ब्रेकिंग न्यूज़

हिममानवाची पावले ः आभास की वास्तव?

  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

भारतीय सेना मागील सात दशके हिमालयात गिर्यारोहणाचा सराव करते आहे. अशा प्रकारच्या विशाल गूढ मानवाच्या फंदात ती या आधी कधीच पडली नव्हती. पण या वेळी पहिल्यांदाच सेनेने अशा प्रकारची जाहीर घोषणा केली, त्यामुळे सोशल मीडियामधील यतीप्रेमींमध्ये उत्सुकतेची प्रचंड लाट आली…

भारतीय सेनेच्या १८ सैनिकांचे गिर्यारोहण पथक मार्च ते मे महिन्यात त्यांच्या हिमालयीन मोहिमे अंतर्गत ८००० मीटर (२७,२४७ फूट) उंच माउंट मकालूवर चढाई करील या अर्थाचे एक प्रसिद्धी पत्रक भारतीय सेना मुख्यालयाने २६ मार्च २०१९ ला जारी केले होते. बर्फाच्छादित पर्वतराजींवरील अतिदूर पल्ल्याची भ्रमंती सेनेच्या सामरिक प्रशिक्षणाचा हिस्सा असते. ठरल्याप्रमाणे त्या विवक्षित दिवशी हे गिर्यारोहक पथक आपल्या मोहिमेवर रवाना झाले. मकालू शिखर नेपाळ आणि तिबेटच्या मध्यात आहे. अशा मोहिमे दरम्यान मोहीम प्रमुखांनी रोज सकाळ- संध्याकाळ सेना मुख्यालयाला ‘सिच्युएशन रिपोर्ट’ पाठवणे बंधनकारक असते. हा मोहीम प्रमुख देखील ही कारवाई रोज करत असे. मंगळवार ३० एप्रिल,१९ रोजी सेनेच्या ऍडिशनल डायरेक्टोरेट जनरल ऑफ पब्लिक इन्फर्मेशनने ‘फॉर द फर्स्ट टाईम इंडियन आर्मी माउंटेनियरींग एक्सपीडीशन हॅज सायटेड मिस्टीरियस फूट प्रिंट्स ऑफ मिथिकल बिस्ट यती. धिस इल्युझिव्ह स्नोमॅन हॅज ओन्ली बिन सायटेड ऍट मकालू बारून नॅशनल पार्क इन द पास्ट’ असे ट्वीट करून त्या पाऊलखुणांचे तीन आणि त्या मोहिमेतील सदस्यांचा एक असे चार फोटो सोशल मीडियावर टाकले. प्रत्येक पाऊलखूण ३२ बाय १५ इंचाची (८१ बाय ३८ सेंटीमीटर) होती. या पाऊलखुणा या मोहिमेला ९ एप्रिलला मकालू बेसकॅम्प जवळ पाहायला मिळाल्या आहेत. त्याच दिवशी त्यांनी त्या पाऊलखुणांचे फोटो आणि व्हिडिओ सेना मुख्यालयाला सिच्युएशन रिपोर्टद्वारे पाठवले होते. सामान्य मानवाच्या पायांची लांबी कमाल १५. ७८ इंच आणि रुंदी ५ इंच असते. गोरिल्लाचा पाय १८-२० इंच लांब व ६-७ इंच रुंद असतो. या मापकामुळे सेनेने त्यांना दिसलेल्या पाऊल खुणा यतीच्या आहेत, असे वाटून त्या जाहीर केल्या असाव्यात.

ज्या यतीला नेपाळी लोकसंगीतात ‘आपादमस्तक केसाळ वानर’ किंवा ‘केसाळ हिममानव’ म्हणतात, त्याला पाश्चिमात्य देश हिमालयातील ‘हिममानव : अबोमिनेबल स्नोमॅन’ किंवा ‘यती’ या नावाने संबोधतात. सर्वसाधारण मानवापेक्षा बराच मोठा असणारा हा प्राणी हिमालय, सैबेरिया आणि मध्य पूर्व आशियाच्या पर्वतराजींमध्येच वास्तव्य करतो, अशी वदंता आहे. मात्र हा खरेच अस्तित्वात आहे का याबद्दल जनमानस आणि शास्त्रज्ञांमध्ये दुमत आहे. असे असले तरी ब्रिटिश पर्यावरणवादी सर डेव्हिड अटेन्बरो यांनाही त्यांनी भुरळ घातली आहे.

