ब्रेकिंग न्यूज़

हर्बल गार्डन

– वैद्य स्वाती अणवेकर (म्हापसा)

हरितकी/हरडा

हा २०-३० मीटर उंच वृक्ष आहे. ह्याची त्वचा गडद तपकिरी रंगाची व खडबडीत असून हिरड्याचे लाकूड अत्यंत कठिण व घट्ट असते. ह्याची पाने ७-२० सेंमी लांब व ५-१० सेंमी रूंद व टोकदार असून पत्र शिरांच्या ६-८जोड्या असतात. फुले २.५-५ सेंमी लांब असून फळ २.५-५ सेंमी लांब व अंडाकार असते. आत कठिण मगज असतो व पृष्ठभागावर पाच पन्हाळी सारख्या उभ्या रेषा असतात. फळ कच्चे असता हिरवे व पिकल्यावर धुरकट पिवळे असते. प्रत्येक फळात एक कठिण बी असते.
हरितकीचे उपयुक्तांग आहे फळ. ह्याची चव लवण अर्थात खारट सोडून पाचही चवी असलेली असते व प्रमुख चव तुरट असते. हरडा उष्ण गुणाचा असतो व हल्का, कोरडा असून त्रिदोषनाशक असतो.

औषधी उपयोग
१) जखम झाली असता ती हरड्याच्या काढ्याने धुवून साफ करतात.
२) बाळ हरडे चावून खाल्ल्याने भूक वाढते.
३) कफज अर्शामध्ये हरितकी ही गुळ व ताकासोबत देतात.
४) हरड्याचे चूर्ण मनुका व खडीसाखरसह देतात, ह्याने अम्लपित्तामध्ये फायदा होतो.
५) हरडा दूषित कफ व मेद यांचा नाश करुन बुद्धि व इंद्रियांचा जडपणा घालवून मेध्य कार्य करतो.
६) हरडा डोळ्यांच्या आरोग्यास देखील हितकर आहे.
(सुचना : ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

बेहडा/बिभितकी

ह्याचा २०-२६ मीटर उंच वृक्ष असतो. ह्याचे काण्ड सरळ, कठिण व गडद भुरकट रंगाचे असते. ह्याचा सार भाग कठिण असतो व पाने वडाच्या पानांसारखी ८-१६ सेंमी लांब व रूंद असतात. पर्ण वृन्ताच्या शेवटी दोन गाठी असतात. पर्ण वृन्तावर १.५-२ सेंमी लांब असतो. फुले पांढरी किंवा पिवळसर पांढरी असून १.५-४ सेंमी लांब मंजिरी स्वरुपात असतात. फळ १-१.५ सेंमी व्यासाचे धुरकट रंगाचे व गोलाकार व मागे निमुळते असते. सुके फळ देठाजवळ पंचकोनी असते.
ह्याचे उपयुक्तांग आहे फळ. बेहडा चवीला तुरट, उष्ण गुणाचा व जड आणि रूक्ष असतो. हा कफपित्तनाशक आहे.
औषधी उपयोग
१) बेहड्याचे बीज तेल हे त्वचारोग, कोड, केस गळणे ह्यात उपयुक्त आहे.
२) सुज व वेदनायुक्त विकारात बेहड्याचा लेप करतात.
३) सर्दी खोकल्यात बेहड्याचे चूर्ण मधासह देतात.
४) कोष्ठातील विकृत कफाचा नाश करुन बेहडा कृमिनाशक कार्य करते.
५) बेहडा तुरट असल्याने रक्तस्तंभक म्हणून चांगले काम करतो.

वेखंड/वचा

हे पाणथळ जागी उगवणारे व नेहमी हिरवेगार असणारे १-२ मी उंचीचे क्षुप आहे. ह्याचे कंद जमीनीत असतात. आल्याच्या कंदाप्रमाणे ते वाढते. ह्याला ५-६ पर्व असतात जे मधल्या बोटाएवढे जाड व रोमयुक्त तांबूस रंगाचे व सुगंधी असतात. पाने हिरवी चमकदार व उसाच्या पानाप्रमाणे लांब व कडा लाटायुक्त असतात. फुल पिवळट पांढरे मंजिरीस्वरूप असते.

वचा चवीला कडू तिखट असून हि उष्ण गुणाची हल्की, तीक्ष्ण, रूक्ष व प्रभाव मेध्य असलेली आहे. वचा कफवातनाशक व पित्तकर आहे.
औषधी उपयोग
१) वेदना व सुज ह्यात वेखंडाचा लेप करतात.
२) लहान मुलांमध्ये वेखंड मेध्य कार्य करते अर्थात बुद्धिची ग्रहण व स्मरणशक्ती सुधारते.
३) मानसिक आजारात वेखंड हे तुप अथवा मधासह देतात.
४) खोकला, दमा ह्यात वेखंड सैंधव व कोमट पाण्यासह दिल्याने उल्टीतून कफ बाहेर पडतो.
५) वेखंड कृमीनाशक म्हणून देखील उपयुक्त आहे.

शतावरी

शतावरी ह्या वनस्पतीबाबत आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहीत असेल. आपण सर्वांना शतावरी कल्प तर माहितच असेल जो बाळंतीणीला हमखास दुधातून दिला जातो. चला तर आज आपण ह्या शतावरीची थोडी जास्त ओळख करुन घेऊ.
शतावरीचा काटेरी झुपकेदार वेल असतो. ह्याच्या फांद्यावर उभ्या रेषा असतात. काण्ड त्रिकोण, स्निग्ध असते. ह्याचे काटे ०.५-१ सेंमी लांब व खालच्या बाजुस वळलेले काहीसे बाकदार असतात. शतावरीचे काण्ड हे पानांसारखे भासते. २-६ ह्या संख्येत गुच्छात उगवते. १.२५-२-५ सेंमी लांब पातळ व विळ्याप्रमाणे भासते. फुले मंजिरी स्वरूपात उगवतात जी २.५-५ सेंमी लांब एकेरी किंवा गुच्छ रूपात असतात. ही सुगंधी व पांढरी किंवा गुलाबी रंगाची असतात. फळ वाटाण्याच्या आकाराचे १-२ बीज युक्त असते. मुळ हे मुल स्तंभापासून जाड लांबट गोल व दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी मुळे फुटतात.
शतावरीचे उपयुक्तांग आहे मुळ. ह्याची चव गोड, कडू असून ही थंड गुणाची व जड, स्निग्ध व मृदू असते. हि वातपित्तनाशक व कफपोषक आहे पण ओली असताना मात्र कफकर असते.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊ:
१) वातनाशक व बल्य असल्याने शतावरी सिद्ध तेल अभ्यंगासाठी वापरतात.
२) सरक्त मल प्रवृत्तीमध्ये शतावरी सिद्ध घृत चांगले कार्य करते.
३) बाळंतीणीस चांगले व भरपूर स्तन्य उत्पत्तिसाठी शतावरीसिद्ध दूध देतात.
४) अधोग रक्तपित्तामध्ये शतावरीचा काढा अथवा स्वरस वापरतात.
५) शतावरी शुक्रधातूची वाढ करते तसेच ती गर्भाशयपोषक देखील आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )