हसवणूक

  •  दत्ताराम प्रभू-साळगावकर

मोठमोठ्यानं व खळखळून हसलं तर म्हणे आपल्या शरीरातील गात्रं प्रफुल्लित होतात. देवानं दिलेला जन्म रडण्या-कुढण्यासाठी नाही, हसण्यासाठीच आहे! ‘येतो तो क्षण अमृताचा,’ असं म्हणूनच जगावं व म्हणावं- ‘हसण्यासाठी जन्म आपुला!’

 

ईश्‍वरानं माणसाला, जी अन्य कुठल्याही सजीवाला दिलेली नाही, अशी हसण्याची उत्तम देणगी दिलेली आहे. विनोद घडला, ऐकला तर आपण दिलखुलास हसतो. मजा वाटली, चांगली गोष्ट घडली, समाधान वाटलं तर आपल्या तोंडावर, ओठांवर हास्य फुलतं. आपल्या घरी येणार्‍याचं आपण हसून स्वागत करतो. मनसोक्त हसलं तर आपलं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मस्त राहातं. मोठमोठ्यानं व खळखळून हसलं तर म्हणे आपल्या शरीरातील गात्रं प्रफुल्लित होतात. ‘हसा व लठ्ठ व्हा’ असं आम्हाला लहानपणीच सांगितलं जाई! मन प्रफुल्लित तर तन प्रफुल्लित हे सत्य आहे व हे हसण्यानं साध्य होतं. ज्यांचं मत व तन प्रफुल्लित असतं त्याचं जीणंही असंच असतं! तन व मन या मालिकेतील तिसरा शब्द आहे धन. ते काही सर्वांना सारखं मिळतंच असं नाही. मिळालंच तर चांगल्या व सरळ मार्गाने मिळालं किंवा मिळवलं तर ठीक; नाहीतर धनकोचे ऋणको व्हायला वेळ लागत नाही!

हास्य जरी आपलं जीवन सुखकर करत असलं तरी सर्वच गोष्टी हसण्यावारी घ्यायच्या किंवा न्यायच्या नसतात. नाहीतर आपली स्थिती व जगणं हास्यास्पद होतं याची जाणीव बाळगायला हवी! हास्याला निर्विवाद स्थान आहेच. ‘हसण्यासाठी जन्म आपुला’ असं म्हणत रडणार्‍या बाळाला ‘रडू नको रे चिमण्या बाळा’ अशी अंगाई गायिली जाते व बाळ सुखनिद्राधीन होतो. जीवनाची सुुरुवात अशीच असावी, व्हावी आणि राहावीही!

माझ्या एका मित्रानं त्याच्या लग्न झालेल्या बहिणीची गोष्ट मला सांगितली. काही कारणानिमित्त तो तिच्या घरी थोडे दिवस राहायला होता. तिच्या घरात देवापेक्षा अधिक डॉक्टरला स्थान व मान! कोणाला साधी शिंक किंवा खोकला आला तर त्वरित डॉक्टरकडे रवानगी! प्रत्येक गोष्टीला औषध हेच उत्तर! औषधांच्या जोडीला हेच खायचं नाही, तेच खायचं नाही असली पथ्ये. शेवटी औषधांचा व पत्थ्यांचा एवढा अतिरेक व्हायला लागला की प्रत्येकजण आजारी पडायला लागला व डॉक्टरांची भर! घरात कुठलाही पदार्थ तयार केला, शिजवला तर तो कोणी व किती खायचा हे विचारण्यासाठी ती माझ्या मित्राला त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे पाठवायची. तो माझा मित्रसुद्धा शुद्ध वेड्यासारखा डॉक्टरकडे विचारायला जायचा. गर्दी असेल तर ताटकळत राहायचा. शेवटी शेवटी हे रोजचेच व्हायला लागले. त्याला स्वतःला कसलाही आजार नसताना रोज दवाखान्याची पायरी चढावी लागायची! डॉक्टरसुद्धा रोज रोज तेच ते प्रश्‍न ऐकून मिशीत हसायचे व त्यांचीही करमणूक व्हायची. शेवटी हा जाम वैतागला. कारण त्याची स्थिती सर्वांसमक्ष हास्यास्पद व्हायची. मग मात्र त्याला शहाणपण सुचलं. अति झालं… हे असलं चालू ठेवायचं नाही! डॉक्टरकडे जातो म्हणून घरातून बाहेर पडायचा व थोडा वेळ इकडे तिकडे फिरून यायचा व डॉक्टरचा म्हणून आपणच सल्ला द्यायचा. गोडधोड असलं तर खावं, तेलाचं, मसाल्याचं असेल तर मर्यादेत खावं, वांग्याचा पदार्थ असेल तर वातूळ म्हणून वर्ज्य… वगैरे! स्वतःच डॉक्टर बनला व साळसूद सल्ला द्यायला लागला!!
एक दिवस मात्र मजाच झाली. बहिणीनं डॉक्टरच्या सल्ल्यासाठी त्याला पाठवलं व तो बाहेर पडलाही! पण कसली तरी गोष्ट तिच्याकडून विचारायची राहून गेली म्हणून ती विचारण्यासाठी तिने डॉक्टरच्या दवाखान्यात फोन केला. तो फोन कंपाऊंडरने उचलला व डॉक्टरविषयी विचारलं असता त्यानं सांगितलं की आज डॉक्टर उपलब्ध नाहीत; बाहेरगावी गेलेले आहेत व आज येणार नाहीत. बहिणीनं अर्थातच फोन ठेवला. थोड्या वेळाने बाहेर गेलेला माझा मित्र बहिणीच्या घरी आला.

