स्विस ओपन व युरोपियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप रद्द

कारोना महामारीचा फटका संपूर्ण क्रीडा जगताला बसला आहे. बर्‍याच स्पर्धा रद्द वा स्थगित झाल्या आहेत. या महामारीमुळे आता आणखी दोन मोठ्या बॅडमिंटन स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात योनेक्स स्विस ओपन २०२० आणि २०२० युरोपियन चॅम्पियनशिपचा समावेश आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने ही माहिती दिली आहे. बॅडमिंटन कॅलेंडरमध्ये बदलीच्या योग्य जागा सापडेपर्यंत यापूर्वी या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. एचएसबीसी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरवरील सुपर ३०० स्पर्धा असलेली स्विस ओपन यापूर्वी १७ ते २२ मार्च दरम्यान होणार होती.

परंतु कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे ती स्थगित करण्यात आली होती. तर युरोपियन चॅम्पियनशिप २१ ते २६ एप्रिलपर्यंत होणार होती. या दोन्ही स्पर्धा जागतिक कॅलेेंडरनुसार २०२०नंतर खेळविणे शक्य नसल्याने अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅडमिंटन युरोप आणि युक्रेनियन बॅडमिंटन फेडरेशन यांनीही युरोपियन चॅम्पियनशिप रद्द करण्याच्या निर्णयाला सहमती दर्शविली आहे.