हिंदुत्वाचे नवे कैवारी

आपले बंधू सुदिन ढवळीकर यांच्या प्रमाणेच आता दीपक ढवळीकरही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून देशभरात जाऊन पोहोचले आहेत. ‘येनकेन प्रकारेण प्रसिद्ध पुरूषो भवेत’ असे संस्कृत सुवचन आहे. त्याप्रमाणे काहीही कारणाने का होईना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासारख्या एका छोट्याशा प्रादेशिक पक्षाच्या या दोघा धुरंधरांना राष्ट्रीय स्तरावर या वादांच्या निमित्ताने अफाट प्रसिद्धी मिळाली. सुदिन यांनी पब संस्कृतीविरुद्ध राग व्यक्त केला होता. दीपक त्याच्या चार पावले पुढे गेले. मोदींना सर्वांचा पाठिंबा मिळाला तर हे राष्ट्र ‘हिंदू राष्ट्र’ बनेल असा ठाम विश्वास त्यांनी विधानसभेच्या पटलावर दणादण व्यक्त केला. तरी पण त्यांना ‘हिंदूराष्ट्र बनेल’ म्हणजे देशाचे नेमके काय बनेल असे म्हणायचे होते याचा अर्थबोध अजूनही बर्‍याच गोमंतकीयांना झालेला नाही, कारण आजवर दीपक यांनी किंवा त्यांच्या मगो पक्षाने कधी ज्वलंत हिंदुत्वाची कास धरल्याचे पाहायला मिळाले नव्हते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा स्थापनेपासून मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमानी पक्ष गणला जात असे. ढवळीकर बंधूंच्या हाती त्याची सूत्रे आली, तेव्हापासून या पक्षाची भाषिक भूमिकाही जेथे डळमळीत झाली, तेथे हिंदुत्वाची भूमिका मांडण्याचा तर प्रश्नच नव्हता. मात्र या पक्षाने धर्मनिरपेक्षतेचा कैवारी म्हणवणार्‍या कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेससमवेत भरपूर सत्ता उपभोगून झाल्यानंतर त्यांची साथ सोडून संधिसाधूगत कमळाबाईंचा पदर धरला. शिवसेनेने अयोध्या आंदोलन पेटल्यानंतर एकाएकी आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार सुरू केला होता, त्याप्रमाणे मगो पक्ष आता वागू इच्छितो आहे की काय! एकीकडे गोव्यातील भारतीय जनता पक्ष आपले मूळचे हिंदुत्व बाजूला ठेवून ‘धर्मनिरपेक्ष’ होऊ पाहतो आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी ख्रिस्ती उमेदवारांना ठिकठिकाणी उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले. प्रमोद मुतालिक यांनी गोव्यात डोके वर काढले, तेव्हा इतरांनी आक्षेप घेण्यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीच मुतालिक यांना कायदा हाती घ्याल तर ‘हात धोडायतलो’ अशा शब्दांत ठणकावले होते. पर्रीकरांमुळेच मुतालिक यांना भाजपामध्ये मिळालेला प्रवेश काही तासांतच रद्द झाला. भाजपा एकीकडे गोव्यात अल्पसंख्यकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करीत असताना सत्तेत सामील असलेला सहयोगी मगो पक्ष मात्र ‘बाटग्याची बांग मोठी’ म्हणतात त्याप्रमाणे एकाएकी ज्वलंत हिंदुत्वाची आक्रमक भाषा करू लागला आहे याचा काय अर्थ घ्यायचा? एकेकाळी मगोचे मतदार भाजपाने पळवले, तसे आता आगामी निवडणुकीत ‘धर्मनिरपेक्ष’ बनलेल्या भाजपाचे पारंपरिक कडवे हिंदुत्ववादी मतदार मगो पळवू पाहतो आहे का? कॉंग्रेसने शुक्रवारी ‘हिंदुराष्ट्र’ वक्तव्यावरून सभात्याग केला, पण दीपक ढवळीकर विधानसभेत बोलले त्याच्या आधल्या दिवशी. तेव्हा कोण्याही कॉंग्रेस आमदाराने चकार शब्दानेही त्या विधानाला आक्षेप घेतला नव्हता. म्हणजे तेव्हा त्यांना त्यात काही वावगे वाटलेच नाही. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी या विषयाला जेवढे जमेल तेवढ्या भडकपणे वादाचा विषय बनवले तेव्हा कुठे काही तरी चुकल्याची जाणीव कॉंग्रेसजनांना झाली. ‘हिंदूराष्ट्र’ वक्तव्याचे दिल्लीतील श्रेष्ठींपर्यंत पडसाद उमटल्याचे दिसताच मात्र मंडळी खडबडून जागी झाली आणि शुक्रवारी सभात्यागाचे नाटक झाले. नाटक अशासाठी म्हणायचे की या विषयावर कॉंग्रेस आमदारांमध्ये एकवाक्यता नव्हती हे स्पष्टपणे दिसले. जर ‘हिंदूराष्ट्र’ प्रश्नी आवाज उठवायची रणनीती कॉंग्रेसने आखली होती, तर मावीन, बाबूश, विश्वजित आणि मडकईकर हे विधानसभेत अनुपस्थित का होते? राणे, रेजिनाल्ड यांनी सभात्याग करताना सभागृहात बसलेल्या दिगंबर कामत, बाबू कवळेकर, जेनिफर यांना ‘उठा उठा’ करीत आपल्यासोबत बाहेर नेले. सर्वांत मोठा विनोद म्हणजे मावीन गुदिन्हो यांनी आपल्या गूढ सरकारप्रेमाचे दर्शन घडवीत या सभात्यागावरच नंतर जाहीर ताशेरे ओढले. सहकार्‍यांनी सभात्याग करूनही ते स्वतः विधानसभेत जातीने हजर राहिले. हे सगळे पाहिले तर हा सभात्याग हा नुसता फार्स ठरतो. केवळ राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी गदारोळ माजविल्याने दिल्लीश्वरांना समाधानी करण्यासाठी तो झाला असावा. हिंदुत्वाची व्याख्या ही जो तो सोयीनुसार करीत असतो. कधी हिंदुत्व ही ‘जीवनपद्धती’ मानली जाते, तर कधी हिंदू धर्माच्या संकुचित स्वरूपात त्याचा उल्लेख होतो. दीपक ढवळीकर यांना कोणते ‘हिंदू राष्ट्र’ अभिप्रेत आहे हे त्यांना तरी नीट उमगले आहे ना?

Leave a Reply