‘‘डॉक्टर दवाखान्यात होते का?’’ बहिणीचा प्रश्‍न. ‘‘होय, मी तिकडूनच आलो,’’ असं म्हणून त्यानं डॉक्टरचा म्हणून आपलाच सल्ला ऐकवला व मोकळा झाला. ‘‘पण मी दवाखान्यात फोन केला तेव्हा कळलं की आज डॉक्टर नाहीत. तुला कुठं भेटले?’’ यावर मित्राचं तततत पपपप झालं! बहीण गरम झाली. ‘‘रोज मला असाच फसवतोस की काय?’’ माझ्या मित्राचं बिंग सपशेल फुटलं! त्याचा बुरखा बहिणीने टराटरा फाडला. पण एक गोष्ट बरी झाली, त्याच्यामागची असली ब्याद मात्र मिटली… कामचीच!!
हा किस्सा ऐकून मी मनसोक्त हसलो. यावर हसायचं नाही तर काय?
————-
माझ्या एका दुसर्‍या मित्राच्या घरी जवळच असलेल्या देवळातून तीर्थ घेऊन एक पोर्‍या यायचा. देवाची पूजा झाली की तीर्थाचा रतीब लागलेलाच होता! पोर्‍या पुजार्‍याच्या घरी आसर्‍याला होता. गरीब होता. डोक्यानं चार आणे कमी होता. तरीपण वेडा म्हणजे वेडा नव्हे व शहाणा म्हणावा तर शहाणा नव्हे, असा! लोक त्याची मस्करी करायचे व करमणूक करून हसायचे. त्याला भविष्यही विचारायचे व तो काहीतरी ठोकून द्यायचा. एक दिवस माझ्या मित्राच्या घरी एक मुंबईचा पाहुणा आला होता. मी पण तेव्हा त्याच्या घरी गेलो होतो. एवढ्यात तो पोर्‍या आला. माझा मित्र पाहुण्याला म्हणाला, याला चार खुसखुशीत प्रश्‍न विचार व बोलका कर; करमणूक होईल. झालं, पाहुण्यानं प्रश्‍न केला, ‘‘काय आणलंस?’’ ‘‘तीर्थ.’’ ‘‘कुठून?’’ ‘‘देवळातून.’’ ‘‘कुठल्या देवाचं?’’ ‘‘ते कशाला? तीर्थ ते तीर्थ!’’ ‘‘पण तो देव की देवी?’’ ही आपली चेष्टा चालली आहे याचा पोर्‍याला वास आला.

‘‘देव की देवी; फरक काय पडतो? हल्ली स्त्रिया पण पुरुषांसारखा ड्रेस घालतात. पुुरुषही बायकांप्रमाणे केस वाढवतात, अंबाडा घालतात, केसांना क्लिपा लावतात, कानात दागिना घालतात. काहीवेळा ओळखणंच कठीण जातं म्हणून असले प्रश्‍न विचारू नका!’’ ‘‘बरं ते असो. आणलंस ते तीर्थ तरी की पाणी?’’ ‘‘देवाला आंघोळ घालतात तेच! पाणी पण देवानंच तयार केलं आहे; ते तीर्थ म्हणून पिलं तर बिघडत नाही, सर्वांना पावतं आणि पचतं!’’
एवढे तारे तोडून पोर्‍या निघाला. उपस्थितांची करमणूक झाली. पाहुण्यानं हसवणुकीची बिदागी म्हणून पोर्‍याला दहा रुपये दिले. पोर्‍या खूश झाला. लहान मुलंसुद्धा कधीकधी असं काही बोलतात की त्यांचं कौतुक वाटतं व आपली करमणूकही होते. वाटतं, देवानं दिलेला जन्म रडण्या-कुढण्यासाठी नाही, हसण्यासाठीच आहे!
‘येतो तो क्षण अमृताचा,’ असं म्हणूनच जगावं व म्हणावं- ‘हसण्यासाठी जन्म आपुला!’