हाडांचा केसांशी काय संबंध?

हाडांचा केसांशी काय संबंध?

  •  डॉ. मनाली म. पवार
    गणेशपुरी-म्हापसा

मृत्युनंतरदेखील शरीराच्या इतर कोणत्याही घटकांपेक्षा अधिक काळ टिकून राहणारा घटक म्हणजे अस्थिधातू. त्याचा मलस्वरूप म्हणजे केस. हे केससुद्धा मृत्युनंतर कुजत नाही. म्हणजेच अस्थिधातू उत्तम असल्यास केसही चांगले असतात.

मीठ व खारट पदार्थांच्या अतिसेवनाने केस गळतात व लवकर पांढरे होतात.
केसांच्या आरोग्यासाठी अस्थिधातू व रसधातूला पोषक असा आहार, औषधे सेवन करावीत. उदा. रोज चांगल्या प्रतीचे दूध घ्यावे.

सौंदर्याची विशिष्ट अशी परिभाषा नाही पण स्त्रियांचे लांबसडक केस व पुरुषांना टक्कल नसणे हे सौंदर्य खुलवण्यात भर देतात. सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून आज आपण केसांची अगदी दुर्दशा करत आहोत. ज्या गोष्टी निसर्गाने दिलेल्या आहेत त्या तशाच नैसर्गिक पद्धतीनेच टिकवायला पाहिजेत. आज अगदी लहान वयातच मुला-मुलींचे केस पिकतात, गळतात किंवा वाढ खुंटते. असे का होत असेल? तरुण वयातच मुलांच्या डोक्यावरील केस विरळ होऊन पूर्ण चंद्र झळकू लागतो. मुलींचे लांबसडक, मस्त वेणी केलेले, त्यावर गजरा माळलेले केस… असे अगदी स्त्रीच्या सौंदर्याच्या वर्णनामध्ये फक्त वाचायला मिळते. ज्या भारतीय संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे ती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. त्यामुळे या समस्येकडे थोड्या गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
आपल्या केसांचे सौंदर्य टिकवणे आपल्या हाती आहे. सौंदर्यरक्षणामध्ये नैसर्गिक द्रव्ये, वनस्पती, सकस आहार, संतुलित जीवनशैली यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

आयुर्वेदशास्त्राप्रमाणे केस व लोम हे अस्थि धातूचे मल आहेत. पोषण क्रमाने पाचव्या क्रमांकाचा अस्थिधातु हा शरीरामधील सर्वांत बळकट, ताकदवान घटक आहे. मृत्युनंतरदेखील शरीराच्या इतर कोणत्याही घटकांपेक्षा अधिक काळ टिकून राहणारा घटक म्हणजे अस्थिधातू. त्याचा मलस्वरूप म्हणजे केस. हे केससुद्धा मृत्युनंतर कुजत नाही. म्हणजेच अस्थिधातू उत्तम असल्यास केसही चांगले असतात. म्हणून बर्‍याच वेळा केसांच्या तक्रारींवर कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. पण हे सरसकट सगळ्यांनाच कॅल्शियम देणे चुकीचे आहे. अस्थि व केसांचा जवळचा संबंध असला तरी केसांच्या तक्रारींची इतर अनेक कारणे असू शकतात.
अस्थिमल – केश, लोम
केसांचे पर्यायी शब्द – बाल, कच, चिकुर, कुन्तल, शिरोरूह, मूर्धज, अस्त्र, तीथवाक
शरीरावरील सूक्ष्म केसांना लोम, रोम, तनुरूह.
पुरुषांमध्ये चेहर्‍यावरील केसांना – श्मश्रु, ओठांवरील केसांना – मासूरी (मिशा) म्हणतात.
केसांची व्यत्पत्ती – क्लिश्यते बध्यते, क्लिश विबाधायाम्‌|
केश ते – ज्यांना बांधले जाते, जे डोक्यावर असतात ते केस.
शिरसि रोहति – शिरोरूह, मूर्धनि जायते – मूर्धज
रोम – लोम रोहति रुयते, लूयते

