाची शोभा वाढवत आहेत. हे प्रदर्शन प्रत्यक्षात येण्यासाठी उन्हाळी सुट्टीत एक आठवडा चित्रकलेत पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रवीण नाईक यांनी जातीने काम करून घेतले आहे. अर्थात विद्यालयात ते दर आठवड्यातून एक दिवस सायंकाळी मुलांसाठी चित्रकला वर्ग घेतात. यातून मुलांची तयारी करून घेतात. त्यामुळेच विद्यार्थी एवढी चांगली चित्रे साकारू शकले.

प्रवीण नाईक यांनी मुलांना विषय त्यांच्या आवडीप्रमाणे कल्पनेप्रमाणे निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. फक्त त्यांनी काढलेली चित्रे कशी उत्तम होतील, याचे मार्गदर्शन त्यांनी केले. पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व व्यवस्थापनाच्या सहकार्यानेच असे उपक्रम यशस्वी होत असतात. प्रत्येक विद्यालयात असे एकमेकांच्या सहकार्याने उपक्रम हाती घेतल्यास विद्यार्थ्यांनाही अभ्यासाच्या तणावातून मोकळीक मिळेल व अभ्यासाचे ओझे कमी होऊन त्यांच्यातील गुणांना पैलू पाडले जातील. त्यांचे कला गुण रसिकांपर्यंत पोचविले जात आहेत, याचे समाधान मुलांना मिळेल.
डॉ. हेडगेवार विद्यालयाने असेच उपक्रम राबवून आपल्या लौकिकात भर टाकावी.