ब्रेकिंग न्यूज़

हाशिम आमला निवृत्त

दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानी वंशाचा अनुभवी फलंदाज हाशिम आमला याने काल गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. आमलाने आपला निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाला कळवला आहे.

गेल्या काही महिन्यांत त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ ओसरला होता. नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्‍वचषक स्पर्धेतदेखील आमला आपल्या अनुभवाचा फायदा संघाला मिळवून देऊ शकला नव्हता. आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत गुणतालिकेत शेवटून दुसर्‍या स्थानावर राहिला होता. या निराशाजनक कामगिरीनंतर आफ्रिकेच्या संघात सध्या मोठी उलथापालथ सुरु आहे.

माझ्यावर केलेले प्रेम आणि दिलेल्या पाठिंब्यासाठी मी आई-वडिलांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच मी एवढे वर्ष दक्षिण आफ्रिकेकडून खेळू शकलो. या प्रवासात माझ्यासोबत असणारे माझे कुटुंब, मित्र आणि सहकारी खेळाडूंचेही आभार. कठीण परिस्थितीमध्येही चांगले खेळण्याची उर्जा चाहत्यांनी दिली. आफ्रिकेचा संघ ज्या लढाऊ बाण्यासाठी ओळखला जातो याचा मला कायम अभिमान असेल.’ असे आमला म्हणाला.

आमलाने १२४ कसोटी सामने खेळताना ४६.६४च्या सरासरीने ९२८२ धावा केल्या आहेत. यात २८ शतके व ४१ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमलाने १८१ लढती खेळताना ४९.४६च्या सरासरीने ८११३ धावा कुटल्या आहेत. यात तब्बल २७ शतके व ३९ अर्धशतके आहेत. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमधील ४४ सामन्यांत १३२.०५च्या स्ट्राईकरेटने १२७७ धावा आमलाच्या नावे आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा तो दक्षिण आफ्रिकेचा एकमेव खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना कसोटीत इंग्लंड, भारत व वेस्ट इंडीजविरुद्धची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आमलाच्या नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वांत कमी डावात २०००, ३०००, ४०००, ५०००, ६००० व ७००० धावांचा टप्पा त्याने ओलांडला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक वनडे शतकेदेखील आमलाच्याच नावावर आहेत. २०१० व २०१३ साली तो दक्षिण आफ्रिकेचा ‘क्रिकेटर ऑफ दी ईयर’ ठरला होता.

एबी डीव्हिलियर्स, डेल स्टेननंतर आमलाच्या निवृत्तीमुळे दक्षिण आफ्रिकन क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती स्वीकारली असली तरी आमला फ्रेंचायझी क्रिकेट अजून किमान दोन वर्षे तरी खेळणार आहे.