केसांचे स्थान – त्वचेचा काही भाग – लोमरहित, काही अंश लोमयुक्त व काहीींश – दीर्घघन लोम (केस)युक्त असतो. काहींच्या शरीरावर अतिलोम असतात तर काहींच्या शरीरावर लोमच नसतात. आयुर्वेदामध्ये अतिलोम व अलोम या दोन स्थितींचा समावेश (अष्टौनिंदिन) या गटात केला आहे. म्हणजे आठ प्रकारचे निंदित पुरुष आयुर्वेदात सांगितले आहे. ते म्हणजे १) अतिदीर्घ (जास्त उंच), २) अति र्‍हस्व (जास्त बुटके), ३) अति लोम (जास्त केस असणारे), ४) अलोमा (शरीरावर अजिबात केस नसणारे), ५) अतिकृष्ण (अत्यंत काळा), ६) अतिगौर (जास्त गोरा), ७) अतिस्थूल (लठ्ठ), ८) अतिकृश (अगदीच हाडकुळा). यात अतिस्थूल व अतिकृश हे चिकित्सेच्या दृष्टीने निंदित होय. पण बाकी सहा हे शारीरिकदृष्ट्या निंदित होय. अतिलोम असल्यास एका रोमकुपात अधिक केस असतात तसेच केसही दाट व मोठे असतात. यामुळे रोमकुपाचा मार्ग बंद होतो व त्यामुळे स्वेद बाहेर पडण्याच्या क्रियेत अडथळा येतो. तसेच लेप- अभ्यंग, परिशेष आदी चिकित्सेत बाधा येते. तसेच अलोम असल्यास शरीरावर लोम रंध्रांची संख्या कमी असल्याने स्वेदादी मल पूर्णतः बाहेर पडू शकत नाही.
केसांची उत्पत्ती – अस्थि धात्वग्नीद्वारे, त्रिधापरिणमत प्रसंगी किट्ट स्वरूपात केश, लोम, नख यांची उत्पत्ती होते. गर्भावस्थेत ६/७ महिन्यात डोक्यावर केस येतात. पूर्णकालिक प्रसवसमयी गर्भाच्या डोक्यावर २ इंच लांबीचे केस प्राकृत होय. वय परिणामाच्या प्रभावामुळे तारुण्यात, जातव्यंजन, लक्षण स्वरूपात दाढीमिशा, काखा व गुह्यांग येथे केसांची उत्पत्ती होते.

