स्वस्त दरात मासळी योजना ऑक्टोबरपर्यंत

0
126

४५ लाख रु.ची तरतूद
लोकांना स्वस्त दरात मासळी देण्याची योजना येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू करण्यात येईल, असे मच्छिमारी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी काल विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. या योजनेसाठी ४५ लाख रु.ची तरतूद करण्यात आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
जनतेला स्वस्त दरात मासळी देण्यासाठी गाडे उभारण्यात येतील तसेच फिरत्या व्हॅन्सचीही सोय करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. लोकांना घाऊक दरात ही मासळी उपलब्ध होईल, असे यावेळी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, रोहन खंवटे, नीलेश काब्राल आदींनी यावेळी गोव्यात मासळी प्रचंड महागली असून सामान्य माणून आज मासळी खरेदी करू शकत नसल्याचे सांगून या पार्श्‍वभूमीवर सरकारने अर्थसंकल्पातून जाहीर केल्याप्रमाणे लोकांना स्वस्तात मासळी उपलब्ध करून देण्यासाठीची योजना सुरू करावी अशी मागणी केली. मासळीचे दर सध्या ७५ ते ८० टक्क्यांनी वाढले असल्याचे यावेळी रोहन खंवटे यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले. हे दर एवढे वाढण्याचे कारण काय, असा सवालही त्यानी उपस्थित केला. ट्रॉलर मालकांना सरकार किती कोटी रु. सबसिडी देते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री आवेर्तान फुर्तादो म्हणाले की मच्छिमारीचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. त्यामुळे मासळीचे दर वाढत आहेत. सरकार ट्रॉलरवाल्यांना वार्षिक २३ कोटी रु. एवढी सबसिडी देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सरकारने करोडो रु.ची सबसिडी देत असताना मच्छिमार मासळीचे दर सारखे का वाढवतात असा प्रश्‍न खंवटे यांनी केला.