हत्तीणीच्या मृत्युप्रकरणी केरळमध्ये एकास अटक

 

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी केरळमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. केरळ वनविभागाने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली. दरम्यान हत्तीणीच्या मृत्यूचा देशभरातून विविध माध्यमांद्वारे निषेध करण्यात येत आहे. हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी तीन संशयितांची चौकशी केली जात असून अन्य दोन संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याचे वनविभागाने सांगितले होते. ही हत्तीण १५ वर्षांची होती व ती गर्भवती होती. भुकेने व्याकूळ होऊन ती अन्नाच्या शोधात फिरत असताना एका व्यक्तीने तिला फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिले. अननस खाल्ल्यानंतर ते फटाके तिच्या तोंडात फुटले. त्यानंतर जखमी झालेल्या या हत्तीणीचा २७ मे रोजी वेलियार नदीत मृत्यू झाला.

अटक करण्यात आलेला आरोपी सुमारे ४० वर्षांचा असून तो स्फोटके पुरवण्याचे काम करतो, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. या प्रकरणात केलेली ही पहिलीच अटक आहे.
दरम्यान, तिन्ही संशयितांवर आमची नजर असून त्यांची चौकशी सुरू केल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले आहे.