केसांचे स्वरूप –
प्रशस्त केस – एकेकजा मृद्गो अल्पा स्निग्धाः|
सुबद्धमूलाः कृष्णाः केश प्रशस्यते ॥
पार्थिव घटक व पितृज भाव गुरू, खर, कठीण, आपच्यता, गळणे व पिकणे यांचा अभाव दिसत असल्याने गुरु गुण सांगितला आहे.
केश – लोम वृद्धीशील आहे., म्हणजेच चेतन लक्षणयुक्त आहे तरी संज्ञाहीन आहेत. म्हणून वेदनारहित शरीरद्रव्यांमध्ये गणना होते.
आयुर्वेद शास्त्रामध्ये धातुक्षारतेची लक्षणे सविस्तर वर्णन केलेली आहेत. धातु सारवान असणे म्हणजेच धातु विशुद्ध, रोगरहित असणे. क्षारतेवरून एखाद्याचे आरोग्य, स्वास्थ्याचे ज्ञान होते.
त्वरुसारकतेमध्ये (रस धातु सार असल्यास) त्वचेमध्ये मृदु, अल्प, सूक्ष्म, सुकुमार, स्निग्ध, श्‍लश्म, प्रसन्न परंतु गंभीर मूळ असणारे लोम सांगितले आहेत.
तसेच अस्थिसारता असल्यास केसांची वाढ ही मंद व टिकाऊ होते. तसेच केस आकाराने मोठे व जाड असतात असे सांगितले आहे. म्हणूनच अस्थि धातूचा क्षय झाल्यास किंवा अस्थिधातूचे पोषण नीट होत नसल्यास केसांच्या तक्रारी सुरू होतात व केस गळायला लागतात.
प्रत्येक माणसाच्या प्रकृतीप्रमाणे ही केसांचे स्वरूप वेगळे असते. वातप्रकृतिमध्ये केश व लोम हे अल्प, रुक्ष, पुरुष; पित्त प्रकृतिमध्ये – अल्प, मृदु, पिंग, कपिलवर्णी व टक्क्ल पडणे किंवा गळणे, पिकणे ही लक्षणे असतात. केशयुक्त स्थानांमध्ये पित्त व स्वेदाधिक्यामुळे दुर्गंधी येते.
कफप्रकृतीमध्ये केस हे स्निग्ध, घन, दीर्घ असतात.
केस कसे असावे?….
केस चांगल्या प्रकारे स्निग्ध, अर्थात फार तेलकटही नाहीत व कोरडेही नाहीत. असे असावेत. मऊ, बारीक व स्थिर म्हणजे सहजासहजी न गुंतणारे असावेत.
केसांचे आरोग्य नीट असणे हे दोन धातूंवर अवलंबून आहे.
१) अस्थोः मलः|
केस हा अस्थिधातूचा मल आहे. म्हणजे शरीरातील धातू तयार होताना जेव्हा हाडे तयार होतात तेव्हा त्याच्या बरोबरीने केसही तयार होतात.
२) केसांच्या संबंधित दुसरा महत्त्वाचा धातू म्हणजे रसधातू होय. रसधातू संपूर्ण शरीराला व्यापून विविध शरीर-घटकांचे पोषण, संवर्धन व धारण करीत असतो. त्यामुळे रसधातू उत्तम असल्यास केसांचे आरोग्यही टिकून राहते.
शरीरात वातदोष व पित्तदोष असंतुलित झाले असता रसधातूही क्षीण होतो व याचा परिणाम केसांवर झाल्याशिवाय राहात नाही. केस राठ व कोरडे होणे, निस्तेज दिसणे, टोकाशी दुभंगणे, लगेच तुटणे, डोक्यात कोंडा होणे ही लक्षणे दिसावयास सुरुवात होते. विशेषतः रसधातू बिघडला, तर केस अकाली पांढरे होण्यास सुरूवात होते.
म्हणून केसांच्या समस्यांवर फक्त बाह्य उपचार, कॅल्शियमच्या गोळ्या , व्हिटामिनच्या गोळ्या एवढेच उपचार पुरेसे नसतात, तर त्याचबरोबरीने आपला आहार, आचार व व्यवहार यातही आवश्यक बदल करणे गरजेचे असते.
केसांच्या दोन मुख्य तक्रारी म्हणजे केस गळणे व अकाली पिकणे. यालाच आयुर्वेदामध्ये खलित आणि पलित असे म्हटले जाते.

पित्तप्रधान प्रकृतीमध्ये म्हणजे ज्यांच्या शरीरात स्वाभाविकच पित्तदोषाचे आधिक्य आहे. त्यांच्यामध्ये बहुदा ही दोन्ही लक्षणे दिसतातच. त्यामुळे पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी केसांची काळजी विशेषत्वाने घ्यावी व इतरांनीही केसांच्या आरोग्यासाठी पित्तदोष वाढणार नाही याकडे लक्ष ठेवावे.
खालील गोष्टींचे पालन करणे लाभदायक ठरते.
* तिखट, आंबट, खारट चवीचे पदार्थ नियत प्रमाणातच सेवन करावेत. आवडतात म्हणून अतिप्रमाणात खाऊ नयेत.
* तेलाचा अतिरिक्त वापर टाळावा.
* दही, आंबवलेले पदार्थ, मोहरी, कुळीथ यांचे सेवन नियमित करू नये.
* टोमॅटो, चिंच रोज व अति प्रमाणात खाऊ नये.
* तिळाचे तेल, मद्यपान, मासे, मांसाहार वर्ज्य समजावा.
* दिवसभर खात राहू नये.
* उन्हात तसेच अग्नीजवळ सतत काम करू नये.
* अतिशय संतापू नये. राग – चिडचिड करू नये.
केसांचा विचार करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्षार पदार्थांचे सेवन केसांना हानिकारक आहे.
ये घ्यतिलवणसात्म्याः पुरुषस्तेषामपि खालिव्यपालिव्यानि वलय.श्‍चाकाले भवन्ति|
मीठ व खारट पदार्थांच्या अतिसेवनाने केस गळतात व लवकर पांढरे होतात.
केसांच्या आरोग्यासाठी अस्थिधातू व रसधातूला पोषक असा आहार, औषधे सेवन करावीत. उदा. रोज चांगल्या प्रतीचे दूध घ्यावे. दुधात रसायन कार्य करणारी व केसांनाही ताकद देणारी शतावरी, सारीवा अशा वनस्पतीपासून तयार केलेले शतावरी कल्प सेवन करावे.
वातपित्त शमनासाठी व शरीरशक्ती वाढविणारे घरचे ताजे लोणीही उत्तम होय.
बदाम, अक्रोड, खारीक, जर्दाळू यांचाही रसधातू व अस्थिधातूचे पोषण होण्यासाठी वापर करावा.
डिंकाचे लाडू अस्थिपोषक असल्याने केसांनाही उपयुक्त ठरतात.
आयुर्वेदिक औषधांपैकी मोती भस्म, प्रवाळ भस्म, मृगशृंग भस्म, अश्‍वगंधारिष्ट, शतावरी कल्प यांनीही अस्थिधातूला बल मिळून केसांचे आरोग्य टिकून राहते.
रसायन द्रव्यात श्रेष्ठ असा आवळा केसांसाठी उत्तम वरदान आहे. त्यामुळे घरच्या घरी करता येणारा मोरावळा किंवा उत्तम प्रतिचा आयुर्वेदिक च्यवनप्राश खाणे चांगले.

केसांसाठी स्वास्थ्यवर्धक उपक्रम…
१. मूर्धतैलाचे ४ प्रकार, २. शिरोभ्यंग – केसांना तेल चोळणे, ३. पिचूधारण – तेलात भिजवलेला कापसाचा पिचू डोक्यावर ठेवणे, ४. शिरोधारा – डोक्यावर तेलाची, तूपाची, काढ्याची वनस्पतीसिद्ध दुधाची, शिवपिंडीवर सोडतात तशी धारा सोडणे.
५. शिरोबस्ती – विशिष्ट प्रकारे तयार केलेली टोपी डोक्यावर धारण करून, वरून उघडी असलेल्या भागातून तेल-तूप धारण करणे.
सार्वदेहिक स्नेहाभ्यंग ही महत्त्वाचा उपक्रम होय. म्हणूनच पूर्वीचे लोक केसांना रोज तेल लावायचे, तेव्हा केस गळायचे व पिकण्याचे प्रमाणही कमी होते.
नस्य हादेखील केसांसाठी महत्त्वाचा उपक्रम ठरतो. रोज दोन-दोन थेंब तिळ तेलाचे किंवा खोबर्‍याच्या तेलाचे किंवा अणूतेलाचे किंवा तूपाचे नाकामध्ये टाकल्यास अकाली केस पिकणे, गळणे, टक्कल पडणे यावर आळा घालता येतो.
केसांची निगा राखण्यासाठी….
– केस आठवड्यातून दोन वेळा धुवावेत.
– केसांची स्निग्धता व कोमलता कायम राहावी यासाठी अनैसर्गिक उत्पादनांचा वापर न करता आयुर्वेदिक द्रव्ये उदा. शिकेकाई, रीठा, नागरमोथा अशी केशद्रव्ये वापरावीत. केसांना नियमित तेल लावावे. तेल ब्राह्मी, माका या औषधांनी सिद्ध असावे.
– केसांमध्ये कोंडा असल्यास केस धुण्याच्या अगोदर त्रिफळा, कडूनिंब वगैरे शोधक द्रव्यांचा लेप लावून ठेवावा व मग केस धुवावेत. केस धुण्यास कोमट पाणी वापरावे.
केसांना कंडिशनिंग करण्याची इच्छा असल्यास कोरफडीचा ताजा गर केसांना अर्धा तास लावून ठेवावा व नंतर केस धुवावेत.
केसांच्या स्वास्थ्यासाठी हजारो रुपये खर्च न करता साधे-सोपे घरचे उपाय व सकस आहार, तणावरहित जीवनपद्धतीचे अवलंबन केल्यास पुरेसे आहे.