२०११ मध्ये नेपाळमध्ये सापडलेले यतीचे तथाकथित बोट हे बोट नसून मानवी हाडाचा तुकडा असल्याचे एका जिनेटिक तज्ज्ञाने सांगितले. २०१४ मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञांनी तथाकथित हिमालयीन यतीच्या केसांच्या ३० नमुन्यांची चाचणी घेतली असता ते पॅलिओलिथिक पोलर बिअरचे केस निघाले. हिमालयीन यतीचे केस, हाडांचे तुकडे, कातडीचे तुकडे आणि विष्ठेच्या २४ नमुन्यांची डीएनए चाचणी २०१७ मध्ये करण्यात आली होती. शार्लोट लिंडक्विस्ट यांच्या फ्रेंच टीमने ही चाचणी केली होती. केस, कातडी व विष्ठेचे नमुने हिमालयातील काळ्या आणि राखाडी अस्वलांचे, दाताचा तुकडा हिमश्वानाचा, एका स्थानिक बौद्ध मंदिरात ठेवलेला यतीचा पंजा प्रत्यक्षात काळ्या अस्वलाचा आणि हाडे तिबेटीयन ब्राऊन बिअरची निघाली आहेत.
जवळपास ३५० वर्षांपूर्वी यती अथवा हिममानवाबद्दलच्या वदंतांची सुरवात झाली. असे म्हणतात की त्या काळी सांगवा दोरजे नावाचा नेपाळी साधू, दूरवरच्या उत्तुंग पहाडांवरील पांगबोचे गावा जवळील गुंफेत राहायला गेला, कारण तेथून त्याला कैलास शिखराचे सहजसुलभ स्पष्ट दर्शन होत असे. तेथे राहण्यासाठी त्याला यती मदत करत असत आणि त्या साधूने त्यातील एका मृत यतीचे अवशेष सांभाळून ठेवले होते, असे स्थानिक लोकगीतांमधून प्रत्ययाला येते. नेपाळी व तिबेटी भाषेत यतीला मेह तेह (अस्वली मानव) आणि कांग मी (हिममानव) हे नामाभिदान देण्यात आले आहे. यतीचे डोके चौकोनी असून त्याचे केस तांबडे असतात आणि तो शिट्टीसारखा कर्कश्श आवाज काढतो अशी वदंता आहे.

१९२०-२१ मध्ये चार्ल्स हॉवर्ड बरी या ब्रिटिश गिर्यारोहकाने तिबेटच्या ल्हाकपा ला या खिंडीजवळ यतीच्या पाऊलखुणांचे फोटो काढून, १९२१ च्या त्याच्या ‘माउंट एव्हरेस्ट : रेकॉनिसन्स १९२१’ या पुस्तकात प्रसिद्ध केल्यानंतर पाश्चिमात्य देशांमध्ये यतीबद्दलच्या उत्सुकतेला उधाण आले. एन ए टॉम्बझी या ग्रीक जिऑलॉजिस्टने येतीला २-३०० मीटरांवरून पाहिल्याचे १९२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘फोटोग्राफिक एक्सपीडीशन टू सदर्न ग्लेशियर्स ऑफ कांचनगंगा’ या पुस्तकात म्हटले आहे. १९५१ मध्ये एरीक शिप्टन आणि मायकेल वर्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी मानवविरहित प्राण्यांमधील श्रेष्ठ जात असे मानलेल्या, विशाल मानवाच्या पाऊलखुणांचे फोटो प्रसिद्ध केल्यावर हे कुतूहल अक्षरश: उतू जाऊ लागले. १९६० मध्ये एव्हरेस्ट विजेता सर एडमंड हिलरी आणि जॉन हँट यांनी एव्हरेस्टवर स्वारी करताना एका तथाकथित यतीचे डोके आणले होते; पण नंतर ते हिम बकर्‍यासारख्या प्राण्याचे आहे हे सिद्ध झाले. १९८६ मध्ये रेन्होल्ड मेसर्न या गिर्यारोहकाने ‘अबोमीनेबल हिस्टरी’ या पुस्तकात येतीच्या पावलांचे अगदी ताजे ठसे पाहिल्याचे नमूद केले आहे. २०१० मध्ये चीनी लोकांनी तिबेटमध्ये एक चार पायांचा यती पकडल्याचे जाहीर केले; पण शेवटी तो देखील चार पायांचा ठिपक्या मांजराच्या जातीचा प्राणी निघाला.
यानंतर कथा-कादंबर्‍या, चलचित्रपट, गाणी आणि खेळांमध्ये अशा प्रकारच्या हिममानवाचा उल्लेख होऊ लागला, पण शास्त्रज्ञ मात्र अजूनही या पाऊलखुणाच्या ठश्यांना आणि फोटोंना ‘ते विशाल अस्वलाचे आहेत’ असेच मानत असत. मागील तीन शतकांपासून यतीचा मागोवा घेणे सुरु आहे आणि आता एका ट्वीटद्वारे भारतीय सेनेने हा हिमालयातील विशालकाय प्राणी (खरेच अस्तित्वात आहे याचा पुरावा मिळाल्याचे जाहीर केले आहे.

माजी खासदार तरुण विजय यांनी याबद्दल भारतीय सेनेची प्रशंसा केली असली तरी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक व्ही. बी. माथूर यांनी याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. अमेरिकन माउंटन इन्स्टिट्यूट प्रणेता डॅनियल सी टेलर यांनी ‘भारतीय सेनेचे हे फोटो एशियाटिक ब्लॅक बिअरचे असू शकतात’ असे म्हटले आहे. भारतीय सेना मागील सात दशके हिमालयात गिर्यारोहणाचा सराव करते आहे. अशा प्रकारच्या विशाल गूढ मानवाच्या फंदात ती या आधी कधीच पडली नव्हती. पण या वेळी पहिल्यांदाच सेनेने अशा प्रकारची जाहीर घोषणा केली, त्यामुळे सोशल मीडियामधील ‘यती लव्हर्स’मध्ये उत्सुकतेची प्रचंड लाट आली आणि तेवढ्यात प्रमाणात त्याची टिंगलही केली गेली. ३६ तासांमध्ये त्याच्यावर ६००,००० वर प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. सेनेने पुढे म्हटले आहे की ही कारवाई आम्ही आम लोकांची ज्ञानवृद्धी आणि ‘टू एक्साईट सायंटिफिक टेंपर्स रीकिंडल द इंटरेस्ट’साठी केली आहे. अनेकांनी मात्र ‘सेनेने निवडणुकीच्या मध्यात मोदींच्या मदतीसाठी हे केले’ अशी ओरड केली आहे!